आयपीएल २०२६ मध्ये शनिवार (२५ एप्रिल) हा दिवस दिल्ली कॅपिटल्स, पंजाब किंग्ज, राजस्थान रॉयल्स आणि सनरायझर्स हैद्राबाद संघांनी अविस्मरणीय बनवला. या दोन्ही सामन्यांमध्ये चौकार-षटकारांची बरसात झाली आणि आयपीएलच्या इतिहासात एका दिवसात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम मोडला गेला.
शनिवारी पहिला सामना डीसी विरुद्ध पीबीकेएस यांच्यात दिल्लीत आणि दुसरा सामना आरआर विरुद्ध एसआरएच यांच्यात जयपूरमध्ये खेळला गेला. या दोन्ही सामन्यांमध्ये मिळून ७७.२ षटकात ९८६ धावा झाल्या, जो आयपीएलच्या इतिहासात एका दिवसात केलेला आतापर्यंतचा सर्वाधिक धावांचा विक्रम आहे. त्याचबरोबर आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदाच एका दिवसात ९०० धावांचा टप्पा ओलांडला गेला आहे. याआधीचा विक्रम ८९९ धावांचा होता.
आयपीएल २०२४ च्या हंगामात ८९९ धावांचा विक्रम नोंदवला गेला होता. २७ एप्रिलला झालेल्या त्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने मुंबई इंडियन्सविरुद्ध २५७ धावा केल्या होत्या आणि तो सामना डीसीने १० धावांनी जिंकला होता. दुसऱ्या सामन्यात एलएसजीने आरआरने १९६ धावांचे लक्ष्य दिले होते. आरआरने ते अवघ्या १९ षटकात पूर्ण केले होते.
आयपीएलच्या १९ व्या हंगामात पीबीकेएसने आयपीएलमधील सर्वाधिक धावांचा पाठलाग करत डीसीविरुद्ध आणि आरआर विरुद्ध पाचव्या क्रमांकाच्या सर्वाधिक धावांचा पाठलाग करून एसआरएचने हा विक्रम मोडला आहे.
डीसी विरुद्ध पीबीकेएस सामन्यात काय घडले ते जाणून घेऊ. डीसीचा कर्णधार अक्षर पटेलने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. केएल राहुलच्या नाबाद १५२ धावांच्या जोरावर डीसीने २० षटकात २६४ धावा केल्या. राहुलची ही आयपीएलमधील कोणत्याही भारतीय खेळाडूने केलेली सर्वोच्च वैयक्तिक खेळी ठरली. प्रत्युत्तरात पीबीकेएसने आक्रमक सुरूवात केली. प्रभसिमरन सिंग आणि कर्णधार श्रेयस अय्यरच्या जबरदस्त अर्धशतकांच्या जोरावर पंजाबने ७ चेंडू आणि ६ विकेट्स शिल्लक राखत सामना जिंकला.
एसआरएचविरुद्ध वैभव सूर्यवंशीची शतकी खेळी वाया
आरआरने दिलेले २२९ धावसंख्येचे लक्ष्य एसआरएचने १८.३ षटकात ५ विकेट्स शिल्लक राखत पार केले. या सामन्यात आरआरने प्रथम फलंदाजी करताना वैभवच्या शतकी खेळीच्या जोरावर २० षटकात ६ विकेट्स गमावत २२८ धावा केल्या होत्या. वैभवने केवळ ३६ चेंडूत आपले दुसरे आयपीएल शतक झळकावले. प्रत्युत्तरात एसआरएचकडून अभिषेक शर्मा आणि इशान किशन यांनी अर्धशतकी खेळी केल्याने वैभवचे शतक वाया गेले.





