चेन्नई। भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि बीसीसीआयचा अध्यक्ष सौरव गांगुली अडचणीत सापडले आहेत. त्यांना ऑनलाईन सट्टेबाजीचा प्रचार केल्यामुळे मद्रास उच्च न्यायालयाच्या मदुराई खंडपीठाने मंगळवारी (२ नोव्हेंबर) नोटीस पाठवली आहे.
न्यायमूर्ती एन किरुबाकरन आणि बी पुगलेंधी यांच्या खंडपीठाने अभिनेता प्रकाश राज, तमन्ना भाटिया, राणा आणि सुदीप खान तसेच अन्य ऍप्सनाही नोटिसा बजावल्या आहेत.
अशा ऑनलाईन स्पोर्ट्स ऍप्सवर सामने खेळून पैसे गमावल्यानंतर काही तरुणांनी आत्महत्या केल्याने वकील मोहम्मद रिझवी यांनी हा गुन्हा दाखल केला. “चेन्नई सुपर किंग्ज, राजस्थान रॉयल्स या आयपीएल संघांच्या नावावर काही ऍप्स आहेत. आणि राज्याच्या नावावरही काही ऍप्स आहेत. हे संघ राज्याच्या वतीने खेळत आहेत का,” असे खंडपीठाने विचारले.
खंडपीठाने या ऍप्सच्या मालकांवर कोट्यवधींची कमाई करण्यासाठी सेलिब्रिटींचा वापर केल्याचा आरोप केला. वरील सर्व सेलिब्रिटींना १९ नोव्हेंबरपर्यंत नोटीसला उत्तर द्यावे लागणार आहे.
विराट कोहलीविरुद्ध याचिका दाखल होण्याची ही पहिली वेळ नव्हती. ऑगस्ट महिन्यात टाईम्स नाऊने दिलेल्या वृत्तानुसार चेन्नई येथील एका वकिलांनी याचिका दाखल केली होती. याचिकाकर्त्याने मद्रास उच्च न्यायालयाला सांगितले की ऑनलाईन सट्टेबाजीच्या ऍप्सवर बंदी घालण्याच्या सूचना जारी कराव्यात कारण त्याचा युवा पिढीवर वाईट परिणाम होत आहे.
विराट कोहली आणि बॉलिवूड अभिनेत्री तमन्ना भाटिया दोघेही मोबाइल प्रीमियर लीगची जाहिरात करतात. कोहली आणि तमन्ना दोघेही गेमिंग प्लॅटफॉर्मचे ब्रँड अॅम्बेसेडर आहेत.