---Advertisement---

AUS vs IND Test Live : स्टार्क-कमिन्सच्या भेदक माऱ्याने भारताचा पहिला डाव २४४ धावांवर आटोपला

On: शुक्रवार, डिसेंबर 18, 2020 10:01 AM
---Advertisement---

ऑस्ट्रेलिया आणि भारत संघात ४ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्याला गुरुवारपासून (१७ डिसेंबर) ऍडलेड येथे सुरुवात झाली. हा सामना दिवस- रात्र कसोटी सामन्याच्या रूपात गुलाबी चेंडूने खेळवला जात आहे. आज या सामन्यातील दुसरा दिवस आहे. यात ऑस्ट्रेलियन गोलंदाजांच्या भेदक माऱ्यापुढे भारतीय संघाचा डाव २४४ धावांवर संपुष्टात आला.

भारतीय संघाने दुसऱ्या दिवशी अशाप्रकारे गमावल्या विकेट्स
दुसऱ्या दिवसाच्या पहिल्याच षटकातील म्हणजेच भारताच्या पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाकडून ९० वे षटक टाकण्यासाठी पॅट कमिन्स आला होता. यावेळी कमिन्सचा भेदक चेंडू अश्विनच्या बॅटची कड घेत यष्टीरक्षक टीम पेनच्या हातात गेला. त्यामुळे अश्विनला दुसऱ्या दिवशी एकही धाव करता आली नाही आणि तो तंबूत परतला.

सर्वांच्या नजरा लागून राहिलेला यष्टीरक्षक फलंदाज वृद्धिमान साहा दुसऱ्या दिवशी चांगली कामगिरी करेल, असे वाटत होते. परंतु त्याला खास कामगिरी करता आली नाही. तो ९१ वे षटक टाकण्यासाठी आलेल्या मिचेल स्टार्कच्या तिसऱ्याच चेंडूवर झेलबाद झाला. त्यामुळे त्याला दुसऱ्या दिवशी एकही धाव करता आली नाही. त्याने ९ धावांवरच पव्हेलियनची वाट धरली.

यानंतर ९२. २ षटकावर उमेश यादवने जोरदार फटका खेळला. परंतु चेंडू खूप उंच गेला आणि क्षेत्ररक्षक मॅथ्यू वेडने झेल घेतला. त्यामुळे यादव १ चौकार मारून ६ धावा करत तंबूत परतला. त्यानंतर जसप्रीत बुमराहचे आगमन झाले. बुमराहने १ चौकार मारला. परंतु त्यानंतर मोहम्मद शमीला झेलबाद व्हावे लागले. तो ९३.१ षटकात कमिन्सच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला.

विशेष म्हणजे दुसऱ्या दिवशी चारही भारतीय फलंदाज झेलबाद झाले.

स्टार्कने घेतल्या सर्वाधिक ४ विकेट्स
ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी टिच्चून मारा केला आणि भारताच्या उत्कृष्ट सहा फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला. यामध्ये वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कने सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या. यात त्याने सलामीवीर पृथ्वी शॉला डावातील पहिल्याच षटकाच्या दुसऱ्याच चेंडूवर शून्यावर, तर रहाणेला ४२ धावांवर पव्हेलियनचा रस्ता दाखवला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी वृद्धिमान साहा (०९), उमेश यादव (०६) यांना तंबूत धाडले. त्याच्यासोबतच पॅट कमिन्सनेही उत्तम कामगिरी करत ३ विकेट्स आपल्या खिशात घातल्या. कमिन्सने मयंक अगरवाल, आर अश्विन आणि मोहम्मद शमी यांची महत्त्वपूर्ण विकेट घेतली.

याव्यतिरिक्त जॉश हेजलवूड आणि नॅथन लायन यांनी प्रत्येकी १ विकेट्स आपल्या खिशात घातली.

पहिल्या दिवशी भारतीय संघाची कामगिरी
यापूर्वी भारतीय संघाने नाणेफेक जिंकत फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पहिल्या दिवसाअखेर संघाने ६ विकेट्स गमावत २३३ धावा केल्या होत्या. यामध्ये कर्णधार विराट कोहलीच्या महत्त्वपूर्ण ७४ धावांचा समावेश आहेत. सोबतच चेतेश्वर पुजारा (४३) आणि उपकर्णधार अजिंक्य रहाणेने (४२) धावांचे योगदान दिले. याव्यतिरिक्त इतर फलंदाजांना २० धावांचा आकडाही पार करता आला नाही.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---