जगभरातील क्रिकेटप्रेमींना आयसीसी वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेची प्रतीक्षा लागली आहे. या स्पर्धेला सुरुवात होण्यासाठी एक महिन्यापेक्षा कमी म्हणजेच 21 दिवसांचा कालावधी उरला आहे. भारतात आयोजित होत असलेल्या या स्पर्धेला 5 ऑक्टोबरपासून सुरुवात होत आहे. या स्पर्धेला 21 दिवस उरले आहेत. त्यामुळे आपण, विश्वचषकात 21 फलंदाजांनी केलेल्या एका खास विक्रमाविषयी जाणून घेणार आहोत. चला तर, सुरुवात करूयात…
विश्वचषकात 21 फलंदाजांनी केलेला विक्रम
सर्वात पहिल्यांदा वनडे विश्वचषक (ODI World Cup) स्पर्धा जून 1975मध्ये आयोजित केली गेली होती. आतापर्यंत या स्पर्धेला 48 वर्षे झाली आहेत. या 4 दशकांहून अधिकच्या काळात तब्बल 21 फलंदाज असे होते, ज्यांनी विश्वचषक स्पर्धेत 1000 हून अधिक धावा करण्याचा विक्रम आपल्या नावावर केला आहे.
सर्वाधिक धावा आणि फलंदाजांची यादी
विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांविषयी बोलायचं झालं, तर यादीत 3 भारतीयांचा समावेश आहे. यात सचिन तेंडुलकर, विराट कोहली आणि सौरव गांगुली यांचा समावेश आहे. सर्वाधिक धावांच्या यादीत सर्वात पहिले नाव भारताचा महान फलंदाज सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) याचे येते. सचिनने 1992 ते 2011दरम्यानच्या विश्वचषकात 45 सामने खेळताना 56.95च्या सरासरीने सर्वाधिक 2278 धावा केल्या होत्या. यामध्ये 6 शतके आणि 15 अर्धशतकांचा समावेश होता. सचिननंतर यादीत दुसऱ्या स्थानी ऑस्ट्रेलियाचा दिग्गज माजी कर्णधार रिकी पाँटिंग (Ricky Ponting) याचे नाव येते. पाँटिंगने 1996 ते 2011 विश्वचषकात 46 सामन्यात 45.86च्या सरासरीने 1743 धावा केल्या होत्या. यामध्ये 5 शतके आणि 6 अर्धशतकांचा समावेश होता.
या दोघांव्यतिरिक्त विश्वचषकात हजारहून अधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये कुमार संगकारा (1532), ब्रायन लारा (1225), एबी डिविलियर्स (1207), ख्रिस गेल (1186), सनथ जयसूर्या (1165), जॅक कॅलिस (1148), शाकिब अल हसन (1146), तिलकरत्ने दिलशान (1112), माहेला जयवर्धने (1100), ऍडम गिलख्रिस्ट (1085), जावेद मियांदाद (1083), स्टीफन फ्लेमिंग (1075), हर्षल गिब्स (1067), अरविंद डी सिल्वा (1064), विराट कोहली (1030), विवियन रिचर्ड्स (1013), सौरव गांगुली (1006), मार्क वॉ (1004) आणि रॉस टेलर (1002) या खेळाडूंचा समावेश आहे.
फक्त दोनच खेळाडू सक्रिय
विशेष म्हणजे, विश्वचषकात 1000हून अधिक धावा करणाऱ्या या 21 खेळाडूंमध्ये फक्त दोनच खेळाडू असे आहेत, जे अजूनही सक्रिय आहेत. हे दोन खेळाडू इतर कुणी नसून विराट कोहली (Virat Kohli) आणि बांगलादेशचा कर्णधार शाकिब अल हसन (Shakib Al Hasan) आहेत.
रोहितला संधी
भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा याने 2015 ते 2019 या दोन विश्वचषकात 6 शतके आणि 3 अर्धशतकांसह 978 धावा केल्या आहेत. त्यामुळे त्याच्याकडेही विश्वचषकात 1000 धावांचा आकडा पार करण्याची संधी आहे. (21 Days to go for World Cup 2023 21 batsman scored more than 1000 runs in world cup know here)
हेही वाचा-
बेन स्टोक्सपुढे न्यूझीलंडच्या 11 खेळाडूंनी टेकले गुडघे, इंग्लंडचा 181 धावांनी ऐतिहासिक विजय
वर्ल्डकप 2023साठी 10 पैकी 7 संघांनी घोषित केले Squad, पाकिस्तानसह ‘या’ 3 Team अजूनही बाकी






