पुणे। भारतीय रोइंग फेडरेशनच्या मान्यतेने आणि महाराष्ट्र रोइंग असोसिएशनच्या वतीने २२ व्या सब-ज्युनियर आणि चौथ्या आंतर राज्य चॅलेंजर्स स्प्रिंट राष्ट्रीय रोइंग चॅम्पियनशिप स्पर्धेत महाराष्ट्राच्या सागर घुगे, मृण्मयी साळगावकर, पंकज वाड-सागर राऊत, हिंमत पिंगळे-विजयकुमार ढगे, शविना बेगम – श्वेता मंडल यांनी उपांत्य फेरीत प्रवेश केला. कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनीअरिंंगच्या कॅम्पसमध्ये स्थित आर्मी रोइंग नोडमध्ये ही स्पर्धा सुरू आहे.
स्पर्धेचे उद्घाटन रोईंग फेडरेशन ऑफ इंडियाच्या अध्यक्ष राजलक्ष्मी सिंग देव, सचिव गिरीश फडणवीस, महाराष्ट्र रोईंग फेडरेशनचे अध्यक्ष मुज्तबा लोखंडवाला, आर्मी रोईंग नोडचे सीईओ कर्नल सुब्रमण्यम, असोसिएशनच्या सचिव मृदुला कुलकर्णी, सहसचिव संजय वळवी, आंतरराष्ट्रीय पंच आणि ज्युरी नरेंद्र कोठारी यांच्या उपस्थितीत झाले. महाराष्ट्राचे प्रशिक्षक विकल सार्वे यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्राचा संघ स्पर्धेत सहभागी झाला आहे.
चॅलेंजर मेन सिंगल स्कल्सच्या हिटमध्ये सागर घुगे याने १ मिनिटे ४८.३२ सेकंद वेळ नोंदवली. यानंतर सागरने रिपेचेजमध्ये १ मिनिट ५०.१२ सेकंद वेळ नोंदवून अव्वल स्थानावर राहिला आणि उपांत्य फेरीतील प्रवेश निश्चित केला. चॅलेंजर वूमन डबल स्कल्सच्या हिटमध्ये महाराष्ट्राच्या शविना बेगम आणि श्वेता मंडल यांनी २ मिनिटे ००.५६ सेकंद वेळ नोंदवून दुसरा क्रमांक पटकावला. चॅलेंजर वूमन सिंगल स्कल्सच्या हिटमध्ये मृण्मयी साळगावकर २ मिनिटे ०८.७२ सेकंद वेळ नोंदवली आणि उपांत्य फेरी गाठली. चॅलेंजर मेन डबल स्कल्समध्ये महाराष्ट्राच्या पंकज वाड आणि सागर राऊत यांनी १ मिनिट ५१.५० सेकंद वेळ नोंदवली. चॅलेंजर मेन पेअरमध्ये महाराष्ट्राच्या हिंमत पिंगळे – विजयकुमार ढगे यांनी १ मिनिट ४६.५१ सेकंद वेळ नोंदवली.
स्पर्धेतील चॅलेंजर वूमन पेअरच्या हिटमध्ये कोमल बोडके आणि भाग्यश्री चव्हाण यांनी २ मिनिटे ४.४३ सेकंद वेळ नोंदवून उपांत्य फेरीत प्रवेश केला. या फेरीत त्यांच्यासमोर मणिपूर, ओडिशा, हरियाणाचे आव्हान असेल. सब-ज्युनियर गटात मुलांच्या सिंगल स्कल्सच्या हिटमध्ये स्वराज आघव याने २ मिनिटे ४.६७ सेकंद वेळ नोंदवली. स्वराजला रिपेचेजमध्ये खेळण्याची संधी मिळाली. त्याने २ मिनिटे ०७.३९ अशी वेळ नोंदवून पहिला क्रमांक पटकावला आणि उपांत्य फेरी गाठली. यात तेलंगणाचा आर. व्योमराजकुमार (२ मि. १६.६० से.) आणि मणिपूरचा तेलम जिलिओसिंग (२ मि. २१.८१ से.) तिस-या स्थानावर राहिला. सब-ज्युनियर मुले कॉकलेक्स फोरमध्ये प्रज्वल व्यवहारे, सिद्धार्थ व्यवहारे, अर्जुन शिंदे, दर्शन गवळी १ मिनिटे ५१.२४ सेकंद वेळ नोंदविला. रिपेचेजमध्ये या चौकडीने १ मिनिटे ५४.९७ सेकंद वेळ नोंदवून अव्वल क्रमांक पटकावला आणि उपांत्य फेरी निश्चित केली.