आयपीएलचा तेरावा हंगाम युएईमध्ये १९ सप्टेंबरपासून सुरू होत आहे. सर्व संघ आयपीएलच्या तयारीला लागले आहेत. युएईमध्ये होणारी ही स्पर्धा जिंकण्याचा प्रयत्न सगळे संघ निश्चितपणे करणार आहेत.
आयपीएलमध्ये प्रत्येक संघासाठी परदेशी खेळाडू महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असतात. आयपीएलच्या इतिहासात आतापर्यंत अनेक दिग्गज परदेशी खेळाडू सामिल झाले आहेत व सर्वांनी आपली छाप पाडली आहे. त्याचबरोबर, आतापर्यंत आयपीएलमध्ये बरेच असे परदेशी खेळाडू आहेत जे काहीकाळ आयपीएलमध्ये यशस्वी होऊन नंतर फ्लॉप झाले आहेत.
यंदाच्या आयपीएल लिलावात असे अनेक परदेशी खेळाडूही विकले गेले नाहीत जे, आधीचे काही वर्ष सातत्याने आयपीएलमध्ये खेळत होते. त्यापैकी, तीन खेळाडूंविषयी आपण जाणून घेऊया, ज्या खेळाडूंची यावर्षी आयपीएलमध्ये कमतरता जाणवेल.
१) बेन कटिंग
बेन कटिंग हा ऑस्ट्रेलियन अष्टपैलू खेळाडू या यादीतील पहिला खेळाडू आहे. टी२० क्रिकेटमध्ये फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तिन्ही विभागांत त्याची कामगिरी आत्तापर्यंत जबरदस्त राहिली आहे. कटिंगकडे टी२० मधील एक प्रमुख अष्टपैलू खेळाडू म्हणून पाहिले जाते.
२०१८ आयपीएल वेळी बेन कटिंगला मुंबई इंडियन्स संघाने तीन कोटीहून अधिक रक्कम देऊन आपल्या ताफ्यात सामील केले होते. मुंबई इंडियन्ससोबत त्याची दोन्ही वर्ष तितकीशी चांगली गेली नाहीत.२०२० आयपीएल लिलावापूर्वी मुंबईने त्याला करारातून मुक्त केले. यानंतर कोणत्याही संघाने त्याला खरेदी करण्यात रस दाखविला नव्हता.
२०१६ आयपीएलच्या अंतिम सामन्यात तो सनरायझर्स हैदराबाद संघाकडून सामनावीर ठरला होता. जगभरात जवळपास सर्व टी२० लीगमध्ये खेळण्याचा कटिंगकडे अनुभव आहे.
२) सॅम बिलींग्ज
इंग्लंडचा यष्टीरक्षक फलंदाज सॅम बिलिंग्ज हा देखील आयपीएल लिलावात विकला न गेल्याने, आयपीएलच्या तेराव्या हंगामाला मुकणार आहे. परंतु, बिलिंग्ज सारख्या खेळाडूची कमतरता नक्कीच भासेल.
बिलिंग्जने आत्तापर्यंत दिल्ली डेरडेव्हिल्स ( दिल्ली कॅपिटल्स ) व चेन्नई सुपर किंग्ज या संघांचे प्रतिनिधित्व केले आहे. २०१६-१७ अशी दोन वर्ष दिल्लीकडून यशस्वी झाल्यानंतर, २०१८ मध्ये त्याला चेन्नई संघात निवडले गेले. दिग्गजांनी भरलेल्या चेन्नईच्या संघात त्याला पुरेशी संधी मिळाली नाही.
२०१९ आयपीएलनंतर चेन्नईने त्याला सोडल्यावर, २०२० आयपीएलच्या लिलावात त्याला एकही खरेदीदार सापडला नाही. बिलिंग्जने आतापर्यंत २२ आयपीएल सामन्यात १३३.२० च्या स्ट्राईक रेटने ३३४ धावा काढल्या आहेत.
३) कॉलिन डी ग्रँडहोम
न्यूझीलंडचा अष्टपैलू खेळाडू कॉलिन डी ग्रँडहोम हा देखील आयपीएल २०२० ला मुकणार आहे. डिसेंबर महिन्यात झालेल्या आयपीएल लिलावात त्याला कोणत्याही संघाने खरेदी केले नाही.
२०१७ आयपीएल हंगामात कोलकाता नाईट रायडर्सचे प्रतिनिधित्व करताना ग्रँडहोम प्रकाशझोतात आला. आपल्या मध्यमगती गोलंदाजी व आक्रमक फलंदाजीने त्याने केकेआरसाठी काही सामने जिंकून दिले. २०१८ आयपीएल लिलावात आरसीबीने त्याच्यावर बोली लावली. आरसीबीकडून फलंदाजीत थोडेफार सहकार्य त्याने केले. मात्र, गोलंदाजीत तो जराही चमक दाखवू शकला नाही. परिणामी, २०२० आयपीएलसाठी तो कोणत्याच संघात नाही.