भारताचा क्रिकेटचा इतिहास पाहिला तर त्यात सौरव गांगुलीशी संबंधित अनेक अध्याय सापडतील. गांगुलीच्या नेतृत्वात भारतीय संघाने आक्रमकपणे खेळणे शिकले. अनेक संस्मरणीय सामने जिंकले. मैदानात विरोधकांना जशास तसे उत्तर देऊन एक उदाहरण समोर ठेवले. मग लॉर्ड्सच्या बाल्कनीमध्ये आपली जर्सी फिरवायची असो किंवा मुद्दाम टॉससाठी उशिरा जाणे असो.
नाणेफेकीच्या दरम्यान, सौरव गांगुली नेहमी उशिरा जायचा. विरोधी संघाचा कर्णधार त्याची प्रतीक्षा करत थांबायचा. ऑस्ट्रेलियाचा स्टीव्ह वॉ आणि इंग्लंडचा कर्णधार नासिर हुसेन यांनी अगदी गांगुलीविरूद्ध तक्रार केली होती. काही दिवसांपूर्वी इंग्लंडचे माजी कर्णधार नासिर हुसेन यांनीही या विषयावर म्हटले होते की, तो त्याचा तिरस्कार करत होता. कारण त्याला अनेकदा वाट पाहावी लागत होती.
भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू इरफान पठाण गांगुली नाणेफेकीच्या दरम्यान उशिरा का जात होता याचा खुलासा स्टार स्पोर्ट्सच्या ‘क्रिकेट कनेक्टेड’ या कार्यक्रमात खुलासा केला आहे.
वास्तविक पाहता, इरफान पठाणने सौरव गांगुलीच्या नेतृत्वाखाली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते.
इरफान म्हणाला, “मी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेलो होतो, तेव्हा गांगुलीने कर्णधार स्टिव्ह वॉ याला खूप वेळ वाट पाहावी लावली. त्यावेळी मी ड्रेसिंग रूममध्ये होतो. संघ व्यवस्थापकाने त्याला नाणेफेकीच्या आठवण करून दिली तरीही दादा वेळेवर पोहचला नाही. सिडनी कसोटीत सचिन पाजीने देखील दादाला टॉससाठी जाण्यासाठी सांगितले होते. दादा नेहमी बूट, स्वेटर, कॅप घालण्यामध्ये वेळ घालवायचा. जर एखाद्या व्यक्तीला उशीर झाला तर दबाव त्याच्या चेहऱ्यावर दिसून येऊ लागतो. मात्र, दादा कधीच घाईमध्ये दिसून आला नाही .
ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यात झालेल्या एका सामन्याची आठवण इरफानने करून दिली. तो म्हणाला, “या कसोटी सामन्यात स्टीव वॉ ला नाणेफेकीच्या दरम्यान बराच वेळ वाट पाहावी लागली होती. गांगुलीने या सामन्यात जाणून बुजून असे केले नव्हते. तो ड्रेसिंग रूममध्ये आपला ब्लेझर विसरला होता. कर्णधार म्हणून त्यांचीही मोठी मालिका होती आणि यात तो नर्वस होता.”