सध्या जारी पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये एक ऐतिहासिक घटना घडली आहे. स्पर्धेत चक्क 7 महिन्यांच्या ‘गर्भवती’ पॅरा अॅथलीटनं पदक जिंकून इतिहास रचला! धक्का बसला ना! पण हे खरं आहे, अगदी 100 टक्के!
हा पराक्रम ग्रेट ब्रिटनची ज्युडी ग्रिनहॅमनं केला. तिनं तिरंदाजीत कांस्यपदकाची कमाई केली. तिच्या या कामगिरीचं जगभरात कौतुक होत आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून जगभरातून लोकं तिच्या धैर्याला सलाम करत आहेत.
ज्युडी ग्रिनहॅमनं 31 ऑगस्टला ग्रेट ब्रिटनच्याच फोयबे पॅटरसन विरुद्ध कांस्यपदकाचा सामना खेळला. या सामन्यात तिनं 142-141 असा विजय मिळवून कांस्यपदक आपल्या नावे केलं. विशेष म्हणजे, पॅटरसननं टोकियो पॅरालिम्पिकमध्ये सुवर्ण पदक जिंकलं होतं.
ज्युडी ग्रिनहॅमनं जेव्हा मेडल जिंकलं, तेव्हा ती 28 आठवडे म्हणजेच 7 महिन्यांची गर्भवती होती. पोटात बाळ असतानाही तिनं पॅरालिम्पिकमध्ये खेळण्याचा निर्णय घेतला आणि पदक जिंकून इतिहासाच्या पुस्तकात सोनेरी अक्षरांनी आपलं नाव कोरलं.
ज्युडी ग्रिनहॅम डाव्या हातानं अपंग आहे. ती केवळ आपल्या उजव्या हातानं निशाणा लावू शकते. इवढंच नव्हे, तर तिनं तिरंदाजीच्या मिश्र इव्हेंटमध्ये क्वार्टर फायनलमध्ये आपली जागा पक्की केली आहे. हा सामना आज (2 सप्टेंबर) खेळला जाईल. अशा परिस्थितीत ती आणखी एक पदक जिंकू शकते.
कांस्यपदक जिंकल्यानंतर प्रतिक्रिया देताना ज्युडी म्हणाली, “निशाणा लावताना माझं बाळ पोटामधून लाथा मारत होतं. असं वाटत होतं की तो विचारत आहे, आई तू काय करतीये. मला स्वत:वर अभिमान आहे. मी अनेक अडचणींचा सामना केला. हे माझ्यासाठी मुळीच सोपं नव्हतं. सध्या माझ्या बाळाची प्रकृती उत्तम आहे.”
हेही वाचा –
Paris Paralympics 2024 : पाचव्या दिवशी भारताला मिळू शकतात आणखी 10 पदकं! हे खेळाडू अॅक्शनमध्ये
प्रीती पालची ऐतिहासिक कामगिरी! पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये भारतासाठी जिंकलं आणखी एक मेडल
इंग्लडच्या विजयाचा दुसऱ्याच संघाला फायदा, WTC गुणतालिकेत मोठा फेरबदल; भारताचं स्थान कितवं