भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा ८ विकेट्सने पराभव केला. पहिले दोन दिवस आघाडीवर असलेल्या भारतीय संघाला तिसऱ्या दिवशीच्या पहिल्या सत्रात ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स आणि जोश हेजलवूड यांनी केवळ 36 धावांवर गारद केले. यानंतर ऑस्ट्रेलियन संघाने केवळ दोन गडी गमावत सहजपणे लक्ष्य पूर्ण केले. भारताच्या या पराभवानंतर मेलबर्न येथे होणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी प्लेईंग इलेव्हन मध्ये अनेक बदल दिसू शकतात. याच दरम्यान बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमी (NCA) येथेदेखील युवा खेळाडूंना राहुल द्रविड यांच्या मार्गदर्शनाखाली कसोटी क्रिकेटसाठी तयार केले जात आहे.
नुकत्याच आलेल्या एका वृत्तानुसार, कर्नाटकचा युवा खेळाडू देवदत्त पडिक्कलला सलामीवीर म्हणून एनसीएमध्ये प्रशिक्षण दिले जात आहे. आगामी मालिकेमध्ये कदाचित त्याचा भारतीय संघात समावेश केला जाऊ शकतो.
माध्यमांतील वृत्तानुसार, एनसीएमध्ये कसोटी क्रिकेटसाठी खेळाडूंना प्रशिक्षण दिले जात आहे. आगामी इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत किंवा भविष्यात या खेळाडूंना संधी दिली जाऊ शकते. या सर्वांमध्ये देवदत्त पडिक्कल या युवा खेळाडूकडे भविष्यातील सलामीवीर म्हणून बघितले जात आहे.
देवदत्त पडिक्कलने देशांतर्गत क्रिकेटमध्ये उत्तम कामगिरी केली आहे. नुकत्याच पार पडलेल्या आयपीएलमध्ये विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाकडून खेळताना, त्याने 15 सामन्यात 473 धावा केल्या होत्या. यात त्याने 5 अर्धशतके देखील झळकावली होती.
भविष्यातील संघ बांधणीसाठी, बीसीसीआय सध्या युवा खेळाडूंकडे विशेष लक्ष देताना दिसत आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत देखील उर्वरित सामन्यात युवा यष्टीरक्षक रिषभ पंत व शुबमन गिल यांना संधी दिली जाऊ शकते. बंगळुरु स्थित राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचा अध्यक्ष दिग्गज क्रिकेटपटू राहुल द्रविड आहे. त्यामुळे द्रविडच्या मार्गदर्शनाखाली युवा खेळाडू आपल्या खेळात आणखी सुधारणा करतील अशी आशा बाळगली जात आहे.
दरम्यान भारत आणि
ऑस्ट्रेलिया दरम्यान दुसरा कसोटी सामना 26 डिसेंबरपासून मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर होणार आहे. नियमित कर्णधार विराट कोहलीच्या अनुपस्थितीत अजिंक्य रहाणे भारतीय संघाचे नेतृत्त्व करणार आहे. पहिल्या सामन्यातील पराभवाला विसरून भारतीय संघ नव्या जोशात मैदानात उतरेल, अशी आशा सर्व क्रिकेट चाहत्यांना आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
‘बॉक्सिंग डे’ कसोटीत टीम इंडिया उतरणार नव्या जोशात; जडेजा, राहुल, गिलची संघात होणार एन्ट्री?
मोठी बातमी! भारताला जोरदार धक्का, रवींद्र जडेजा झाला दुखापतग्रस्त
‘नवरा दुखापतीने त्रस्त, बायको दुसऱ्या क्रिकेटपटूसोबत पार्टी करण्यात व्यस्त’