इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) कोणत्याही संघाचे नेतृत्त्व करणे, ही कोणत्याही खेळाडूसाठी खूप मोठी गोष्ट असते. आतापर्यंत अनेक भारतीय आणि परदेशी खेळाडूंनी आयपीएलमधील वेगवेगळ्या संघांची धुरा सांभाळली आहे. बरेचसे खेळाडू संघाचे नेतृत्त्व करण्यात यशस्वी ठरले आहेत, तर अनेकांच्या वाट्याला अपयश आले आहे.
आयपीएलच्या १३ हंगामांच्या इतिहासाबद्दल बोलायचे झाले तर, पूर्ण हंगामात आपल्या नेतृत्त्वाखाली संघाला जास्तीत जास्त सामने जिंकून देणाऱ्या खेळाडूला यशस्वी कर्णधार समजले जाते. यामध्ये त्याच्या संपुर्ण प्रदर्शनाचीही गणना केली जाते. याउलट ज्या खेळाडूंच्या विजयाची सरासरी कमी असते आणि त्याच्या नेतृत्त्वाखाली संघ खराब प्रदर्शन करत असेल, तर त्या खेळाडूला संघाच्या नेतृत्त्वपदावरुन काढून टाकले जाते.
एवढेच नव्हे तर, काही कर्णधार आपण आपली जबाबदारी उत्तमरितीने सांभाळण्यात अपयशी ठरत आहोत, हे पाहून स्वत:च संघाचे नेतृत्त्वपद सोडून टाकण्याचा निर्णय घेतला. या लेखात, आयपीएलमधील त्या तीन कर्णधारांविषयी माहिती देण्यात आली आहे, ज्यांची विजय सरासरी सर्वाधिक आहे. अर्थात ते आयपीएल इतिहासातील आतापर्यंतचे सर्वात यशस्वी कर्णधार आहेत.
आयपीएल इतिहासातील ३ सर्वात यशस्वी कर्णधार (3 Most Successful Captains In The IPL History) –
३. गौतम गंभीर (Gautam Gambhir)
कोलकाता नाईट रायडर्सने आतापर्यंत २ वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकली आहे. याचे श्रेय गौतम गंभीरला जाते. गौतम गंभीरच्याच नेतृत्वात केकेआरने २०१२ आणि २०१४ मध्ये आयपीएलचे विजेतेपद पटकावले होते. याशिवाय गंभीरने दिल्ली कॅपिटल्सचेही कर्णधारपद सांभाळले आहे.
गंभीरने आयपीएल कारकीर्दीत एकूण १२९ सामने कर्णधार म्हणून खेळले आहेत. त्यापैकी त्याने ७१ जिंकले आहेत आणि ५७ सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले, तर एक सामना बरोबरीत सुटला होता. त्यामुळे गंभीरच्या विजयाची सरासरी ५५.४ इतकी आहे. शिवाय, गंभीरने संघाचे नेतृत्त्व करताना अनेक शानदार खेळी केल्या होत्या. त्यामुळे त्याची आयपीएलच्या सर्वात यशस्वी कर्णधारांमध्ये गणना केली जाते.
२. एमएस धोनी (MS Dhoni)
चेन्नई सुपर किंग्स संघाला आपल्या नेतृत्वाखाली ३ वेळा आयपीएलचे विजेतेपद जिंकून देणारा कर्णधार एमएस धोनी हा यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. धोनी २००८ पासून सीएसकेचा संघाचा कर्णधार आहे. तसेच २०१६ ला सीएसकेवर बंदी असताना त्याने एका मोसमात त्याने राइझिंग पुणे सुपरजायंट्सचेदेखील कर्णधारपद सांभाळले होते.
आयपीएलमध्ये धोनीने आतापर्यंत एकूण १८८ सामन्यांचे नेतृत्व केले आहे, त्यापैकी ११० सामने जिंकले आहेत. तर ७७ सामन्यात पराभूत व्हावे लागले आणि एका सामन्याचा निकाल लागला नाही. अशाप्रकारे त्याची आयपीएलमधील विजय सरासरी ५८.८२ इतकी आहे.
१. रोहित शर्मा (Rohit Sharma)
आयपीएल इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधारांच्या यादीत मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा अव्वल क्रमांकावर आहे. त्याच्या नेतृत्वातील मुंबई इंडियन्स संघ आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघ आहे. रोहितने आतापर्यंत ८ मोसमांसाठी मुंबई इंडियन्सचे कर्णधारपद सांभाळले आणि या ८ हंगामात त्याने मुंबई संघाला ५ वेळा आयपीएल चॅम्पियन बनवले आहे.
आयपीएल २०२० मध्ये संघाला जेतेपद मिळवून देत त्याने या यादीत पहिल्या स्थानावर उडी घेतली आहे. २०१३ ते २०२० पर्यंत रोहित शर्माने आयपीएलमध्ये कर्णधार म्हणून ११६ सामने खेळले. त्यातील ६८ सामने जिंकले आणि ४४ गमावले तर चार सामने बरोबरीत राहिले. त्यामुळे त्याची विजय सरासरी सर्वाधिक ६०.३४ इतकी आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
आयपीएल २०२१: पडीक्कलच्या अनुपस्थितीत ‘या’ खेळाडूला मिळू शकते आरसीबी संघाकडून पदार्पणाची संधी
आयपीएल २०२१: सर्वाधिक धावांसाठी ‘या’ चार खेळाडूंमध्ये रंगणार स्पर्धा, विराट आहे बराच पुढे