आयपीएलचा १३ वा हंगाम सध्या सुरु आहे. एक तप पूर्ण केलेल्या आयपीएल स्पर्धेने तितकेच वाद- विवादही पाहिले आहेत. या वादांनी अनेकदा खेळ बाजूला पडून सर्व लक्ष त्या वादावर केंद्रित झालं होतं. अशाच महत्त्वपूर्ण वादांचा घेतलेला आढावा.
५. चीअरलीडर्स विवाद – २०११
गॅब्रिएला पासक्यूलोट्टो या मुंबई इंडियन्ससाठी काम करणाऱ्या चीअरलीडरने एक ब्लॉग लिहिला होता. या ब्लॉगमधील गोष्टींमुळे आयपीएलची काळी बाजू समोर आली होती. गॅब्रिएलाने लिहिलं होतं, आम्ही अक्षरक्ष: वॉकिंग पॉर्न सारख्या झाल्या आहोत. हे क्रिकेटपटू अतिशय चारित्र्यहीन आणि खोडसाळ आहेत.
असभ्य वर्तन करणाऱ्या क्रिकेटपटूंची नावंही तिने लिहिली होती. मात्र त्याचवेळी एमएस धोनी आणि रोहित शर्मा हे अतिशय चांगले वागतात, ते त्यांच्या विश्वात असतात असंही गॅब्रिएलाने लिहिलं होतं. गॅब्रिएलाच्या ब्लॉगमुळे काही खेळाडूंची गोपनीयता धोक्यात आली, असं वृत्तांकन दक्षिण आफ्रिकेतील प्रसारमाध्यमांनी केलं.
कारण याप्रकरणात दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार ग्रॅमी स्मिथचं नाव समोर आलं होतं. त्या हंगामादरम्यान मुंबई इंडियन्सने गॅब्रिएलाचा करार रद्द केला होता.
४. शाहरुख खानला वानखेडेवर प्रवेशबंदी- २०१२
मॅच संपल्यानंतर सुरक्षारक्षकाशी झालेल्या वादामुळे बॉलिवूड अभिनेता आणि कोलकाता नाईट रायडर्स संघाचा सहमालक शाहरूख खानवर पाच वर्षांसाठी वानखेडे स्टेडियमवरील प्रवेशास बंदी घालण्यात आली. कोलकाताने मुंबईविरुद्धची मॅच जिंकल्यानंतर शाहरूख खानची मुलं आणि त्यांचे मित्र ग्राऊंडमध्ये जाताना दिसले.
सुरक्षारक्षकांनी त्यांना रोखायचा प्रयत्न केला. रागावलेल्या शाहरूख खानने हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला. सुरक्षारक्षकाशी त्याचा वाद झाला. या वादावरून मुंबई क्रिकेट असोसिएशनने शाहरूखच्या वानखेडेवरील प्रवेशावर बंदी घातली.
३. “स्लॅपगेट,” हरभजन – श्रीशांत थप्पड कांड- २००८
आयपीएलच्या पहिल्याच हंगामात हरभजन सिंगने श्रीसंतला थोबाडीत मारली होती. हरभजन सिंग त्यावेळी मुंबई इंडियन्सकडून खेळत होता, तर श्रीसंत किंग्ज इलेव्हन पंजाब संघाचा भाग होता. हरभजनने श्रीसंतला थोबाडीत मारणं कॅमेऱ्यात रेकॉर्ड झालं नाही, मात्र मॅच संपल्यानंतर प्रेझेंटेशन सेरेमनीआधी श्रीसंत रडत असल्याचं जगभरातील क्रिकेट चाहत्यांना दिसलं होतं.
पंजाब संघाचे तेव्हाचे कोच टॉम मूडी यांनी हरभजनचं वर्तन चुकीचं असल्याचं सांगितलं होतं. श्रीसंतने हे प्रकरण वाढवलं नाही आणि त्याने हरभजन मोठ्या भावाप्रमाणे असल्याचं सांगितलं. हरभजनवर कारवाई करण्यात आली आणि त्या हंगामातील उर्वरित सामने हरभजन खेळू शकला नाही. शिस्तभंगाचा दोषी आढळल्याने त्याचे मानधनही नाकारण्यात आलं.
बीसीसीआयने याप्रकरणाची स्वतंत्र चौकशी केली. त्यातही दोषी आढळल्याने त्याच्यावर पाच वनडे सामन्यांसाठीदेखील बंदीची कारवाई करण्यात आली. या संपूर्ण प्रकरणाला ‘स्लॅपगेट’ असं नाव मिळालं.
२. ललित मोदी यांची हकालपट्टी- २०१०
आयपीएलची संकल्पना ज्यांनी मांडली आणि अंमलात आणली त्या ललित मोदींनाच दोन वर्षांत पायउतार व्हावं लागलं.
२०१० मध्ये ललित मोदींना तीन कारणे दाखवा नोटिसा पाठवण्यात आल्या. गोपनीयता कराराचा भंग, प्रक्षेपण हक्क वितरणात कथित भ्रष्टाचार आणि लिलावात फेरफार असे हे तीन आरोप होते.
बीसीसीआयचे पदाधिकारी आणि आयपीएलचे सर्वेसर्वा ललित मोदी यांचं संस्थान बघता बघता खाली झालं. कोची टस्कर्स केरला संघासंदर्भात गोपनीय माहिती त्यांनी ट्वीट केली होती. या सगळ्याची परिणती म्हणजे त्याच वर्षी आयपीएल कमिशनर पदावरून त्यांची हकालपट्टी करण्यात आली.
१. स्पॉट फिक्सिंग घोटाळा – चेन्नई-राजस्थानवर बंदीची कारवाई- २०१३
२०१३ मध्ये उघडकीस आलेल्या स्पॉट फिक्सिंग प्रकरणाने आयपीएलच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण केलं. स्पॉट फिक्सिंगच्या आरोपांसाठी दिल्ली पोलिसांनी राजस्थान रॉयल्सच्या श्रीसंत, अंकित चव्हाण आणि अजित चंडिला यांना अटक केली.
मुंबई पोलिसांनी कथित सट्टेबाजी आणि बुकींबरोबरच्या संबंधांसाठी विंदू दारा सिंग आणि गुरुनाथ मय्यपन यांना अटक केली. मय्यपन हे बीसीसीआयचे तत्कालीन अध्यक्ष तसेच चेन्नई सुपर किंग्स संघाचे मालक एन. श्रीनिवासन यांचे जावई होते.
हे सगळं प्रकरण न्यायालयात गेल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्स या दोन संघांवर दोन वर्षांच्या बंदीची कारवाई केली. यामुळे चेन्नई आणि राजस्थान हे संघ २०१६ आणि २०१७ या वर्षी स्पर्धेत खेळू शकले नाहीत. श्रीसंतवर बीसीसीआयने आजीवन बंदीची कारवाई केली. या संपूर्ण प्रकरणामुळे आयपीएलची एक स्पर्धा म्हणून तसंच खेळाडूंच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं.
ट्रेंडिंग लेख-
-२०१० प्रमाणेच चेन्नई यंदाही होणार चॅम्पियन? नक्की काय आहेत कारणे
-मराठी मनाचा अभिमान.! नाव ‘तांबे’ पण खेळाडू मात्र सोन्यासारखा
-भारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार भाग १७ – क्रिकेटचा गंभीर शिलेदार
महत्त्वाच्या बातम्या-
-“१०० मीटरपेक्षा लांब षटकार ठोकल्यास द्याव्या अतिरिक्त धावा” – केएल राहुल
-दिल्लीला दुखापतींनी घेरले; रिषभ पंत पाठोपाठ आता खुद्द कर्णधारावरच आले संकट
–Video: आयपीएलमध्ये ‘बिहू’ डान्सची क्रेझ; शॉला शुन्यावर बोल्ड केल्यावर आर्चरचे थिरकले पाय