नागपूर। भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात उद्या(5 मार्च) दुसरा वनडे सामना रंगणार आहे. या सामन्याला विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडीयमवर दुपारी 1.30 वाजता सुरुवात होणार आहे.
पाच सामन्यांच्या या वनडे मालिकेत भारताने पहिल्या सामन्यात 6 विकेट्सने विजय मिळवून 1-0 अशी आघाडी घेतली आहे. त्यामुळे या मालिकेतील ही आघाडी कायम ठेवण्याचा भारतीय संघाचा प्रयत्न असणार आहे. तर ऑस्ट्रेलिया मालिकेत बरोबर साधण्याच्या उद्देशाने मैदानात उतरेल.
या सामन्यासाठी भारताच्या अंतिम 11 जणांच्या संघात शिखर धवनच्या ऐवजी केएल राहुलला संधी मिळण्याची दाट शक्यता आहे. पण अन्य बदल मात्र होण्याची चिन्हे कमी आहेत.
दुसऱ्या वनडेसाठी असा असू शकतो भारताचा संभाव्य संघ-
सलामीवीर- रोहित शर्मा, केएल राहुल
रोहित शर्मा हा मागील अनेक वर्षांपासून भारतीय संघातील नियमित सलामीवीर फलंदाज आहे. तसेच त्याचा अनुभवही महत्त्वाचा आहे. त्याने पहिल्या वनडेमध्ये चांगली सुरुवात केली होती. पण त्याला मोठ्या धावा करण्यात अपयश आले.
तसेच केएल राहुलने ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या दोन सामन्यांच्या टी20 मालिकेत अनुक्रमे 50 आणि 47 धावा करत त्याचा फॉर्म दाखवून दिला आहे. त्यामुळे मागील काही सामन्यात मोठ्या धावा करण्यात अपयशी ठरलेल्या शिखर धवन ऐवजी त्याला दुसऱ्या वनडे सामन्यासाठी संधी दिली जाऊ शकते.
मधली फळी – विराट कोहली, अंबाती रायडू, एमएस धोनी, केदार जाधव
कर्णधार विराट कोहलीनेही ऑस्ट्रेलिया विरुद्ध पहिल्या वनडेत चांगली सुरुवात केली होती. मात्र तो त्याचे मोठ्या खेळीत रुपांतर करण्यात अपयशी ठरला. पण त्याचा फॉर्म चांगला असून त्याने ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या दुसऱ्या टी20 मालिकेत नाबाद अर्धशतक करत त्याचा फॉर्म दाखवून दिला आहे.
अंबाती रायडू जरी पहिल्या वनडे सामन्यात 12 पेक्षा अधिक धावा करण्यात अपयशी ठरला असला तरी त्याला दुसऱ्या सामन्यातही अजून एक संधी दिली जाऊ शकते.
एमएस धोनीने ऑस्ट्रेलिया विरुद्ध त्याचा फॉर्म कायम ठेवताना पहिल्या वनडे सामन्यात नाबाद 59 धावांची खेळी केली. धोनीचा अनुभव आणि फॉर्म पाहता तो भारतीय संघात दुसऱ्या वनडे सामन्यासाठीही कायम राहिल.
त्याचबरोबर केदार जाधवनेही धोनीबरोबर 141 धावांची नाबाद भागीदारी करताना पहिल्या वनडेत भारताच्या विजयात मोलाचा वाटा उचलला होता. त्याने केलेल्या नाबाद 81 धावांमुळे त्याला सामनावीराचाही पुरस्कार देण्यात आला होता. तसेच केदारचे गोलंदाजीतील योगदानही महत्त्वाचे ठरत असल्याने त्यालाही दुसऱ्या वनडे सामन्यासाठी कायम केले जाऊ शकते.
अष्टपैलू – रविंद्र जडेजा, विजय शंकर
जडेजा आणि शंकर हे दोघेही अष्टपैलू म्हणून संघात कायम राहण्याची दाट शक्यता आहे. जडेजाला पहिल्या वनडे सामन्यात एकही विकेट घेता आली नसली तरी त्याने धावांवर चांगला रोख लावला होता. त्याच्या गोलंदाजीचे विराटनेही पहिल्या सामन्यानंतर कौतुक केले होते.
शंकरला मात्र पहिल्या वनडे सामन्यात फक्त 3 षटकेच गोलंदाजी करण्याची संधी मिळाली होती. पण हार्दिक पंड्याच्या अनुपस्थितीत शंकरकडे चांगली कामगिरी करत सर्वांना प्रभावित करण्याची चांगली संधी आहे.
गोलंदाज – कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी
भारतीय गोलंदाजांची मागील काही सामन्यांपासून चांगली कामगिरी होत आहे. पहिल्या वनडे सामन्यातही कुलदीप यादव, मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराह यांनी प्रत्येकी दोन विकेट घेत ऑस्ट्रेलियाचा डाव 7 बाद 236 धावांवर रोखण्यात महत्त्वाचा वाटा उचलला होता.
फिरकी गोलंदाजीमध्ये कुलदीपला जडेजाची साथ मिळेल. तर शमी आणि बुमराहनेही वेगवान गोलंदाजीची कडी चांगली सांभाळली आहे. त्यामुळे या तिघांकडून दुसऱ्या वनडे सामन्यातही अशाच चांगल्या कामगिरीची अपेक्षा असणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
–विश्वचषक विजेत्या गौतम गंभीरनेही विश्वचषक २०१९साठी जाहीर केला १६ सदस्यीय संघ
–अशी आहे विश्वचषक २०१९साठी व्हीव्हीएसची १५ सदस्यीय टीम इंडिया
–हा खेळाडू विश्वचषक २०१९मध्ये टीम इंडियासाठी ठरणार जायंट किलर