मुंबई । पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज वसीम अक्रम हे आपल्या कार्यकीर्दीत रिव्हर स्विंग साठी प्रसिद्ध होते. वाऱ्याच्या वेगाने धावत येत चेंडू सुपरसॉनिक वेगाने टाकून फलंदाजांची तारांबळ उडवायचा. भल्या भल्या फलंदाजांमध्ये धडकी भरवणाऱ्या अक्रमने नुकतेच जगातील टॉप फाइव फलंदाज निवडले आहे. आश्चर्याची बाब म्हणजे या टॉप पाच सर्वोत्कृष्ट फलंदाजांमध्ये सचिनला शेवटच्या म्हणजे पाचव्या स्थानावर ठेवले आहे.
सचिन तेंडुलकर यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शतकांचे शतक साजरे केले. कसोटीत 15 हजार 921 आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये 18 हजार 426 सर्वाधिक धावा केल्या. आपल्या कारकीर्दीत विक्रमांचाही विक्रम करणारे सचिन तेंडुलकर यांना पाचव्या स्थानावर ठेवल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
वसीम अक्रम एका यूट्यूब चॅनलवर बोलताना म्हणाले की, “माझ्या कारकिर्दीत क्रमांक एकचा फलंदाज म्हणजे व्हिवियन रिचर्ड्स. तंत्रशुद्ध फलंदाजी आणि त्याचा सामन्यात झालेला परिणाम याचा विचार केला तर माझ्या डोक्यात विवियन रिचर्ड्स यांचे नावे येते. मी पाँटिंगपासून ते मॅथ्यू हेडन यांना गोलंदाजी केली पण व्हिवियन रिचर्ड्स यांच्या सारखा दुसरा कोणीच नाही.”
ते म्हणाले, “दुसऱ्या क्रमांकावर मी न्यूझीलंडचे माजी कर्णधार मार्टिन क्रो यांना ठेवीन. कारण ज्या काळात रिव्हर्सिंग कुणालाच माहीत नव्हते त्यावेळी क्रो लिलया खेळून काढायचे. मार्टिन क्रो यांनी पाकिस्तानमध्ये खेळताना रिव्हर स्विंगचा सामना करत दोन सोनेरी शतक ठोकले.
वसिम अक्रमने ब्रायन लाराला तिसऱ्या स्थानावर ठेवले. ते म्हणाले, “ब्रायन लारा एक वेगळ्या प्रकारचा फलंदाज होते. त्यांना गोलंदाजी करणे फारच अवघड होते. ते नेहमी वेगवेगळया प्रकारच्या बॅट वापरायचे. ज्यामुळे गोलंदाजाला गोलंदाजी करताना समजत नसायचे. चौथा क्रमांकासाठी इंजमाम उल हकला निवडलो. कारण त्याच्या विरोधात मी खूप कमी सामने खेळलो. तो जगातील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक आहे.”
“मी सचिन तेंडुलकरला पाचव्या स्थानावर ठेवलो. कारण मी त्याला कसोटीत जास्त गोलंदाजी केली नाही. यासोबत मी आणि वकार सचिनविरुद्ध दहा वर्षे कसोटी खेळलो नाही. 1989 ते 1999 या कालावधीत सचिनचा आणि आमचा आमना-सामना झाला नाही. एक गोलंदाज म्हणून मी त्याची पारख करू करू शकलो नाही असेही त्यांनी नमूद केले.”