मुंबई । जेसन होल्डरच्या नेतृत्वाखाली वेस्ट इंडीज संघाला इंग्लंडमध्ये इतिहास घडविण्याची संधी आहे. वेस्ट इंडिज आणि इंग्लंड यांच्यात तीन सामन्यांच्या कसोटी सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा आणि निर्णायक सामना शुक्रवारी सुरू झाला. पहिला कसोटी सामना वेस्ट इंडीज तर दुसरा कसोटी सामना इंग्लंडने जिंकला. वेस्ट इंडिजच्या संघाचे 32 वर्षानंतर इंग्लंडच्या भूमीवर कसोटी मालिका जिंकून इतिहास घडविण्याकडे लक्ष आहे.
वेस्ट इंडीजच्या संघाने नाणेफेक जिंकून इंग्लंडला प्रथम फलंदाजीस पाचारण केले. दुसऱ्या सामन्याप्रमाणे याही सामन्यात वेस्ट इंडीजने दमदार सुरुवात केली. वेस्ट इंडीजच्या केमार रोचने मागील सामन्यात शतक ठोकणारा सलामीचा फलंदाज डॉमनिक सिब्ले, याला पहिल्याच षटकात बाद करत मोठा धक्का दिला.
लंचनंतर वेस्ट इंडीजच्या केमार रोचने मागील सामन्यातला हिरो बेन स्टोक्स याला त्रिफळाचीत करून इंग्लंडला तिसरा झटका दिला. या विकेटमुळे केमार रोच गोलंदाजांच्या विशेष क्लबमध्ये सामील झाला. आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटमध्ये रोचने बेन स्टोक्सला पाचवेळा बाद केले आहे. अशी कामगिरी करणारा केमार हा तिसरा गोलंदाज ठरला.
या यादीत भारताचा फिरकीपटू आर. अश्विन हा पहिल्या स्थानावर आहे. ज्याने बेन्स स्टोक्सला सात वेळा बाद केले आहे तर ऑस्ट्रेलियाचा फिरकीपटू नॅथन लॉयन यांने सहावेळा त्याला बाद केले. केमार रोचने बेन स्टोक्स बाद करत श्रीलंकेचा फिरकीपटू दिलरुवान परेरा यांची बरोबरी साधली. दोघांनीही बेन स्टोक्सला पाच वेळा बाद केले. स्टोक्सने मागील सामन्यात पहिल्या डावात शतक तर दुसऱ्या डावात अर्धशतक ठोकून इंग्लंडला सामना जिंकून दिला होता.