शनिवारी(३ ऑक्टोबर) आयपीएल २०२० च्या हंगामातील १६ वा सामना कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यात खेळला गेला. या सामन्यात दिल्लीने कोलकातावर १८ धावांनी विजय मिळवला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या दिल्ली संघाने २० षटकात ४ विकेट्स गमावत २२८ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात कोलकाता संघ २० षटकात ८ विकेट्स गमावत २१० धावाच करु शकला.
या सामन्यानंतर कोलकाताचा माजी कर्णधार गौतम गंभारने कोलकाताचा सध्याचा कर्णधार दिनेश कार्तिकला एक सल्ला दिला आहे. त्याने म्हटले आहे की कार्तिकने आंद्रे रसेल आणि ओएन मॉर्गननंतर फलंदाजीला यायला हवे.
शनिवारी कोलकाताकडून कार्तिकने ८ चेंडूत ६ धावाच केल्या. तसेच तो या सामन्यात ओएन मॉर्गनच्या आधी ५ व्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला होता आणि विशेष म्हणजे मॉर्गनने त्याच्या नंतर येऊनही १८ चेंडूत तुफानी ४४ धावांची खेळी केली. तसेच राहुल त्रिपाठीनेही ८ व्या क्रमांकावर फलंदाजी करताना १६ चेंडूत ३६ धावा केल्या. मागील काही सामन्यांपासून कोलकाताच्या मधल्या फळीतील फलंदाजी क्रमवारीत सातत्याने बदल होत आहेत. त्यामुळे आता कार्तिकवर त्याबद्दल टिका होत आहे.
गंभीरने क्रिकइन्फोशी बोलताना सांगितले की ‘राहुल त्रिपाठीला वरच्या क्रमांकावर फलंदाजीला पाठवले पाहिजे. दिनेश कार्तिकने मॉर्गन आणि रसेलनंतर सहाव्या क्रमांकावर फलंदाजी केली पाहिजे. तसेच सुनील नारायणने ८ व्या किंवा ९ व्या क्रमांकावर फलंदाजी करायला हवी. जर मॉर्गन चौथ्या आणि रसेल पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करणार असेल तर कार्तिक त्यानंतर फलंदाजी करु शकतो.’
यंदा कोलकाताने खेळलेल्या चारही सामन्यात नारायणने कोलकाताकडून सलामीला फलंदाजी केली आहे. पण त्याला फार काही खास कामगिरी करता आली नाही. त्याने ४ सामन्यात केवळ २७ धावाच केल्या आहेत.
याबरोबरच गंभीरने असेही म्हटले आहे की १९ वे षटक फिरकीपटू वरुण चक्रवर्तीला देणे, हा निर्णयसुद्धा कार्तिकचा चुकला होता. तो म्हणाला, ‘तूमच्या सर्वश्रेष्ठ गोलंदाजांनी १८, १९ आणि २० वे षटक टाकायला हवे. पण दुर्दैवाने असे झाले नाही. पॅट कमिन्सकडून या षटकांमध्ये गोलंदाजी करुन घ्यायला पाहिजे. जर फिरकी गोलंदाजांनी हे षटके टाकायला हवेत, असे वाटत असेल तर ते सुनील नारायणने टाकायला हवे. अगदी शिवम मावीलाही गोलंदाजी दिली जाऊ शकते, त्याने मागील सामन्यांमध्ये चांगली कामगिरी केली आहे.’
‘आंद्रे रसेलही ही भूमीका निभावू शकतो. वरुण चक्रवर्तीने पहिली काही षटके चांगली टाकली होती. पण तूम्ही एका युवा फिरकीपटूकडून १९ व्या षटकात चांगल्या कामगिरीची अपेक्षा करु शकत नाही. ते देखील शारजाहच्या मैदानात. कदाचीत हा चूकीचा निर्णय होता.’