इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल)चा तेरावा हंगाम अगदी उंबरठ्यावर आला आहे. आयपीएल २०२०ची सुरुवात होण्यासाठी केवळ ७ दिवस उरले आहेत. त्यामुळे सर्व आयपीएल फ्रंचायझी जोरदार तयारीला लागले आहेत. यामध्ये दिनेश कार्तिकच्या नेतृत्त्वाखालील कोलकाता नाईट रायडर्स (केकेआर) संघाचाही समावेश आहे.
केकेआरने आत्तापर्यंत २०१२ आणि २०१४ ला आयपीएलचे विजेतेपद जिंकले आहे. तसेच त्यांनी २०१६, २०१७ आणि २०१८ असे सलग तीन वर्षे प्लेऑफमध्येही स्थान मिळवले होते. आता केकेआर यावर्षी तिसरे विजेतेपद जिंकण्याच्या इराद्याने खेळताना दिसेल.
केकेआरचा यावर्षीचा पहिला सामना २३ सप्टेंबरला मुंबई इंडियन्स संघाविरुद्ध आबु धाबी येथे होणार आहे. आयपीएलच्या तेराव्या हंगामाची दमदार सुरुवात करण्यासाठी कार्तिक नक्कीच आपला पहिला जिंकण्याचा प्रयत्न करेल. त्यामुळे तो दमदार खेळाडूंसह मैदानावर उतरेल. या लेखात, केकेआरच्या पहिल्या सामन्यातील संभावित अंतिम ११ खेळाडूंचा आढावा घेण्यात आला आहे.
असा असेल, कोलकाता नाईट रायडर्सचा पहिल्या सामन्यातील संभावित प्लेइंग इलेव्हन संघ (Kolkata Knight Riders Predected Playing XI Of First Match Against Mumbai Indians) –
१. शुभमन गिल
भारतीय फलंदाज शुभमन गिल हा गेल्या २ हंगांमापासून कोलकाता नाईट रायडर्सचे प्रतिनिधित्त्व करत आहे. गतवर्षी त्याने दमदार प्रदर्शन सर्वांचे लक्ष आपल्याकडे वेधले होते. त्याने २०१९मध्ये १४ सामने खेळत ३२.८८च्या सरासरीने २९६ धावा केल्या होत्या. यात त्याच्या ३ अर्धशतकांचा समावेश आहे. त्याच्या या दमदार प्रदर्शनाला पाहता, कार्तिक त्याला यंदा सलामीला फलंदाजी करण्यासाठी उतरवेल.
२. सुनिल नरेन
वेस्ट इंडिजचा गोलंदाजी अष्टपैलू क्रिकेटपटू सुनिल नरेन हा पहिल्या सामन्यात शुभमन गिलबरोबर सलामीला फलंदाजीसाठी उतरु शकतो. २०१७ साली गौतम गंभीरने नरेनला सलामीला फलंदाजीसाठी उतरवले होते. त्यावेळी त्याने अनेक मॅच विनिंग खेळी केल्या होत्या. तसेच, त्याचे गतवर्षीचे फलंदाजी प्रदर्शनही दमदार राहिले होते. याबरोबरच तो युएईच्या मैदानावर फिरकी गोलंदाजी करु शकतो. त्यामुळे नक्कीच तो पहिल्या आयपीएल सामन्यात केकेआरचा भाग असेल.
३. नितीश राणा
आयपीएल २०२०मध्ये केकेआर संघाच्या पहिल्या सामन्यात नितीश राणाला तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी पाठवले जाऊ शकते. यावर्षी संघात रॉबिन उथप्पा नसल्यामुळे नेहमी चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करणारा राणा यंदा तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना दिसू शकतो. गतवर्षी त्याने १४ सामने खेळत ३४४ धावा केल्या होत्या. यात त्याच्या सर्वाधिक नाबाद ८५ धावांचा समावेश होता.
४. इयॉन मॉर्गन
आयपीएल २०२० लिलावात केकेआरने इयॉन मॉर्गनला ५ कोटी २५ लाख रुपयांना आपल्या संघात विकत घेतले होते. मॉर्गनने २०१९ सालच्या विश्वचषकात दमदार प्रदर्शन करत इंग्लंडला विश्वचषक जिंकून दिला होता. त्यामुळे या दमदार खेळाडूला नक्कीच केकेआरच्या पहिल्या सामन्यात अंतिम ११ मध्ये स्थान दिले जाईल. तो मधल्या फळीत दमदार भूमिका निभावू शकतो.
५. दिनेश कार्तिक
केकेआरचा कर्णधार दिनेश कार्तिक हा केवळ पहिल्याच सामन्यात नव्हे तर हंगामातील सर्व सामन्यात केकेआरचा भाग असेल. गतवर्षी कार्तिकने १४ सामन्यात नाबाद ९७ धावांच्या खेळीसह एकूण २५३ धावा केल्या होत्या. तरीही संघ प्ले ऑफमध्ये प्रवेश करु शकला नव्हता. म्हणून यंदा कार्तिक केकेआरला फक्त प्ले ऑफमध्ये प्रवेश न मिळवता, अंतिम सामना जिंकत ट्रॉफी जिंकून देण्याचा प्रयत्न करताना दिसेल. तसेच, तो इयॉन मॉर्गनसोबत मधल्या फळीत फलंदाजी करु शकतो.
६. आंद्रे रसल
कोलकाता नाईट रायडर्स संंघाचा धुरंदर फलंदाज आंद्रे रसल हा केवळ पहिल्या नव्हे तर हंगामातील सर्व सामन्यात संघाचा प्रमुख भाग असेल. हा विस्फोटक अष्टपैलू खेळाडू गतवर्षी संघाचा सर्वाधिक महत्त्वपूर्ण खेळाडू ठरला होता. त्याने केकेआरकडून सर्वाधिक धावा केल्या होत्या. पूर्ण हंगामात त्याने केवळ १४ सामन्यात ५१० केल्या होत्या. तर गोलंदाजी करताना ११ विकेट्स आपल्या नावावर केल्या होत्या.
त्याची कॅरेबियन प्रीमियर लीग २०२०मधील कामगिरीही उल्लेखनीय राहिली आहे. त्यामुळे या फॉर्ममध्ये खेळाडूला नक्कीच कार्तिक केकेआरच्या अंतिम ११ खेळाडूंमध्ये स्थान देईल.
७. कमलेश नागरकोटी
कमलेश नागरकोटी हा युवा भारतीय गोलंदाज वेगवान गोलंदाजीसह खालच्या फळीत फलंदाजी करण्याचीही कामगिरी करु शकतो. या खेळाडूने अ दर्जाच्या क्रिकेटमध्ये ९ सामन्यात १३१ धावा केल्या होत्या. यात त्याच्या सर्वाधिक नाबाद ५६ धावांचा समावेश होता. तर त्याने गोलंदाजी करताना ११ विकेट्स घेतल्या होत्या. त्यामुळे संघासाठी महत्त्वपूर्ण भूमिका निभावू शकतो.
८. कुलदिप यादव
आयपीएल २०२०च्या पहिल्या सामन्यात डावखुरा स्पिन गोलंदाज कुलदिप यादव हा अंतिम ११ खेळाडूंचा भाग असेल. गतवर्षी त्याला केवळ ९ सामने खेळायला मिळाले होते. दरम्यान त्याने फक्त ४ विकेट्स घेतल्या होत्या. परंतु, युएईतील मैदाने स्पिन गोलंदाजीसाठी सोईस्कर आहेत. त्यामुळे केकेआरचा कर्णधार कार्तिक त्याला यावर्षीच्या पहिल्या सामन्यात आजमावू शकतो.
९. वरुण चक्रवर्ती
भारतीय देशांतर्गत क्रिकेटमधील तमिळनाडू संघाचा फिरकीपटू वरुण चक्रवर्ती हा पहिल्या सामन्यात केकेआरच्या प्लेइंग इलेव्हनचा भाग असेल. यामागचे मुख्य कारण म्हणजे युएईतील मैदाने असणार आहेत. गतवर्षी वरुणला केकेआरकडून केवळ १ सामना खेळायला मिळाला होता. परंतु, यावर्षी तो संघासाठी खूप उपयोगी सिद्ध होऊ शकतो.
या गोलंदाजाची अ दर्जाच्या क्रिकेटमधील आकडेवारी प्रशंसनीय आहे. त्याने केवळ ९ अ दर्जाच्या क्रिकेट सामन्यात २२ विकेट्स चटकावण्याचा पराक्रम केला आहे.
१०. पॅट कमिन्स
केकेआरने आयपीएल २०२० लिलावात ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज पॅट कमिन्सला विक्रमतोड १५ कोटी ७५ लाख रुपयांना विकत घेतले होते. त्यामुळे तो नक्कीच केकेआरच्या प्लेइंग इलेव्हनचा भाग असेल. कमिन्सला जगातील सर्वात खतरनाक वेगवान गोलंदाजांमध्ये गणले जाते. त्यामुळे कार्तिक नक्कीच त्याला खेळण्याची संधी देईल.
११. प्रसिद्ध कृष्णा
वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णा हा केकेआरच्या पहिल्या सामन्यात प्लेइंग इलेव्हनचा भाग असेल. त्याने आतापर्यंत आयपीएलमध्ये १८ सामन्यात १४ विकेट्स घेतल्या आहेत. तर, देशांतर्गत स्तरावरील टी२० क्रिकेटमध्येही गतवर्षी त्याने २८ सामने खेळत २४ विकेट्स घेतल्या होत्या.
ट्रेंडिंग लेख –