क्रिकेटमध्ये फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक यष्टीरक्षक असो वा कोणत्या संघाचा कर्णधार, प्रत्येकजण आपले सर्वोत्तम प्रदर्शन करण्यासाठी प्रयत्नशील असतो. त्यांचे चांगले प्रदर्शनच त्यांचे संघातील स्थानही टिकवून ठेवते. क्रिकेट इतिहासात आजवर एकाहून एक बहाद्दर फलंदाज होऊन गेले आहेत, ज्यांनी धावांचा रतीब घातला आहे. त्यातही भारतीय संघात असे काही खेळाडू होऊन गेले आहेत, ज्यांना जगातील कोणताही गोलंदाज बाद करू शकला नाहीये. अशाच ३ अवलिया खेळाडूंबद्दल आपण या लेखात माहिती घेणार आहोत.
वनडे क्रिकेटमध्ये कधीही बाद न झालेले ३ भारतीय फलंदाज (Indian Batsman Never Get Out In ODI)
फैज फजल (Faiz Fazal)
भारतीय संघाचा ३६ वर्षीय सलामीवीर फलंदाज फैज फजल याने त्याच्या देशांतर्गत क्रिकेटमधील प्रदर्शनाच्या जोरावर भारतीय संघात जागा मिळवली होती. त्याने त्याच्या कारकिर्दीतील पहिला वनडे सामना जून २०१६ मध्ये झिम्बाबेविरुद्ध खेळला होता. या सामन्यात फलंदाजी करताना त्याने नाबाद ५५ धावांची शानदार खेळी केली होती. या खेळीदरम्यान त्याने १ षटकार आणि ७ चौकारही मारले होते. या जबरदस्त खेळीनंतरही त्याला भारतीय संघाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये जागा मिळाली नाही आणि त्याचा पदार्पणाचा सामनाच त्याचा शेवटचा सामना ठरला. या सामन्यात तो नाबाद राहिल्यामुळे वनडे कारकिर्दीत कधीही बाद न होण्याचा अनोखा पराक्रम त्याच्या नावे झाला आहे.
सौरभ तिवारी (Saurabh Tiwary)
आयपीएलमध्ये आपल्या ताबडतोब फलंदाजीसाठी ओळखला जाणाऱ्या सौरभ तिवारीला वनडे क्रिकेटमध्ये एकही गोलंदाज बाद करू शकलेला नाही. त्याने आयपीएलमधील प्रदर्शनाच्या जोरावरच २०१० मध्ये भारताच्या वनडे संघात जागा मिळवली होती. ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्याने वनडे क्रिकेटचा पहिला सामना खेळला होता. त्यानंतर त्याला केवळ ३ वनडे सामने खेळण्याची संधी मिळाली, ज्यातील २ डावांमध्ये फलंदाजी करताना त्याने ४९ धावा केल्या होत्या. या दोन्हीही डावात तो नाबाद राहिल्याने वनडे कारकिर्दीत नाबाद राहण्याचा विक्रम त्याच्या खात्यात जमा झाला आहे.
भरत रेड्डी (Bharat Reddy)
माजी भारतीय क्रिकेटपटू भरत रेड्डी यांचे नावही या यादीत सहभागी आहे. त्यांनी १९७८ मध्ये पाकिस्तानविरुद्ध वनडे क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर ३ वनडे सामने खेळताना त्यांनी ११ धावा केल्या होत्या. या धावा करताना ते नाबाद राहिले होते. त्यामुळे त्यांचे नाव या यादीत जोडले गेले आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
हैदराबाद-केरला ब्लास्टर्समध्ये आज फायनल; आयएसएलला मिळणार नवा विजेता