-महेश वाघमारे
२००६ साली सौरव गांगुली पेप्सीच्या एका जाहिरातीमध्ये टीव्हीवर बोलताना दिसला,
” हाय, मेरा नाम है सौरव गांगुली, भूले तो नहीं. जो हुआ क्यों हुआ, कैसे हुआ..ये सोचकर दुख होता था.. गुस्सा भी आता था.. पर, अब नहीं, मैं टीम में वापस आने के लिए बहुत-बहुत मेहनत कर रहा हूं। क्या पता, मुझे हवा में टीशर्ट लहराने का एक और मौका मिल जाए.. जो भी हो, टीम के बाहर या अंदर, मैं चुप बैठने वाला नहीं हूं. मैं हर मैच से पहले चिल्लाऊंगा. ऊह…आह…इंडिया… मैं यह बोलता रहूंगा. आप भी चिल्लाएंगे ना, मेरी टीम को अच्छा लगेगा. अपने दादा की बात सुनेंगे ना ?”
चाहत्यांपासून ते संसदेतील खासदारापर्यंत, प्रत्येकजण भावनिक झाला. संपूर्ण प्रकरण असे होते की, २००६ मध्ये टीम इंडियाचा प्रशिक्षकांनी गांगुलीला त्यांनीच बनवलेल्या टीममधून डच्चू दिला होता. त्यानंतरची ही गोष्ट..
अपने दादा को भूले तो नहीं ते बीसीसीआयचे अध्यक्षपद…!!!
एक थक्क करणारा प्रवास…!!! #दादा #सौरवगांगुली #SouravGanguly #Ganguly #Sourav @SGanguly99 #म #मराठी pic.twitter.com/yNhkwcL3KI— Sharad Bodage (@SharadBodage) October 23, 2019
सौरव गांगुलीला असे म्हणत संघातून वगळण्यात आले की “तो असा खेळाडू आहे, जो संघात दरी निर्माण करतो.”
अशाप्रकारे संघाबाहेर गेल्यानंतर दादाच्या जीवनात भूकंप आला. त्याच्या घरातील वातावरण बिघडले. ज्योतिषी घराकडे येऊ लागले. सौरवच्या वडिलांनीही त्याला सांगितले की, वेस्ट इंडिजविरूद्ध मालिका जिंकल्यानंतर त्याच्यासाठी संघाचा रस्ता कायमचा बंद झाला आहे.
भारतीय संघाच्या प्रत्येक विजयानंतर त्यांना असे वाटू लागले की आता महाराजांची वेळ संपली आहे.
संघाबाहेर गेल्यानंतर सौरवच्या वडिलांनी त्याला सांगितले,
“महाराज, तुम्ही सर्व काही साध्य केले आहे, आता तुम्ही सन्मानाने निरोप घ्यावा.”
पण वडिलांशी झालेल्या या संभाषणात सौरव एक गोष्ट बोलला,
“कोणीही नेहमी खेळत नाही. मॅराडोना, सॅम्प्रस किंवा गावसकर. प्रत्येकाला एक दिवस थांबावेच लागते. मला स्वतःला माहित आहे की, मी आज ना उद्या थांबणार आहे. परंतु मला या गोष्टीसह जगायचे नाही की, जेव्हा माझी कठीण वेळ आली, तेव्हा मी मेहनत घेतली नाही किंवा त्यातून मुक्त होण्याचा प्रयत्न केला नाही. ”
वडिलांशी या चर्चेनंतर सौरव त्याच्या खोलीत आला आणि सज्ज झाला. आता त्याला “कोलकात्याचा युवराज” हे बिरुद सोडून सौरव व्हायचं होतं. पुन्हा नव्याने तयार व्हायचे ठरवले. त्याने मनाशी पक्के केले की,
” मी कठोर प्रशिक्षण घेईल. रणजी ट्रॉफीचे सर्व सामने खेळेल आणि शेवटपर्यंत हार मानणार नाही.”
पुन्हा संघात परत येण्यासाठी सौरवने एक प्रशिक्षक नेमला. आठवड्यातून सहा दिवस नियमित सराव केला. त्याच्या प्रशिक्षणामुळे त्याचे नऊ किलो वजन कमी झाले.
रणजीमध्ये चांगली कामगिरी करून देखील सौरवकडे वारंवार दुर्लक्ष केले जात होते. त्याच्या हाती निराशेशिवाय दुसरे काही लागले नाही. त्याच वेळी, ज्यामुळे त्याला टीम इंडियाकडे जाण्याचा मार्ग सापडला तो म्हणजे ‘ती’ पेप्सी कंपनीची जाहिरात.
“मैं सौरव गांगुली.. भूले तो नही ”
लाखो लोकांनी ती जाहिरात पाहिली. सौरव गांगुली बरोबर होता की चूक याबद्दल बरीच खळबळ उडाली होती. ही जाहिरात केल्यानंतर सौरव गांगुलीवर प्रेमाचा पूर आला. लोकांनी सौरवला संदेश आणि पत्रे लिहिली. सौरवच्या समर्थनार्थ रॅली निघाल्या.देशात भावनांची गर्दी झाली. दुसरीकडे भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेत वनडे मालिका ४-१ ने गमावली.
दक्षिण आफ्रिकेतील भारताच्या पराभवावर काही राजकारण्यांनी प्रश्न उपस्थित केले असता, ग्रेग चॅपेल यांनी,
“राजकारण्यांना बोलण्यासाठी आणि टीका करण्यास पैसे दिले जातात.”
असे म्हणत विषय टाळला.
भारतीय संघाच्या खराब कामगिरीबद्दल संसदेत चर्चा झाली. त्यानंतर लवकरच सौरवला संघात पुनरागमन करण्याची संधी मिळाली. सौरवचे संघात पुनरागमन झाल्याची घोषणा झाली तेव्हा तो ईडन गार्डनमध्ये होता. हा असा काळ होता जेव्हा असं वाटत होतं की भारतीय क्रिकेट नव्हे तर तिथे मसाला चित्रपट चालू आहे. त्यावेळी, पत्रकारांची नजर टीम इंडियाचे प्रशिक्षक, कर्णधार आणि सौरव गांगुलीवरच असे.
सौरव सराव करत असताना देखील, बरेच पत्रकार ईडन गार्डनमध्ये दिसत. अचानक एक दिवस काही पत्रकार ओरडले.
“सौरव तुझी निवड झाली आहे.”
ही बातमी समजताच दादाने सुटकेचा निश्वास सोडला. पण, दादाला हे ठाऊक होते की जर त्याला पुन्हा संघात स्थान मिळवायचे असेल तर त्याला अडचणीतही स्वत: ला सिद्ध करावे लागेल
दक्षिण आफ्रिकेतील सामन्यापूर्वी नेटमध्ये दादाची चाचणी
२००६-२००७ च्या दक्षिण आफ्रिका दौर्याच्या कसोटी मालिकेसाठी सौरवची निवड झाली होती. ग्रेग चॅपल अजूनही संघाचे कोच होते, तर राहुल द्रविड संघाचा कर्णधार.
भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेच्या पोकेस्ट्रम नावाच्या ठिकाणी होता. तिथे एक सराव सामना खेळला जाणार होता. त्यानंतर कसोटी मालिका व्हायची होती. सौरवदेखील यासाठी तयार होता, परंतु सर्व काही त्याच्यासाठी इतके सोपे नव्हते.
सौरव पोकेस्ट्रामला रवाना झाला. एकदिवसीय मालिकेसाठी भारतातून पत्रकार गेले नव्हते. पण, जेव्हा सौरव परत आला तेव्हा अनेक टीव्ही पत्रकार त्याच्याबरोबर उड्डाण घेऊन दक्षिण आफ्रिकेला गेले. कारण या मालिकेतील भारत-दक्षिण आफ्रिका सामना त्यांच्यासाठी महत्त्वाचा नव्हता. परंतु, गांगुली विरूद्ध चॅपल सामना त्यांना टीआरपी मिळवून देणार होता.
सौरव विमानतळावर आला तेव्हा टीम मॅनेजर आणि तीन तरुण खेळाडू त्याला घेण्यासाठी आले होते. सौरव थेट सरावासाठी पोहोचला पाहिजे, असा व्यवस्थापनाचा स्पष्ट संदेश होता. सौरव विमानतळावरून सरळ मैदानावर पोहोचला. परंतु ज्या खेळाडूंने, बरीच वर्ष टीम इंडियाचे नेतृत्व केले, अनेक खेळाडू बनविले, त्याला भेटायला सर्वच घाबरले. वास्तविक, ही भीती ग्रेग चॅपेलची होती. कारण, त्यावेळी सौरवशी मैत्री म्हणजे चॅपलशी वैर होते.
इतर खेळाडू आले नाहीत, पण कोच चॅपेलने स्वत: सौरवशी हातमिळवणी केली आणि त्याचे स्वागत केले. पण फक्त हात मिळाले, हृदय मिळणे कठीण होते.
त्यानंतर कर्णधार राहुल द्रविडनेही दादाची भेट घेतली. दादा नेट प्रॅक्टिससाठी तयार झाला. प्रशिक्षक, कर्णधार आणि संघातील अन्य खेळाडूंचे लक्ष दादा कसे खेळेल यावर होते.
वेगवान गोलंदाजांना सामोरे जाण्यासाठी दादा सज्ज झाला. सोबतच्या, नेट्समध्ये, टीमचे उर्वरित फलंदाज बॉल लागू नये यासाठी चेस्ट पॅड आणि सर्व सामान लावून खेळत होते. पण, दादाला चॅपल आणि संघाला दाखवायचे होते की तो निर्भिड आहे.
दौर्याच्या सुरूवातीलाच दादाने ठरवले होते –
“मला बॉल लागला, माझी हाडे तुटली किंवा मेलो तरी, आता मागे हटणार नाही.”
नेटच्या ३० मिनिटांच्या सत्रात दादाने अशी फलंदाजी केली की कोच चॅपेल जवळ येऊन म्हणाले-
“Well Batted”
एकेकाळी सौरवला संघातून वगळलेले कोच त्याचे कौतुक करीत होते. यावर विश्वास ठेवणे सोपे नव्हते.
दक्षिण आफ्रिकेविरूद्ध सराव सामना
पोकेस्ट्राममध्ये दादाची परीक्षा कोचसमोर झाली. पण आता खरी कसोटी विरोधी पेस अटॅकसमोर होती. दक्षिण आफ्रिकेच्या एका संघाबरोबर सराव सामना खेळला जाणार होता. द्रविड विश्रांती घेत असताना, व्हीव्हीएस लक्ष्मणला संघाचा कर्णधार बनविण्यात आले. टीम इंडियाची प्रथम फलंदाजी आली. परंतु मॉर्ने मॉर्केलच्या चेंडूंसमोर भारतीय फलंदाज ढेपाळले. वसीम जाफर आणि वीरेंद्र सेहवाग खाते न उघडता परतले. व्हीव्हीएस लक्ष्मण आणि सचिनही काही खास करून शकले नाहीत. अवस्था अशी झाली की, ६९ धावा पूर्ण होईपर्यंत अर्धा संघ पॅव्हेलियनमध्ये परतला होता.
सौरव गांगुली ड्रेसिंग रूममध्ये बसला होता आणि टीमची ही परिस्थिती पाहून तो स्वत: लाच सांगत होता,
” तू आपल्या विकेटसाठी नव्हे तर आपल्या सन्मानासाठी खेळत आहेस. ”
फलंदाजीला आल्यावर, त्याने क्रीजवर तळ ठोकला, ज्यामुळे त्याने प्रथम पीच समजावून घेतली आणि नंतर हळूहळू धावा जोडण्यास सुरवात केली. त्या विरोधी संघात चार वेगवान गोलंदाज होते, जे कसोटी द. आफ्रिकेच्या संघात स्थान मिळविण्यासाठी जोरदार प्रयत्न करत होते.
जेथे संपूर्ण संघ काही करू शकला नाही, तेथे दादाने चार तास फलंदाजी केली आणि आपले अर्धशतक पूर्ण केले. दादाची फलंदाजी पाहून टीम देखील उत्साही होऊ लागली आणि काही जुने सहकारी हळू आवाजात म्हणाले,
“हा जुना गांगुली आहे.”
त्या सामन्यात सौरवने ८३ धावा केल्या. त्याच्या खेळीमुळे हे स्पष्ट झाले की, आता दादा प्लेइंग इलेव्हनमध्ये सामील होणार.
दादांचे १५ मिनिटांचे प्रेरक भाषण
एकदिवसीय मालिकेतील पराभवानंतर संघाला नवीन विचारांनी कसोटी मालिका खेळायची होती. जोहान्सबर्गमध्ये पहिल्या कसोटीपूर्वी संध्याकाळी संघाची बैठक झाली. संपूर्ण टीम चॅपल यांच्या समोर बसली. या बैठकीत द्रविडशिवाय सचिन, कुंबळे, दादा यांनाही बोलण्यास सांगितले. प्रथम प्रशिक्षक बोलले, द्रविड बोलला, आणखी काही वरिष्ठ खेळाडू बोलले मग दादाचा नंबर आला. उठताच दादा म्हणाला,
“या संघात आत्मविश्वासाचा अभाव आहे. जर आपण तो पुन्हा मिळवू शकलो तर आपण काहीही करू शकतो. ”
त्या बैठकीत दादा १५ मिनिटे बोलला, तेसुद्धा कर्णधाराप्रमाणे. चॅपलसमोर गांगुलीने संघाला संबोधित केले. तो म्हणाला,
” चला, आपण दक्षिण आफ्रिकेला त्यांच्या घरात पराभूत करू. यापूर्वी आपण त्यांच्या घरात अनेक संघांना पराभूत केले आहे. यावेळी देखील हे करू शकतो. ”
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका, पहिली कसोटी, जोहान्सबर्ग
आता सामना टीव्हीवर प्रसारित होणार होता. सौरव गांगुली संघात परतत होता आणि मैदानात उतरत असताना भारतीय चाहते टक लावून पाहत होते. फलंदाजांना धोकादायक वाटणाऱ्या खेळपट्टीवर द्रविडने एक विचित्र निर्णय घेतला. टीम इंडियाने पहिली फलंदाजी स्वीकारली. सौरवसह संघातील अनेक खेळाडू आश्चर्यचकित झाले. पण, आता तुम्ही ऊखळीत डोके दिले आहे, तेव्हा मुसळ्याला घाबरून काय फायदा? ही म्हण खरी ठरली.
टीम इंडियाचे धुरंधर फलंदाज कसोटीच्या पहिल्याच दिवशी पडले. सुरुवातीला वसीम जाफर ९ व सेहवाग ४ धावांवर परतला. यानंतर द्रविड ३४ आणि सचिन ४२ यांनी काही वेळ डाव सावरला पण तेही फार काळ टिकू शकले नाहीत. आता सौरव गांगुली मैदानात उतरला होता.
त्यावेळी, मखाया अँटिनी, डेल स्टेन आणि आंद्रे नेल आग ओकत होते. सोबतीला अष्टपैलू जॅक कॅलिस सुद्धा होता. दक्षिण आफ्रिकेचे गोलंदाज इतके धोकादायक गोलंदाजी करीत होते की प्रत्येक षटकात एक चेंडू सौरवच्या अंगावर येत.
पण तरीही तो क्रीजवरच राहिला. त्याने फक्त धीर धरला नाहीतर अर्धशतकही केले. दादाच्या त्या खेळीमुळे भारताने २४९ धावांची मजल मारली. त्या डावात सौरव ५१ धावा काढून नाबाद राहिला.
यानंतर झहीर आणि श्रीशांतने दक्षिण आफ्रिकेच्या संघाला उद्ध्वस्त केले. दक्षिण आफ्रिकेचा संघ ८४ धावांवर गडगडला. टीम इंडियाने दुसर्या डावात २३६ धावा केल्या. यातही दादाने महत्त्वपूर्ण २५ धावांची खेळी साकारली. दक्षिण आफ्रिकेला ४०२ धावांचे लक्ष्य होते.
भारतीय संघाला विजयाचा सुगंध येऊ लागला. तिसर्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत दक्षिण आफ्रिकेचा संघ संकटात सापडला होता. तिसर्या दिवशी नाबाद असलेल्या अॅश्वेल प्रिन्स आणि मार्क बाऊचर हेच प्रमुख फलंदाज बाकी होते.
सौरव गांगुलीची सर्वात संस्मरणीय पत्रकार परिषद
तिसर्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर सौरव गांगुलीला पत्रकार परिषदेसाठी पाठवण्यात आले. सौरवच्या कमबॅकनंतर तो पहिल्यांदाच मीडियासमोर होता. कर्णधार म्हणून दादाने अनेक प्रश्नांची उत्तरे दिली होती पण एक खेळाडू म्हणून उत्तरे देण्याची ही पहिलीच वेळ होती.
ती पत्रकार परिषद खूप खास होती. सौरव गांगुलीची सर्वात लोकप्रिय पत्रकार परिषद. त्यादिवशी दादा आला आणि त्याने फलंदाजाप्रमाणेच उत्तर देण्याचे ठरवले.
एकामागून एक अद्भुत प्रश्न विचारले गेले.
पत्रकाराचा प्रश्नः प्रत्येक ओव्हरमध्ये चेंडू लागत असताना काय वाटले?
दादांचे उत्तरः बाद होण्यापेक्षा दुखापत बरी !
पत्रकाराचा प्रश्नः संघातून बाहेर पडला, याबद्दल काय सांगाल?
दादांचे उत्तरः जीवन म्हणजे फक्त क्रिकेट खेळणे नाही.
प्रश्नः आता भारताच्या विजयाची खात्री पटली आहे का?
उत्तरः जर आम्ही हा सामना जिंकू शकलो नाही तर आम्ही ड्रेसिंग रूम मध्ये नाही गेले पाहिजे.
गांगुलीचे हे विधान ज्या दृष्टिकोनातून आले, त्याला एका कर्णधाराचा दृष्टिकोण होता. दक्षिण आफ्रिकेच्या संपूर्ण दौर्यावर दादांचे हे विधान चर्चेचा विषय राहिले.
शेवटी, भारताने ही कसोटी १२३ धावांनी जिंकली आणि सौरव गांगुलीने पुन्हा संघात आपले स्थान मिळवले.