जवळपास पंधरा वर्षाच्या प्रतीक्षेनंतर ‘बॅडेस्ट ऑन द प्लॅनेट’ म्हणून ओळखला जाणारा माईक टायसन शनिवारी (२८ नोव्हेंबर) बॉक्सिंग रिंगमध्ये उतरणार आहे. माजी वर्ल्ड हेवीवेट चॅम्पियन रॉय जोन्स ज्युनियर याच्यासमवेत तो दोन हात करेल. लॉस एंजेलिस येथील स्टॅपल सेंटर येथे होणारा हा सामना एक प्रदर्शनीय सामना असेल. या सामन्यात कोणीही अधिकृतपणे विजेता असणार नाही.
खास सामन्यासाठी खास नियम आणि खास पंच
हेवीवेट बॉक्सिंग इतिहासातील दिग्गज असलेले टायसन व जोन्स यांच्यातील सामन्यासाठी काही विशेष नियम बनविण्यात आले आहेत. या दोघांचे ग्लोव्हज १०० औस वजनाचे असतील. तसेच, तीन मिनिटांच्या ८ फेऱ्या या सामन्यात खेळविण्यात येतील. दोघांनाही या सामन्यावेळी हेडगियर वापरता येणार नाही. कोणत्याही खेळाडूला कट लागला तर सामना थांबवण्याचा अधिकार पंचांना देण्यात आला आहे. काही माजी बॉक्सर्स या सामन्यात पंचांची भूमिका पार पाडतील.
टायसनने दिले होते आव्हान
एका महिन्यापूर्वी टायसनने आपण एक प्रदर्शनीय सामना खेळण्यासाठी उत्सुक असल्याचे म्हटले होते. या सामन्यासाठी त्याने रॉय जोन्स याला विचारणा केली होती. दोन्ही खेळाडूंना आंतरराष्ट्रीय उत्तेजक द्रव्य प्रतिबंधक संघटना अर्थात वाडाने खेळण्याची परवानगी दिली आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार हा सामना २९ नोव्हेंबर २०२० रोजी सकाळी ७:३० वाजता सुरू होईल. अमेरिकेतील ट्रिलर या ओटीटी प्लॅटफॉर्मकडून या सामन्याचे थेट प्रक्षेपण करण्यात येईल.
जगातील सर्वात वादग्रस्त बॉक्सर आहे टायसन
सध्या ५४ वर्षाच्या असलेल्या टायसनने आपला अखेरचा व्यावसायिक बॉक्सिंग सामना २००५ मध्ये खेळला होता. टायसनने ५८ सामने खेळताना ५० सामन्यात विजय मिळवलेले. त्यापैकी, ४४ सामने त्याने नॉक-आउट पद्धतीने जिंकले होते. माजी बॉक्सर होलीफिल्डच्या कानाचा चावा घेतल्याने, त्याच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आलेली. निवृत्तीनंतरही तो अनेक वादग्रस्त कारणांनी नेहमीच चर्चेत राहिलेला दिसतो.
टायसनचा कट्टर प्रतिस्पर्धी होता जोन्स
टायसनचा कट्टर प्रतिस्पर्धी राहिलेल्या ५१ वर्षीय रॉय जोन्सनेही व्यवसायिक बॉक्सिंग सोडण्यापूर्वी ७५ सामने खेळले होते. त्यापैकी, ६६ सामन्यात त्याने विजय मिळवला होता. जोन्सने १९८६ सेऊल ऑलिम्पिकमध्ये अमेरिकेचे प्रतिनिधित्व केले होते. निवृत्तीनंतर त्याने संगीत क्षेत्रात आपली कारकीर्द पुढे नेली.






