लंडन। बुधवारी (७ जुलै) विम्बल्डन २०२१ मध्ये पुरुष एकेरीची उपांत्यपूर्व फेरी झाली. या फेरीत सहाव्या मानांकित रॉजर फेडररला पोलंडच्या हबर्ट हुरकाच याने पराभूत करत कारकिर्दीत पहिल्यांदाच ग्रँड स्लॅमच्या उपांत्य फेरीत प्रवेश मिळवला आहे. १४ व्या मानांकित हबर्टने फेडररला ६-३, ७-६ (४), ६-० अशा सरळ तीन सेटमध्ये पराभूत केले.
विशेष म्हणजे २४ वर्षीय हबर्ट लहानपणापासून फेडररला आपला आदर्श मानतो. त्यामुळे आपला आदर्श असलेल्या खेळाडूला पराभूत करण्याचा मान त्याने मिळवला आहे. तसेच २० ग्रँडस्लॅम विजेता फेडरर १९ वर्षांत पहिल्यांदाच विम्बल्डनमध्ये सरळ तीन सेटमध्ये पराभूत झाला.
फेडरर विरुद्ध विजय मिळवल्यानंतर हबर्ट म्हणाला, ‘नक्कीच मी थोडा नर्वस होतो. ग्रँड स्लॅममधील उपांत्यपूर्व फेरीत रॉजरविरुद्ध खेळणे, ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. पण मी मला शक्य तेवढे शांत ठेवण्याचा प्रयत्न केला. मी सामन्यादरम्यान स्वत:वर आणि स्वच:च्या खेळावर विश्वास ठेवण्याचा आणि शक्य तितके आक्रमक खेळ करण्याचा प्रयत्न केला.’ हबर्ट हा ग्रँड स्लॅमच्या उपांत्य फेरीत प्रवेश करणारा पोलंडचा केवळ दुसरा टेनिसपटू आहे.
तसेच तो पुढे म्हणाला, ‘मी रॉजरला पराभूत केले आहे, ही भावना घेऊन कोर्टमधून बाहेर पडणार आहे, म्हणजे मला असं म्हणायचं आहे की माझ्यासाठी हे स्वप्न पूर्ण झाल्यासारखे आहे. विशेष म्हणजे विम्बल्डनमध्ये हे स्वप्न पूर्ण झाले. तसेच प्रेक्षकांना अजूबाजूला पाहूनही छान वाटत आहे.’
And they say to never meet your heroes…@HubertHurkacz knocks out his idol, eight-time champion Roger Federer, in straight sets to advance to his first Grand Slam semi-final#Wimbledon pic.twitter.com/Qri1uriPDF
— Wimbledon (@Wimbledon) July 7, 2021
फेडरर आणि हबर्टमधील उपांत्यपूर्व सामना १ तास ४९ मिनिटे चालला. या सामन्यात फेडरर सुरुवातीपासूनच संघर्ष करताना दिसला. पहिल्या सेटमध्ये २-२ अशी बरोबरी असतानाही फेडरर आघाडी घेऊ शकला नाही. हबर्टने हा सेट ६-३ असा सहज जिंकला. दुसऱ्या सेटमध्ये फेडररने लय मिळवली होती. त्याने ४-१ अशी आघाडीही घेतली होती. मात्र, हबर्टने चांगली लढत देत हा ६-६ अशी बरोबरी साधत सेट टायब्रेकर मध्ये नेला. तसेच टायब्रेकरमध्ये हा सेट आपल्या नावावर करत आघाडी मिळवली.
तिसऱ्या सेटमध्ये तर हबर्टने फेडररवर पूर्ण वर्चस्व ठेवले. त्याने केवळ २ टाळता येणाऱ्या चूका केल्या आणि सरळ ६ गेम जिंकत सेट जिंकून सामना आपल्या नावे केला. फेडरर विम्बल्डनमध्ये पहिल्यांदाच ६-० असा सेट पराभूत झाला. या सामन्यात फेडररकडून ३१ टाळता येणाऱ्या चूका झाल्या.
The last time Roger Federer lost a set 6-0 at Wimbledon was…
Never. #Wimbledon
— ATP Tour (@atptour) July 7, 2021
फेडरर पराभूत झाला असला तरी त्याला प्रेक्षकांकडून उभे राहून टाळ्यांच्या कडकडाटासह दाद मिळाली. फेडरर २२ वर्षांपासून विम्बल्डनमध्ये खेळत असून त्याने या स्पर्धेत ८ वेळा विजय मिळवला आहे. तसेच बुधवारी तो या स्पर्धेत १८ व्यांदा उपांत्यपूर्व फेरीचा सामना खेळत होता. यापूर्वी १८ वेळा कोणीही विम्बल्डनचा उपांत्यपूर्व सामना खेळलेला नाही.
An ovation for 22 years of memories 👏
It's been a pleasure as always, @rogerfederer #Wimbledon pic.twitter.com/GvsOenp68C
— Wimbledon (@Wimbledon) July 7, 2021
विम्बल्डन २०२१ मध्ये हबर्टचा उपांत्य फेरीत आता सातव्या मानांकित मतेओ बेरेटिनी विरुद्ध सामना होईल. बेरेटिनीने उपांत्यपूर्व फेरीत फेलिक्स ऑगर-अलियासिम विरुद्ध विजय मिळवत उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे.
जोकोविच उपांत्य फेरीत
अव्वल मानांकित नोवाक जोकोविचही अजून या स्पर्धेत टिकून असून त्यानेही बुधवारी उपांत्यपूर्व फेरीत मॉर्टन फुकसोव्हिक्सचा पराभव केला आणि उपांत्य फेरीत प्रवेश केला. आता त्याचा उपांत्य फेरीत डेनिस शापोवालोव्ह विरुद्ध सामना होईल. जोकोविच विम्बल्डन २०२१ मध्ये २० वे ग्रँड स्लॅम जिंकण्याच्या हेतूने उतरला आहे. त्याच्या नावावर सध्या १९ ग्रँडस्लॅम विजेतीपदं आहे. तसेच सध्या पुरुष एकेरीत सर्वाधिक ग्रँड स्लॅम जिंकणाऱ्या टेनिसपटूंमध्ये त्याच्या पुढे केवळ राफेल नदाल आणि रॉजर फेडरर आहे. नदाल आणि फेडरर यांनी प्रत्येकी २० ग्रँड स्लॅम जिंकले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
Wimbledon 2021: सानिया-बोपन्नाने नोंदवला ऐतिहासिक विजय, ५३ वर्षांत पहिल्यांदाच झालं असं
सानियाचे ‘ग्रँड कमबॅक’! विम्बल्डनच्या पहिल्या फेरीत मिळवला विजय, मुलाने वाढविला उत्साह
टेनिस प्रेमी शास्त्री गुरुजी! फेडररचा सामना पाहण्यासाठी पोहोचले सेंटर कोर्टवर, ट्विट केले छायाचित्र