इंडियन सुपर लीग अर्थात आयएसएलच्या सातव्या हंगामातील तिसरा सामना फातोर्डा येथे खेळला गेला. भारतीय कर्णधार सुनील छेत्रीच्या नेतृत्वात खेळत असलेल्या बेंगलोर एफसी व गोवा एफसी यांच्या दरम्यानचा हा सामना २-२ अशा बरोबरीत सुटला. दोन्ही संघांनी सातव्या आयएसएल हंगामाची सुरुवात एक-एक अंक वाटून घेत केली. सामन्याचा मानकरी गोवा एफसीचा एगोर एंग्युलो ठरला.
बेंगलोरची वेगवान सुरुवात
सामना सुरू होताच दुसऱ्या मिनिटाला बेंगलोरचा कर्णधार सुनील छेत्रीने गोवा एफसीच्या गोलपोस्टवर आक्रमण केले. मात्र, त्याचा फटका गोलपोस्टच्या बाजूने गेला. सातव्या मिनिटाला बेंगलोरचा युवा मध्यरक्षक आशिक कुरूनियन याने मारलेला फटका जाळीचा वेध घेऊ शकला नाही. या नंतरही दोन्ही बाजूने गोल करण्याचे प्रयत्न केले गेले.
क्लायटन सिल्वाने मिळवून दिली बेंगलोरला आघाडी
सामन्यातील २७ व्या मिनिटाला बेंगलोर एफसीला एक थ्रो-इन मिळाला. हरमनज्योत खाबराने टाकलेला थ्रो-इन गोवा एफसीच्या ओर्टीजच्या डोक्याला चाटून वर उडाला. बेंगलोर एफसीकडून प्रथमच खेळत असलेल्या, ब्राझिलियन क्लायटन सिल्वाने संधी साधत हेडर मारला. गोवा एफसीच्या गोलरक्षक नवाजला चकवत चेंडू जाळीत जाऊन पडला. सिल्वाच्या या गोलमुळे बेंगलोरने सामन्यात आघाडी घेतली. त्यानंतर, पहिल्या सत्रातील उर्वरित वेळात गोवा एफसीने बरोबरी साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना अपयश आले.
बेंगलोरने वाढवली आपली आघाडी
दुसऱ्या सत्राच्या सुरुवातीलाच बेंगलोरने स्ट्रायकर डेशॉन ब्राऊनला मैदानात उतरवले. ब्राऊनच्या येण्याने बेंगलोर आक्रमणाला धार आली. त्यांनी गोव्याच्या गोलक्षेत्रात दोनवेळा धडक मारली. मात्र, गोल करण्यात त्यांना अपयश आले.
अखेरीस, ५७ व्या मिनिटाला मध्यरक्षकांनी रचलेल्या चालीला यश आले. ब्राऊनने उंचावरून दिलेल्या चेंडूला एरिक पार्तालूने हेडरद्वारे युवाननकडे सोपवले. आपल्या भक्कम बचावासाठी प्रसिद्ध असणाऱ्या अनुभवी युवाननने चेंडूला गोलजाळीत ढकलत; बेंगलोरची आघाडी दुप्पट केली.
गोवा एफसीचा जबरदस्त पलटवार
दोन गोलच्या पिछाडीनंतरही गोवा एफसी संघ दडपणात आला नाही. सामन्याच्या ५८ व्या मिनिटाला गोवा एफसीने आपला सर्वोत्कृष्ट भारतीय खेळाडू ब्रेंडन फर्नांडिसला मैदानात उतरवले. त्याने संघाला निराश न करता आक्रमक चाली रचल्या. ब्रेंडनने दिलेल्या पासवर ६६ व्या मिनिटाला एगोर एंग्युलोने गोव्यासाठी पहिला गोल केला. पहिल्या गोलच्या धक्क्यातून सावरत असतानाच; पुन्हा एकदा ब्रेंडन व एंग्युलोने बेंगलोरच्या बचावाला भेदले. एंग्युलोने युवा रोमेराच्या पासवर गोवा एफसीला बरोबरी साधून दिली.
गोवा एफसीने गाजवले सामन्यावर वर्चस्व
गोवाने एफसीने संपूर्ण सामन्यावर वर्चस्व गाजवले. गोव्याच्या खेळाडूंनी ६४ टक्के चेंडू आपल्याकडे राखण्यात यश मिळवले. मात्र, गोव्याच्या चार खेळाडूंना धसमुसळ्या खेळासाठी ‘येलो कार्ड’ देण्यात आले.