कोणताही खेळ असो अनेक विक्रम बनत असतात तसेच मोडीतही निघत असतात, परंतु कोणताही विक्रम पहिल्यांदा जेव्हा बनतो त्या विक्रमला एक वेगळेच वलय असते. क्रिकेटच्या मैदानावर तर, सामन्यागणिक विक्रम बनून मोडीत निघालेले आपण पाहतो. असाच एक विक्रम २००५ मध्ये आजच्या दिवशी झाला होता. कसोटी क्रिकेटमध्ये ६०० बळी घेण्याचा आणि तो दैदिप्यमान विक्रम बनविला होता ऑस्ट्रेलियाचा सर्वकालीन महान लेगस्पिनर शेन वॉर्न याने.
सन २००५च्या अॅशेस मालिकेच्या तिसर्या कसोटीत इंग्लंडचा कर्णधार मायकल वॉनने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. पहिल्या दिवशीची ओल्ड ट्रॅफर्डची ती पाटा खेळपट्टी पाहून दोन्ही कर्णधारांना फलंदाजीच करायची होती. मात्र, नशिबाने वॉनची साथ दिली.
ऑस्ट्रेलियाचा तेजतर्रार वेगवान गोलंदाज ब्रेट ली याने अँड्र्यू स्ट्रॉसला स्वस्तात बाद करत झकास सुरुवात केली होती. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेला कर्णधार वॉन व सलामीवीर मार्क ट्रेस्काॅथिकने त्यानंतर मात्र, ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना दुसऱ्या यशासाठी चांगलेच झगडवले. पहिले सत्र खेळून काढताना त्यांनी वैयक्तिक अर्धशतके पूर्ण केली होती. दुसऱ्या सत्रात पण, या जोडीने पहिल्या सत्रासारखा खेळ सुरू ठेवला.
वेगवान गोलंदाजांसोबतच फिरकी गोलंदाज ही निष्प्रभ ठरत होते. मॅकग्रा, ली व जेसन गिलेस्पी या वेगवान त्रिकुटासोबत शेन वॉर्नला देखील पहिल्या स्पेलमध्ये यश लाभले नाही. ४१ षटके उलटून गेली होती आणि धावसंख्या १६०-१ अशी भक्कम झालेली.
डावाच्या ४२ व्या षटकात कर्णधार रिकी पॉंटिंगने पुन्हा चेंडू, आपला हुकमी एक्का असलेल्या शेन वॉर्नच्या हाती सोपविला. सामना सुरू होण्याआधी, वॉर्नच्या नावे ५९९ बळी होते. वॉर्न या सामन्यात ६०० बळी पूर्ण करणार याची शाश्वती संपूर्ण क्रिकेट विश्वाला होती. मात्र, कधी ? हा प्रश्न अनुत्तरित होता.
या सामन्यापूर्वी वॉर्नने मालिकेच्या पहिल्या दोन सामन्यात १५.३१ च्या सरासरीने ६/४६ च्या सर्वोत्कृष्ट आकडेवारीसह १६ बळी टिपले होते.
पुढे ४२ व्या षटकातील, पाचव्या चेंडूवर ट्रेस्कॉथिकने स्वीप करण्याचा प्रयत्न करताच बॉलने बॅटच्या मागच्या भागाची कड घेतली आणि चेंडू हवेत उडाला. पहिल्या प्रयत्नात झेल घेण्यात, यष्टीरक्षक अॅडम गिलख्रिस्ट थोडक्यात अपयशी ठरला मात्र, मांडीचा आधार घेत त्याने चेंडू पकडला. बिली बाऊडेन यांनी आपल्या खास शैलीत बोट उंचावले
“.. आणि हा शेन वॉर्नचा ६०० वा कसोटी बळी ! काय क्षण आहे हा !!”
Bowled, Shane! On this day in 2005, the great Shane Warne became the first man ever to take 600 Test wickets 😍😍 pic.twitter.com/LzfIn61Dls
— cricket.com.au (@cricketcomau) August 11, 2020
समालोचक मार्क निकोलसचे हे शब्द संपूर्ण जग टेलिव्हिजनवर ऐकत होते. एका दिग्गजाच्या कर्तृत्वाचे कौतुक करण्यासाठी मैदानावरील सर्व प्रेक्षक उभे राहिले. एका असामान्य खेळाडूच्या कौशल्य आणि व्यक्तिमत्त्वाचे हे कौतुक होते. ज्याला राष्ट्राच्या सीमा नव्हत्या.
सर्व संघसहकरी वॉर्नभोवती अभिनंदनासाठी गोळा झाले होते. वॉर्नने आपले दोन्ही हात उंचावून प्रेक्षकांचे अभिवादन स्वीकारले. १२६ कसोटीत त्याने ही ऐतिहासिक कामगिरी करून दाखवली होती. विशेष म्हणजे, १९९३ मध्ये याच मैदानावर वॉर्नने माईक गॅटिंगला बाद करताना, ‘शतकातील सर्वोत्तम चेंडू’ टाकला होता.
तोपर्यंत कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या मुथय्या मुरलीधरनच्या नावावर ९३ कसोटीत ५४९ विकेट्स होत्या. यामुळे कसोटीत ६०० विकेट्स पहिल्यांदा घेण्याचा विक्रम वॉर्नच्या नावावर जमा झाला होता.
तथापि, वॉर्नच्या प्रयत्नांनंतरही इंग्लंडने ४४४ अशी भक्कम धावसंख्या उभारली आणि ऑस्ट्रेलियाला ३०३ धावांवर रोखून, पहिल्या डावात १४२ धावांची आघाडी घेतली. वॉर्नने फलंदाजीत सुद्धा १२२ चेंडूंत ९० धावा फटकावत, ऑस्ट्रेलिया जास्त संकटात जाणार नाही याची काळजी घेतली.
अखेरच्या डावात, ऑस्ट्रेलिया २६४-७ वर संघर्ष करत असताना वॉर्नने पुन्हा ३४ धावांची महत्त्वपूर्ण खेळी साकारली. शेवटी, ब्रेट ली आणि ग्लेन मॅकग्रा या अखेरच्या जोडीने १७ धावा जोडून ऑस्ट्रेलियाला बरोबरी साधून दिली.
विशेष म्हणजे, ६०० बळींनंतर, वॉर्ननेच सर्वप्रथम ७०० बळींचा टप्पा पार केला. अखेर, १४५ कसोटीत ७०८ बळी घेत वार्नने २००७ मध्ये आपली अप्रतिम कारकीर्द संपवली.
महत्त्वाच्या बातम्या-
चाहत्यांचा लाडका शेन..! जेव्हा भारतीय चाहत्यासाठी शेन वॉर्न थेट गर्दीत घुसला होता, पाहा तो व्हिडिओ
‘या’ भारतीयाच्या विकेटने २९ वर्षांपूर्वी झाली होती शेन वॉर्न पर्वाची सुरुवात…