नवी दिल्ली। कोरोना व्हायरसमुळे आयपीएलच्या १३ व्या हंगामाचे आयोजन युएईमध्ये होत आहे. बीसीसीआयच्या बायो बबलच्या कठोर नियमांमध्ये आयपीएलच्या तिसऱ्या आठवड्याला सुरुवात झाली आहे. आतापर्यंत झालेल्या आठवड्यांमध्ये हे स्पष्ट झाले आहे की, या हंगामात कोणत्याही संघाला कमी समजले जाऊ शकत नाही. प्रत्येक संघाने स्वत: ला सिद्ध केले आहे सोबतच विजयही मिळवले आहेत. कोरोना व्हायरसनंतर मिळालेल्या दीर्घ ब्रेकनंतर खेळाडू आयपीएलमध्ये चांगलेच उत्साहात होते. परंतु आता त्यांना एक चिंता भेडसावत आहे, ती म्हणजे युएईतील टॅक्स सिस्टीम म्हणजेच कर प्रणाली.
खेळाडूंच्या मानधनात होऊ शकते कपात
रिकाम्या स्टेडियममध्ये होत असलेल्या सामन्यांमध्ये संघांना आणि बीसीसीआयला आधीच मोठ्या नुकसानीचा सामना करावा लागला आहे. त्यात आता मध्य पूर्व राष्ट्रांचे वॅटचे नियम ही एक समस्या बनली आहे. नवीन मूल्यवर्धित कर कायद्यानुसार युएईमधील प्रत्येक सेवेवर कर आकारला जातो. हा नियम २०१८ मध्ये लागू झाला आहे. यापूर्वी जेव्हा २०१४मध्ये आयपीएलचे आयोजन युएईमध्ये झाले होते, तेव्हा अशाप्रकारचा कोणताही नियम नव्हता. इंडी स्पोर्ट्सने दिलेल्या वृत्तानुसार, नवीन नियमांमुळे आयपीएल खेळत असलेल्या खेळाडूंच्या पगारावरही वॅट कर लावण्यात येणार आहे.
फ्रँचायझींना याबाबत माहिती नाही
फ्रँचायझींना याबाबतीत कोणतीही माहिती नव्हती. किंग्स इलेव्हन पंजाबचे सीईओ एल सी गुप्ता यांनी म्हटले की, “आम्हाला याबाबतीत कोणतीही माहिती नाही तसेच कोणी सांगितलेही नाही. सध्या खेळाडूंच्या पगारात कोणतीही कपात होणार नाही.”
जर नियम लागू झाले, तर केवळ खेळाडूंच्या पगारावरच नाही, तर फ्रँचायझीच्या कमाईवरही परिणाम होईल. तरीही सध्या अद्याप बीसीसीआय आणि दुबई बोर्डाने याबाबतीत कोणतीही माहिती दिलेली नाही.