देवयानी एम. (योग प्रशिक्षक, लेखिका, उद्योजिका)
निरोगी शरीर व मन आपला हक्क किंवा मुलभूत गरज आहे. यामुळेच उच्च दर्जाची कार्यप्रणाली होऊ शकते. पण हक्क जरी असला तरी तो फार काळ फुकट मिळत नाही आणि आपण त्याला गृहीतही धरू शकत नाही.
काळाबरोबर अनेक गोष्टी बदलत आहेत. अन्नाची गुणवत्ता, वातावरणातील भीषण बदल, प्रदूषण, कामाच्या पद्धती-दीर्घ प्रवास, स्पर्धा, अनिश्चितता, एकंदरीत ताण. पण काळ आणि तंत्रज्ञान कितीही बदललं तरी निरोगी राहण्याची मुलभूत तत्त्वं तीच राहणार आहेत. किंबहुना त्यांना जास्त गांभीर्याने अंगीकारावं लागणार आहे. कामाचं ओझं, अपुरी झोप, नात्यांमधली होत असलेली ओढाताण आणि या जोडीला बाह्य आपल्या हातात नसलेल्या कारणांनी होत असलेले आघात यांनी आपला मेंदू आणि अंतर्गत इंद्रियांचा थकवा वाढत जातो. याच थकव्यात रोजचा दिवस सुरू होतो आणि आपली कार्यक्षमता कमी होत जाते. अशी अनेक वर्षे ओढली की आपली इंद्रिये आणखी थकतात आणि चाळिशी नंतर लाइफस्टाईल डिसऑर्डरस् शिरकाव करतात. इथे ‘योग’ महत्त्वाची भूमिका साकारतो. रोज या थकव्याचा निचरा करता आला म्हणजे आपल्या मेंदू आणि आंतरिक यंत्रणेला पूर्ण आराम देऊ शकलो, तर आपण नक्कीच निरोगी राहू शकतो. दिनचर्या अशी नियमित करा की शिथिलीकरण हेच थकवा आणि विकारांवर औषध असेल.
आसने- शरीराच्या सुदृढतेसाठी योगासनांचा उपयोग तर आपल्या सर्वांना माहीत आहेच. आसने केल्याने स्थिरता, आरोग्य, हलकेपणा येतो. सर्व स्नायूंना योग्य व्यायाम घडला म्हणजे त्यांचे व त्यांनी वेढलेल्या सर्व अवयवांचे, रक्त वाहिन्यांचे आरोग्य चांगले राहते. आंतर इंद्रियांचे आरोग्य नीट राहण्यासाठी आकुंचन -प्रसारण होणारी वेगवेगळी आसने हठ योगात सांगितली आहेत. रक्त वाहिन्यांवर दाब व ताण पडल्यामुळे साचलेली विषारी घाण बाहेर पडण्यास मदत होते.
प्राणायाम- हठ प्रदीपिकेमध्ये म्हटले आहे “चले वाते चलं चित्तंनिश्चले निश्चलं भवेत् |” कुठल्याही प्रसंगी तुम्ही निरीक्षण करून पहा आपल्या मनाच्या अवस्थेचा श्वासावर सगळ्यात अगोदर परिणाम होतो. कधी राग आला, भीती वाटली, अस्वस्थता वाटली तर श्वासही अस्थिर होतो. याउलट झोपेत किंवा मन शांत असेल तेव्हा श्वासही संथ आणि लयबद्ध असतो. मनाच्या अवस्थेप्रमाणे श्वास बदलतो, याउलट प्रयत्नपूर्वक श्वासाच्या गतीमध्ये बदल केला तर मनाच्या अवस्थेत बदल घडू शकतो व ते शांत होऊ शकते. मनाला शांत हो सांगितलं तर ते होणं खूप कठीण आहे. त्याच्या गतीबरोबर आपण तासंतास भटकत राहू. म्हणूनच श्वासाच्या माध्यमातून मनाचं नियंत्रण करण्याच्या शास्त्राचा अभ्यास म्हणजे प्राणायाम करणं आवश्यक आहे.
रोगप्रतिकार शक्ती– कोरोनाच्या उच्छादाने सगळीकडे त्यावर मात करण्याचे उपाय, रोगप्रतिकार शक्ती कशी वाढवावी अशी चर्चा चालू आहे. परंतु रोगप्रतिकारशक्ती ही एका दिवसात येणारी गोष्टचनव्हे. आपले शरीर व सर्व आंतरिक क्रिया इतक्या सूक्ष्म पातळीवर काम करत असतात, की त्यातील घटकांचा एकांगी विचार करून त्यावर वेगवेगळे उपाय आपण करूच शकणार नाही.शरीर चालवण्यासाठी चालू असलेल्या आंतरिक प्रणाली एकमेकांच्या साहाय्याने काम करत असतात.आता आरोग्यावर संकट आलं आहे म्हणून रोग प्रतिकार शक्ती कशी वाढवावी असा तेवढ्यापुरता विचार करून चालणार नाही. आपल्या शरीराला त्याचं काम उत्तम प्रकारे करता येतं हे जाणून ते आपण त्याला करूदेऊया. मात्र आपल्या सवयी आणि जीवनशैली त्याला पूरक कशा ठेवता येतील याचा विचार करायला हवा.
ध्यान– आपल्या मेंदूतील वैचारिक आणि भावनिक केंद्रे स्ट्रेसमुळे कायम उत्तेजित असतात. त्यांना शांत करणं आणि रक्तातील रासायनिक समतोल राखणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण स्ट्रेसमुळे सर्व आंतरिक इंद्रियांवर अतिरिक्त भार पडतो आणि त्यांचे ठरलेले काम उत्तम प्रकारे होऊ शकत नाहीत.ध्यानहेसर्वसाधारणपणेअध्यात्मिकदृष्टिकोनातूनपाहिलेजाते, बहुतेकयामुळेअनेकजणयापासूनलांबराहतात.
परंतु ध्यान प्रक्रियेची शास्त्रीय उपयोगिता जर पाहिली, तर अनेकजण ध्यान करायला सुरू करतील, असं मला वाटतं. स्ट्रेस, सतत डोक्यात चालू असलेला विचारांचा गदारोळ, चिडचिडेपणा, भीती, आकांक्षा अपेक्षांचं ओझं या आणि अशा अनेक कारणांनी मेंदू सतत बिझी राहतो आणि म्हणून थकतो. पण त्याच मेंदूवर आपल्या शरीराचे इतर सर्व कार्य सुरळीत चालू ठेवण्याची ही जबाबदारी असते. नियमित ध्यान केल्याने मेंदूतील वैचारिक व भावनिक केंद्रे शांत राहतात. या शांततेत झालेले मेंदूचे कार्य हे उच्च प्रणालीचे असते यात शंका नाही.