संघ निवडताना कर्णधार उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, अष्टपैलू क्रिकेटपटू आणि यष्टीरक्षकाची निवड करतो. याबरोबरच एखाद्या कर्णधारासाठी पार्ट टाईम गोलंदाजाला (गरजेनुसार गोलंदाजी करणारा फलंदाज) संघात स्थान देणे फायद्याचे ठरते. तसं पाहिलं तर, फलंदाजीत हातखंडा असणाऱ्या फलंदाजांना नेट्समध्ये जास्त गोलंदाजीचा सराव करण्याची सवय नसते. परंतु, संघाला गरज पडल्यास तेच फलंदाज चांगली गोलंदाजीही करतात.
आजवर अनेक फलंदाजांनी पार्ट-टाईम गोलंदाजी करताना आपल्या संघाला सामने जिंकून दिले आहेत. या लेखात वनडेत पार्ट टाईम गोलंदाजी करत १००पेक्षा जास्त विकेट्स घेणाऱ्या टॉप-४ पार्ट टाईम गोलंदाजांचा आढावा घेण्यात आला आहे.
चला तर जाणून घेऊयात, वनडेतील त्या टॉप-४ पार्ट टाईम गोलंदाजांविषयी- Top-4 Part Time Bowlers With Most Wickets In ODI
४. युवराज सिंग – १११ विकेट्स
भारताचा माजी अष्टपैलू क्रिकेटपटू युवराज सिंग हा डाव्या हाताने फिरकी गोलंदाजी करत असायचा. त्याने वनडेत ३०४ सामन्यात ३८.६८च्या सरासरीने १११ विकेट्स घेतल्या होत्या. यावेळी त्याने ५.१च्या इकोनॉमी रेटने गोलंदाजी केली होती. खरं पाहता युवराजने २०११च्या विश्वचषकात गोलंदाजी करताना १५ विकेट्स घेतल्या होत्या. यावेळी आयर्लंडविरुद्ध खेळताना युवराजने ३१ धावा देत ५ विकेट्स घेत वनडेतील सर्वोत्तम कामगिरी नोंदवली होती. शिवाय, युवराजच्या नावावर वनडेत ८७०१ धावा आहेत.
३. विवियन रिचर्ड्स – ११८ विकेट्स
वेस्ट इंडिजच्या महान फलंदाज विवियन रिचर्ड्सने ९०च्या दशकात आपल्या संघासाठी मोठे योगदान दिले होते. त्यांना त्यांच्या विस्फोटक फलंदाजीसाठी ओळखले जात होते. या दिग्गज खेळाडूने वनडेत १८७ सामन्यात ३५.८३च्या सरासरीने आणि ४.५च्या इकोनॉमी रेटने गोलंदाजी करत ११८ विकेट्स घेतल्या होत्या. यात त्यांच्या ४१ धावा देत ६ विकेट्स घेण्याच्या सर्वोत्तम कामगिरीचा समावेश आहे. रिचर्ड्स यांनी त्यांच्या वनडे कारकिर्दीत एकूण ६७२१ धावा केल्या होत्या.
२. सचिन तेंडुलकर – १५४ विकेट्स
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर हा जगातील सर्वोत्कृष्ट फलंदाजांपैकी एक आहे. पण या महान फलंदाजाला लहानपणी गोलंदाजीची खूप आवड होती. सचिनने त्याच्या कारकिर्दीत अनेकदा गरजेनुसार गोलंदाजी केली होती. सीम-अप, ऑफ स्पिन आणि लेग स्पिन गोलंदाजी करणाऱ्या सचिनने ४६३ सामन्यात १५४ विकेट्स घेतल्या होत्या. यावेळी त्याने ४४.४८च्या सरासरीने आणि ५.१च्या इकोनॉमी रेटने गोलंदाजी केली होती. श्रीलंकाविरुद्ध खेळताना सचिनने ५/३२ ही सर्वोत्तम कामगिरी केली होती. शिवाय वनडेत सचिनने १८४२६ धावा केल्या होत्या.
१. ख्रिस गेल – १६७ विकेट्स
‘युनिवर्सल बॉस’ ख्रिस गेल हा त्याच्या आक्रमक फलंदाजीसाठी ओळखला जातो. परंतु, या धाकड फलंदाजांने ३०० वनडे सामन्यात पार्ट टाईम गोलंदाजी करत १६७ विकेट्स घेतल्या होत्या. यावेळी ३५.४९च्या सरासरीने आणि ४.७९च्या इकोनॉमी रेटने फिरकी गोलंदाजी करत इतक्या विकेट्स घेतल्या होत्या. ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळताना गेलने वनडेतील ५/४६ सर्वोत्तम गोलंदाजी कामगिरी केली होती. शिवाय, वनडेत गेलने १०४८० धावा केल्या आहेत.
ट्रेंडिंग लेख-
क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात २ वेळा नर्वस नाईंटीजवर बाद होणारा एकमेव भारतीय
कसोटीत पाचही दिवस टिच्चून फलंदाजी करणारे जगातील १० फलंदाज; ३ नावे आहेत भारतीय
‘वाह भाई घर हो तो ऐसा’, पहा ५ भारतीय क्रिकेटर्सची आलिशान घरं