नोव्हेंबर 2020 मध्ये होणाऱ्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. संघ निवडीच्या एक दिवस अगोदर निवड समितीला सलामीवीर रोहित शर्मा निवडीसाठी उपलब्ध होणार नसल्याची माहिती भारतीय संघांचे फिजिओथेरपिस्ट नितीन पटेल यांनी दिली होती. पटेल यांनी सविस्तर वैद्यकीय अहवाल सादर केला होता. रोहितला दोन ते तीन आठवडे विश्रांती घेण्याचा सल्ला दिला असल्याचे या अहवालात म्हटले होते.
नेटमध्ये सराव करत असतानाचे छायाचित्र झाले व्हायरल
मात्र, संघ जाहीर झाल्यानंतर काही तासातच रोहित शर्मा नेटमध्ये सराव करत असल्याची छायाचित्रे मुंबई इंडियन्सने ट्विटर अकाउंटवर शेअर केली होती. त्यावेळी भारतीय बोर्ड व निवडकर्ते आश्चर्यचकित झाले होते. कारण ऑस्ट्रेलिया दौर्यासाठी तंदुरुस्त होण्यासाठी रोहित आयपीएलमधील काही सामन्यांना मुकणार आहे अशी निवड समितीची समज होती.
विश्रांती घेण्याचा दिला सल्ला
“पटेल यांनी रोहितच्या दुखापतीबद्दल अन्य दोन तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेतला होता. त्या दोघांनीही आणखी तीन आठवडे विश्रांती घेण्याचा सल्ला दिला होता”, असे बीसीसीआयच्या सूत्रांनी सांगितले.
समितीला दिला अहवाल
भारताचे माजी फिरकीपटू सुनील जोशी यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीला वैद्यकीय अहवाल देण्यात आला होता. तज्ज्ञांच्या सल्ल्याने पाच सदस्यीय समितीने रोहितचे नाव संघात स्वीकारले होते.
प्रत्येक खेळाडूचा फिटनेस अहवाल केला सादर
बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, “पटेल यांनी प्रत्येक खेळाडूचा फिटनेस अहवाल सादर केला होता. भारतीय संघ फिजिओने कोणता खेळाडू तंदुरुस्त आहे आणि कोणता खेळाडू योग्य नाही याविषयी बोर्डाला माहिती दिली होती. ही माहिती निवड समितीलाही देण्यात आली होती. दुखापतीमुळे रोहित निवडसाठी उपलब्ध होणार नसल्याचे निवड समितीला सांगण्यात आले होते. त्यांनी दोन तज्ञ डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्याची माहितीदेखील दिली होती. दोघांनीही रोहितला दोन ते तीन आठवड्यांसाठी विश्रांती घेण्याची गरज असल्याचे सांगितले.”
शेअर केलेल्या व्हिडीओमुळे उठले टीकेचे वादळ
मुंबई इंडियन्सने शेअर केलेल्या फोटो आणि व्हिडिओमुळे टीकेचे वादळ उठले होते. भारताचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनी स्टार स्पोर्ट्स या चॅनेलशी बोलताना सांगितले की, “जर तो नेटमध्ये सराव करत असेल, तर त्याला कोणत्या प्रकारची दुखापत झाली आहे हे प्रामाणिकपणे सांगायला हवे. मला वाटते पारदर्शकपणे नेमकी काय समस्या आहे हे सर्वांना कळले पाहिजे.”
निवड समितीला नव्हती कल्पना
निवड समिती आणि बीसीसीआयचे म्हणणे आहे की रोहितने पुन्हा फलंदाजीचा सराव सुरू केला याबद्दल त्यांना काहीच माहिती नव्हती. 18 ऑक्टोबरला मुंबई इंडियन्स आणि किंग्स इलेव्हन पंजाबविरुद्धच्या सामन्यात तो दुखापतग्रस्त झाला होता आणि त्यानंतर तो आयपीएलमध्ये खेळला नाही.
दुखापतीतून सावरण्याची निवड समितीला आशा
बीसीसीआयला आशा आहे की रोहित दुखापतीतून सावरेल आणि भारतीय संघात सामील होऊ शकेल. तो ऑस्ट्रेलियाला येईल अशीही बोर्डाला अपेक्षा आहे. दुबई ते ऑस्ट्रेलियासाठी केलेल्या चार्टर्ड विमानात नियोजित जैव-सुरक्षित बबल आणि एअर-बबलमध्ये तो संघासह प्रवास करू शकेल अशी त्यांना आशा आहे.
यामुळे रोहितला क्वारंटाईन राहण्यासाठी, दुखापतीतून सावरण्यासाठी आणि तेथे प्रशिक्षिण घेण्यास मदत होईल. एकदा तंदुरुस्त झाल्यावर तो सराव करू शकतो. “त्याला झालेली दुखापत अधिक गंभीर नाही. आम्हाला आशा आहे की तो संघासह प्रवास करू शकेल. तो संघासह विमान प्रवासात आणि ऑस्ट्रेलियाच्या हॉटेलमध्ये जैव-बबलमध्ये राहू शकतो. ही योजना आहे.” असे सूत्रांनी सांगितले.
या वर्षी दुसऱ्यांदा झाली दुखापत
यंदाची ही दुसरी वेळ आहे की दुखापतीमुळे रोहितला संघातून वगळण्यात आले आहे. फेब्रुवारीमध्ये न्यूझीलंडवरून त्याला मध्येच भारतात परत यावे लागले होते. डाव्या पायाला दुखापत झाल्यामुळे वनडे आणि कसोटी मालिका गमावावी लागली होती.
भारतीय संघ ऑस्ट्रेलियामध्ये आपला पहिला सामना 27 नोव्हेंबरला खेळणार आहे. त्याआधी रोहित आयपीएलमध्ये भाग घेईल की नाही हे पाहावे लागेल.
महत्त्वाच्या बातम्या-
-रोहित शर्माची आयपीएलमधून माघार? मुंबई इंडियन्सने दिली महत्त्वाची माहिती…
-मुंबई इंडियन्सला मोठ्ठा धक्का.! रोहित शर्मा IPLमधून घेणार माघार? BCCIच्या ट्विटमुळे चर्चेला उधाण
ट्रेंडिंग लेख-
-बीडच्या छोट्याशा गावातील ‘या’ पोरानं क्रिकेटचं मैदान अक्षरशः दणाणून सोडलं
-…आणि सचिनचे शब्द हार्दिकने खरे करून दाखवले !
-चार असे निर्णय, जे ऑस्ट्रेलिया दौऱ्यात भारतीय कसोटी संघासाठी ठरु शकतात महागडे