मुंबई । दिल्ली कॅपिटल्स, राजस्थान रॉयल्स आणि किंग्ज इलेव्हन पंजाबचा संघ दुबईला रवाना झाले आहेत, तर चेन्नई सुपर किंग्जचा संघ शुक्रवारी युएईला रवाना होणार आहे. तथापि, चेन्नई संघाने उड्डाण घेण्यापूर्वी स्टार ऑफ स्पिनर हरभजन सुंग संघासह युएईला जाणार नसल्याची मोठी बातमी समोर आली आहे.
हरभजन सिंग चेन्नई सुपरकिंग्जबरोबर जाणार नाही, याबाबत कोणतेही कारण पुढे आले नाही. तथापि, चेन्नई सुपर किंग्जच्या अधिकार्याने म्हटले आहे की, वैयक्तिक कारणांमुळे हरभजन संघासह युएईला जाणार नाही. तो दोन आठवड्यांत संघात सामील होईल. चेन्नईत झालेल्या छोट्या शिबिरात हरभजन सिंग सहभागी झाला नव्हता.
एमएस धोनी, सुरेश रैना, दीपक चहर, करण शर्मा या खेळाडूंनी त्या शिबिराला हजेरी लावली होती. चेन्नईचा स्टार अष्टपैलू रवींद्र जडेजा आणि शार्दुल ठाकूर देखील वैयक्तिक कारणास्तव शिबिरात उपस्थित नव्हते. ठाकूर बुधवारी संघात दाखल झाला तर गुरुवारी संध्याकाळी जडेजा संघात सामील झाला. उर्वरित खेळाडू 15 ऑगस्टपासून चेन्नई येथे गोलंदाजी प्रशिक्षक लक्ष्मीपती बालाजी यांच्याबरोबर सराव करत आहे.
चेन्नई सुपर किंग्जच्या एका अधिकार्याने माहिती दिली की, ‘एमएस धोनी, सुरेश रैना यांच्यासह सर्व खेळाडूंची मंगळवारी कोरोना टेस्ट करण्यात आली आणि सर्व खेळाडू तपासात निगेटिव्ह असल्याचे दिसून आले.’
धोनी आणि रैनाने 15 ऑगस्टला चेन्नईला पोहोचल्यानंतर निवृत्तीची घोषणा केली. दोन्ही खेळाडूंच्या या निर्णयाने सर्वांनाच चकित केले. गुरुवारी पंतप्रधान मोदींनी एक पत्र लिहून एमएस धोनीला उत्कृष्ट आंतरराष्ट्रीय कारकीर्द आणि भविष्याबद्दल शुभेच्छा दिल्या आहेत.






