---Advertisement---

कूल एमएस धोनीच्या नावावरही आहेत ३ नकोसे विक्रम, एकतर…

On: शनिवार, जुलै 25, 2020 5:23 PM
---Advertisement---

भारताचे दिग्गज कर्णधार म्हटलं की एमएस धोनी नेहमीच प्रत्येकाच्या डोळ्यांसमोर येतो. रांची सारख्या छोट्या शहरातून सुरु झालेला धोनीचा प्रवास भारताचा यशस्वी कर्णधारापर्यंत झाला. डिसेंबर २००४ ला पदार्पण केलेल्या धोनीने अनेकदा त्याच्या आक्रमक खेळीने भारताला मोठे विजय मिळवून दिले.

एवढेच नाही तर त्याने यष्टीरक्षणातही चांगली कामगिरी केली. त्याच्या या प्रवासात त्याने अनेक मोठे विक्रम केले. त्याचे काही विक्रम असे आहेत, जे मोडणे कठिण आहेत. पण धोनीच्या या प्रवासात असेही काही विक्रम झाले जे, कोणत्याही क्रिकेटपटूला आपल्या नावावर असावेत असे वाटणार नाही. अशाच धोनीच्या नावावर असलेल्या ३ नकोशा विक्रमांबद्दल आपण या लेखात जाणून घेऊ.

धोनीच्या नावावर असलेले ३ नकोसे विक्रम – 

३. सलग ४ कसोटी मालिका पराभूत होणारा कर्णधार-

धोनी जगातील सर्वोत्तम कर्णधारांमध्ये गणला जातो. तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक सामन्यात नेतृत्व करणाराही कर्णधार आहे. तसेच त्याच्या नेतृत्वाखाली भारताने तीन आयसीसीच्या महत्त्वाच्या स्पर्धाही जिंकल्या आहेत. एवढेच नाही तर धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ पहिल्यांदा कसोटीत अव्वल क्रमांकावरही आला.

पण या यशाबरोबरच धोनीच्या नावावर एक नकोसा विक्रमही आहे. तो विक्रम म्हणजे त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ सलग ४ कसोटी मालिकेत पराभूत झाला होता.

२०१३ मध्ये भारताला कसोटी मालिकेत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध १-० ने, २०१४ मध्ये न्यूझीलंडविरुद्ध १-०ने, २०१४ मध्ये इंग्लंडविरुद्ध ३-१ ने आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध २-० ने पराभव स्विकारावा लागला. या सर्व मालिका भारताने धोनीच्या नेतृत्वाखाली खेळल्या होत्या. याचदरम्यान ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी मालिका सुरु असताना धोनीने डिसेंबर २०१४ ला कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती.

२. बांगलादेशविरुद्ध वनडे मालिका पराभूत होणारा पहिला भारतीय कर्णधार –

२०१५ ला भारतीय संघ बांगलादेश दौऱ्यावर गेला होता. या दौऱ्यात ३ सामन्यांची वनडे मालिका झाली होती. ही मालिका भारत धोनीच्या नेतृत्वाखाली खेळत होता. त्यावेळी त्या मालिकेतील केवळ १ सामन्यात भारताला विजय मिळवता आला होता, तर २ सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला होता.

या मालिकेतील पहिला सामना भारत ७९ धावांनी तर दुसरा सामना ६ विकेट्सने पराभूत झाला होता. तिसऱ्या सामन्यात भारताने ७७ धावांनी विजय मिळवला होता. परिणामी त्या मालिकेत १-२ ने भारताला पराभूत व्हावे लागले होते. त्यामुळे धोनीच्या नावावर बांगलादेशविरुद्ध वनडे मालिका पराभूत होणारा पहिला भारतीय कर्णधार होण्याचा नकोसा विक्रम नोंदवला गेला.

१. आशिया खंडाबाहेर एकही शतक नाही – 

धोनी हा नेहमीच त्याच्या आक्रमक फलंदाजीसाठी ओळखला जोतो. त्याने आत्तापर्यंत अनेक तुफानी खेळींनी भारताला विजय मिळवून दिले आहेत. त्यामुळे त्याला सर्वोत्तम फिनिशरही म्हटले जाते. त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आत्तापर्यंत १६ शतके केली आहेत. यातील ६ शतके त्याने कसोटीत तर १० शतके वनडेत केली आहेत. मात्र यातील एकही शतक त्याने आशिया खंडाच्या बाहेर केलेले नाही.

त्याने ही शतके भारत, बांगलादेश, पाकिस्तान आणि श्रीलंकेत केली आहेत. धोनीने आशिया खंडाबाहेर अनेक सामने खेळले, तिथे त्याने महत्त्वपूर्ण खेळीही केल्या. परंतू त्याला शतक मात्र त्याच्या संपूर्ण कारकिर्दीत आशिया खंडाबाहेर करता आलेले नाही.

वाचनीय लेख –

कसोटीत सर्वात जलद द्विशतक करणारे ३ दिग्गज भारतीय फलंदाज

या ३ भारतीय महिला क्रिकेटर, ज्यांचे वनडे द्विशतक हुकले थोडक्यात

आयपीएलमार्गे देशाकडून कमबॅकची स्वप्नं पाहणारे ४ क्रिकेटर, २ आहेत भारतीय

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---