गुरुवारी (१ ऑक्टोबर) किंग्स इलेव्हन पंजाब विरुद्ध मुंबई इंडियन्स संघात दुबई येथे आयपीएल२०२० चा तेरावा सामना झाला. या सामन्यात मुंबई इंडियन्स संघाचा कर्णधार रोहित शर्माने एक विक्रम आपल्या नावावर केला.
प्रथम फलंदाजी करताना मुंबई इंडियन्सकडून सलामीला फलंदाज करत रोहितने ४५ चेंडूत ७० धावांची अर्धशतकी खेळी केली. यात ३ षटकार आणि ८ चौकारांचा समावेश होता. रोहितची ही ५० पेक्षा अधिक धावा करण्याची ३९ वी वेळ होती.
रोहितने या विक्रमात एबी डिविलियर्स (३८) आणि शिखर धवन (३७) या धुरंदरांना मागे टाकले आहे, तर ‘मिस्टर आयपीएल’ सुरेश रैनाची बरोबरी केली आहे. रैनानेही आयपीएलमध्ये यापूर्वी ३९ पेक्षा अधिक वेळा ५० पेक्षा अधिक धावा करण्याचा कारनामा केला होता.
याव्यतिरिक्त आयपीएलमध्ये सर्वाधिक ५० पेक्षा अधिक धावा करण्याच्या बाबतीत सनरायझर्स हैदराबाद संघाचा विस्फोटक फलंदाज डेविड वॉर्नर अव्वल क्रमांकावर आहे. वॉर्नरने ४८ वेळा असा कारनामा केला आहे. सोबत दुसऱ्या क्रमांकावर रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचा कर्णधार विराट कोहली आहे. त्याने आयपीएलमध्ये सर्वाधिक ४१ वेळा ५० पेक्षा अधिक धावा करण्याचा विक्रम केला आहे.
रोहितने आतापर्यंत आयपीएलमध्ये १९२ सामने खेळले आहेत. त्यात त्याने ३१.८७ च्या सरासरीने ५०६८ धावा केल्या आहेत. या धावा करताना त्याने १ शतकही ठोकले आहे.
आयपीएलमध्येे सर्वाधिक वेळा ५० पेक्षा अधिक धावा करणारे खेळाडू
४८ वेळा- डेविड वॉर्नर
४१ वेळा- विराट कोहली
३९ वेळा- रोहित शर्मा
३९ वेळा- सुरेश रैना
३८ वेळा- एबी डिविलियर्स
३७ वेळा- शिखर धवन