आयपीएलचा १३ वा हंगाम १९ सप्टेंबरपासून सुरु होणार आहे. कोरोना व्हायरसचा धोका लक्षात घेता हा हंगाम यंदा भारताऐवजी युएईमध्ये खेळवण्यात येणार आहे. त्यामुळे सर्व संघ युएईमध्ये पोहचले आहेत. पण याचदरम्यान चेन्नई सुपर किंग्स संघातील १० ते १२ सदस्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याची मोठी बातमी सर्वांसमोर आली. यामध्ये दीपक चाहर आणि ऋतुराज गायकवाड या खेळाडूंचाही समावेश आहे.
त्यामुळे आता खेळाडूंच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. तसे पाहिले तर युएईला पोहचल्यानंतर प्रत्येक संघातील सदस्यांची विमानतळावर कोरोना चाचणी घेण्यात आली. त्यानंतर ६ दिवसांसाठी सर्वांना क्वारंटाईन करण्यात आले होते. यावेळी पहिल्या, तिसऱ्या आणि पाचव्या दिवशी सर्वांची कोरोना चाचणी घेण्यात येणार होती. या चाचण्यांनंतरच चेन्नई सुपर किंग्सच्या संघातील काही सदस्याचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
त्यामुळे आता चेन्नई सुपर किंग्सच्या सदस्यांचा क्वारंटाईनचा कालावधी वाढविण्यात आला आहे. कारण जोपर्यंत कोरोना अहवाल निगेटिव्ह येत नाही तोपर्यंत खेळाडूंना जैव-सुरक्षित वातावरणात प्रवेश दिला जाणार नाही.
असे असतानाच मागील २ दिवसात केवळ चेन्नई सुपर किंग्स संघातील सदस्यांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने त्यांच्या चेन्नईतील ५ दिवसांच्या कॅम्पवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. चेन्नई संघ २१ ऑगस्टला दुबईला आला होता. त्याआधी १६ ते २० ऑगस्ट दरम्यान चेन्नईचा ५ दिवसांचा कॅम्प कर्णधार एमएस धोनीच्या आग्रहाखातर चेन्नीईतील एमएस चिदंबरम स्टेडियममध्ये (चेपॉक स्टेडियम) आयोजित केला होता. या कॅम्पमध्ये धोनीसह, सुरेश रैना, दीपक चाहर, ऋतुराज गायकवाड, केदार जाधव, अंबाती रायडू, मुरली विजय, पियुष चावला अशा खेळाडूंचा समावेश होता.
हा कॅम्प आयोजित करण्याआधी जरी चेन्नई सुपर किंग्सने सर्व अधिकृत परवानगी घेतली असली तरी ज्या ठिकाणी स्टेडियम आहे तो चेन्नईतील ट्रप्लिकेन भाग कोविड-१९ हॉटस्पॉट आहे. तसेच चेन्नई कोरोनाचा सर्वाधिक परिणाम झालेल्या शहरांपैकी एक आहे. चेन्नईमध्ये आत्तापर्यंत १,३१,८६९ कोरोना पॉझिटिव्ह प्रकरणे आढळली आहे. त्याचबरोबर चेन्नईतील आसपासच्या भागातून स्टेडियमवर ग्राऊंड स्टाफमधील काही सदस्य येत होते.
तरी संघातील सदस्यांचा कोरोना अहवाल आणि या कॅम्पमध्ये थेट संबंध दिसून आला नसला, तरी या व्हायरसची लागण झाल्याचे निदान होण्याचा कालावधी साधारण १४ दिवसांचा असल्याने आणि अन्य गोष्टी लक्षात घेता या कॅम्पवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
संघातील सदस्य पॉझिटिव्ह –
आत्तापर्यंत आयपीएलमधील केवळ चेन्नई सुपर किंग्स संघातील सदस्यांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यादरम्यान खेळाडूंनी काही नियम न पाळण्यावरही आता लक्ष वेधले गेले आहे. कारण ज्यावेळी चेन्नई सुपर किंग्सचा चेपॉक स्टेडियमवर कॅम्प आयोजित करण्यात आला होता, त्यावेळेसचे व्हायरल झालेल्या फोटो आणि व्हिडिओदरम्यान दिसून येते की सुरुवातीचे कोरोना चाचणी अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर खेळाडू स्टेडियममध्ये मास्कवैगरे न वापरता फिरत होते. तसेच सोशल डिस्टंसिंगही पाळताना दिसले नाहीत. शिवाय दुबईला येतानाच्या फोटोमध्येही खेळाडूंनी मास्क न घातल्याचे दिसत होते. या गोष्टींवर आत्तापर्यंत लक्ष वेधले गेले नव्हते. परंतु आता त्यांच्या संघातील सदस्यांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने या गोष्टींवरही चर्चा व्हायला सुरुवात झाली आहे. तसेच सुरक्षेसाठी नियम पाळणे महत्त्वाचे असल्याचेही सिद्ध होत आहे.
सुरेश रैना पडला आयपीएलमधून बाहेर –
आयपीएल सुरु होण्याआधी चेन्नई सुपर किंग्सला एकामागोमाग एक धक्के बसत आहेत. चेन्नई संघातील महत्त्वाचा खेळाडू असलेला सुरेश रैना या आयपीएलच्या हंगामातून बाहेर पडला आहे. त्याच्या बाहेर पडण्यामागील वैयक्तिक कारण असल्याचे सांगण्यात आले आहे. पण अनेकांनी त्यामागील कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव हे एक महत्त्वाचे कारण असू शकते असा अंदाज बांधला आहे.
आयपीएलसाठी राहिले कमी दिवस –
आयपीएलचा १३ वा हंगाम सुरु होण्यासाठी आता केवळ २० दिवस राहिले आहेत. असे असताना संघातील १० पेक्षाही अधिक सदस्य कोरोना पॉझिटिव्ह आल्याने चेन्नई सुपर किंग्ससाठी डोकेदुखी ठरत आहे. कारण आता त्यांच्या सदस्यांना अन्य संघांपेक्षा आणखी ज्यादाचा १ आठवडा क्वांटाईनमध्ये रहावे लागणार आहे. त्यामुळे त्यांच्या सरावालाही उशिरा सुरुवात होईल. इतकेच नाही तर या येत्या आठवड्यातही प्रत्येकाचा कोरोना अहवाल निगेटिव्ह येणे गरजेचे आहे. त्याशिवाय त्यांना जैव-सुरक्षित वातावरणात प्रवेश करता येणार नाही. या क्वारंटाईनदरम्यान खेळाडूंना त्यांच्या खोलीबाहेरही येण्याची परवानगी देण्यात आलेली नाही.
त्यामुळे आता चेन्नई सुपर किंग्स समोर आयपीएल सुरु होण्याआधी सर्व परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे आव्हान असेल. त्यातच अनेक खेळाडू मागील ५ महिन्यांमध्ये क्रिकेट खेळलेले नसल्याने आणि आत्ताही जर सरावासाठी पुरेसा वेळ मिळाला नाही तर या सर्वांचा परिणाम संघाच्या कामगिरीवर होऊ शकतो.
सीएसके पडणार आयपीएलमधून बाहेर? –
या आठवड्याच्या अखेरीस आयपीएलच्या या मोसमाचे वेळापत्रक घोषित होणार होते. परंतु चेन्नई सुपर किंग्स संघात कोरोना पॉझिटिव्ह सदस्य आढळल्याने वेळापत्रकाची घोषणा देखील स्थगित करण्यात आली आहे. अशा परिस्थितीत जर वेळेअगोदर परिस्थिती नियंत्रणात आली नाही तर चेन्नई सुपर किंग्स यावेळेसच्या आयपीएल हंगामातून बाहेर पडणार का हे पहावे लागेल. तसेच या सर्व गोष्टींचा आयपीएलच्या १३ व्या हंगामाच्या आयोजनावरही आता काय परिणाम होतो, हे पहावे लागणार आहे.
अजूनतरी चेन्नई व्यतिरिक्त अन्य संघांच्या बाबतीत कोरोना पॉझिटिव्हची कोणतीही बातमी समोर आलेली नाही. तसेच अन्य संघांनी दुबईला येण्याआधी कोणत्याही प्रकारचे कॅम्प आयोजिक केले नव्हते. केवळ काही ठिकाणी छोट्या प्रमाणात त्यांनी सराव केला होता. जसे मुंबई इंडियन्स मुंबई बाहेर काही खेळाडूंसाठी सराव सत्र आयोजित केले होते. तर किंग्स इलेव्हन पंजाब संघातील बंगळुरुमधील रहिवासी असलेल्या खेळाडूंनी प्रशिक्षक अनिल कुंबळेसह सराव केला होता.
ट्रेंडिंग लेख –
एकाच ओव्हरमध्ये ३० धावा काढणारे आयपीएलमधील ५ सुपरस्टार, एकाने तर ३७ धावांचा केलाय कारनामा
IPLमध्ये सामन्यात सीएसकडेकडून सर्वाधिक धावा करणारे ३ सुपरस्टार, तिसरे नाव आश्चर्यकारक
१० कोटी रुपये मिळूनही आयपीएलमध्ये सुपर डुपर फ्लाॅप ठरलेले ३ भारतीय खेळाडू
महत्त्वाच्या बातम्या-
पुरंदरचा धुरंधर घेणार सुरेश रैनाची जागा
सुरेश रैनाच्या बाहेर जाण्याने आयपीएल इतिहासातील सर्वात मोठ्या विक्रमाला लागणार ब्रेक
आयपीएलमध्ये चेन्नईकडून खेळणारा पुणेकर क्रिकेटर कोरोना पाॅझिटिव्ह