नवी दिल्ली। ६४ वर्षीय सायकल चालकाला टक्कर मारण्याच्या आरोपाखाली श्रीलंका संघाचा यष्टीरक्षक फलंदाज कुशल मेंडिसला रविवारी (५ जुलै) अटक करण्यात आले. कोलंबोच्या दक्षिण भागात पनादुरा येथे रविवारी पहाटे ५ वाजता भीषण दुर्घटना झाली. रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच सायकल चालकाचा मृत्यू झाला होता.
पुढील चौकशीसाठी मेंडिसला (Kusal Mendis) पोलिसांनी तात्काळ कोठडीत टाकले. मेंडिसने वाहन चालवताना अंमली पदार्थाचे सेवन केले होते की नाही याचा पोलिसांनी खुलासा केला नाही. पण मेंडिसला पुढील ४८ तासांमध्ये पानादुरा दंडाधिकाऱ्यासमोर हजर करायचे होते.
व्हिडिओ क्लिप आली समोर
घटनेच्या काही तासांनंतर श्रीलंकेच्या डेली मिररने या घटनेची सीसीटीव्ही फुटेज प्रसिद्ध केले. व्हिडिओमध्ये मेंडिसची कार एका अरुंद रस्त्यावरुन जात असून एका स्थानिक सायकलस्वारला धडक दिली असल्याचे दिसते. शेवटी, क्लिपमध्ये मेंडिसच्या कारला झालेले नुकसानदेखील दाखविले आहे. डेली मिररने हा व्हिडिओ प्रसिद्ध करत लिहिले, “क्रिकेटपटू कुशल मेंडिसला त्याच्या कारशी संबंधित एका दुर्घटनेनंतर अटक करण्यात आली होती, ज्यामुळे आज सकाळी पनादुराच्या होरेथुडुवामध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाला.”
Cricketer Kusal Mendis was arrested following an accident involving his vehicle that killed a man at Horethuduwa, Panadura early this morning #DailyMirror #NewsUpdates #lka #SriLanka pic.twitter.com/BgeF56fizf
— DailyMirror (@Dailymirror_SL) July 5, 2020
मेंडिसने खेळले आहेत इतके सामने
२५ वर्षीय यष्टीरक्षक फलंदाज मेंडिसने श्रीलंकेकडून ४४ कसोटी सामने, ७६ वनडे सामने आणि २६ आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळले आहेत. त्यात त्याने ३६.९७ च्या सरासरीने २९९५ धावा केल्या आहेत. त्याचबरोबर वनडेत त्याने ३०.५२ च्या सरासरीने २१६७ धावा केल्या आहेत, तर टी२०त त्याने १८.६१ च्या सरासरीने ४८४ धावा केल्या आहेत.
या क्रिकेटपटूला झाली आहे शिक्षा
तरीही हे काही पहिल्यांदा नाही, जेव्हा श्रीलंकेचा क्रिकेटपटू कोणत्याही दुर्घटनेत सामील आहे. २००३ मध्ये माजी फिरकीपटू कौशल लोकुच्चिला ४ वर्षांच्या कालावधीसाठी तुरुंगवासाची शिक्षा झाली होती. त्याने आपल्या कारने एका पादचाऱ्याला चिरडले होते, ज्यामुळे त्याचा मृत्यू झाला होता. याव्यतिरिक्त माध्यमांतील काही वृत्तांनुसार असे समजते की श्रीलंकेत दरवर्षी रस्ते अपघातात जवळपास ३ हजार लोकांना आपला जीव गमवावा लागतो.
ट्रेंडिंग घडामोडी-
-कर्णधार म्हणून धोनी पराभूत व्हावा असे मला वाटत नव्हते म्हणून मी रडलो
-८० वर्षांचा धोनी व्हिलचेअरवर असेल तरी त्याला माझ्या संघात खेळवेल
-धोनीला क्रिकेटमधून कमवायचे होते फक्त ३० लाख रुपये