मुंबई । मँचेस्टरमध्ये पाकिस्तानचा 3 गडी राखून पराभूत केल्यानंतर इंग्लंडने, साऊथॅम्प्टन येथे होणार्या दुसर्या कसोटी सामन्यासाठी संघाची घोषणा केली आहे. इंग्लंडने बेन स्टोक्सऐवजी 14 सदस्यीय इंग्लंड संघात वेगवान गोलंदाज ओली रॉबिनसनला स्थान दिले आहे. वैयक्तिक कारणास्तव स्टोक्सने उर्वरित मालिकेत न खेळण्याचा निर्णय घेतला आहे.
इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यातील दुसरा कसोटी सामना गुरुवारी साऊथॅम्प्टन येथे खेळविण्यात येणार असून यजमान संघाने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.
ओली रॉबिन्सन हा उजव्या हाताने वेगवान गोलंदाजी करतो. त्याने 57 प्रथम श्रेणी सामन्यांत 244 बळी घेतले आहेत. याशिवाय त्याने चांगली फलंदाजीही केली असून 1 शतक आणि 5 अर्धशतकेही त्याने आपल्या नावावर केली आहेत.
इंग्लंडने ख्रिस वोक्स आणि जोस बटलरच्या शानदार खेळीमुळे जोरदार पुनरागमन करत पहिली कसोटी तीन गडी राखून जिंकली. इंग्लंडनेही त्यांच्या शेवटच्या घरच्या कसोटी मालिकेत वेस्ट इंडिजला पराभूत केले होते.
इंग्लंड संघ-
जो रूट, जेम्स अँडरसन, जोफ्रा आर्चर, डोमिनिक बेस, स्टुअर्ट ब्रॉड, रोरी बर्न्स, जोस बटलर, जॅक क्रोली, सॅम कुर्रान, अॅली पोप, ऑली रॉबिनसन, डॉम सिब्ली, ख्रिस वॉक्स आणि मार्क वूड.