टी20 विश्वचषक 2024 चा 19वा सामना भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना झाला. या सामन्यात टीम इंडियानं 6 धावांनी रोमांचक विजय मिळवला. स्पर्धेतील भारताचा हा सलग दुसरा विजय आहे, तर पाकिस्तानचा सलग दोन सामन्यांमध्ये पराभव झालाय. टी20 विश्वचषकाच्या इतिहासात भारताचा पाकिस्तानविरुद्धचा हा 7वा विजय आहे.
या सामन्यात पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमनं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघ 19 षटकांत 119 धावांवर ऑलआऊट झाला. प्रत्युत्तरात, पाकिस्तानचा संघ संपूर्ण षटक खेळून 113/7 धावाच करू शकला.
एकेवेळी पाकिस्तान हा सामना सहज जिंकेल असं वाटत होतं, मात्र मोक्याच्या क्षणी केलेल्या काही चुकांमुळे त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं. या बातमीद्वारे आम्ही तुम्हाला या सामन्यातील पाकिस्तानच्या या 3 मोठ्या चुकांबद्दल सांगणार आहोत.
(3) खराब क्षेत्ररक्षण
पाकिस्तानच्या खराब क्षेत्ररक्षणाची नेहमीच खिल्ली उडवली जाते. या महत्त्वाच्या सामन्यातही संघाचं क्षेत्ररक्षण खूपच खराब होतं. पाकिस्तानी खेळाडूंनी रिषभ पंतचे अनेक झेल सोडले, ज्याचा फायदा घेत त्यानं 42 धावांची महत्त्वपूर्ण खेळी खेळली. पंतच्या खेळीमुळे टीम इंडियाला अवघड खेळपट्टीवर आव्हानात्मक धावसंख्या उभारता आली.
(२) महत्त्वाच्या क्षणी मोहम्मद रिझवानचा खराब शॉट
या सामन्यात पाकिस्तानकडून मोहम्मद रिझवाननं सर्वाधिक धावा केल्या. जोपर्यंत तो क्रीजवर होता तोपर्यंत पाकिस्तान सामना सहज जिंकेल असं वाटत होतं, कारण तो सातत्यानं स्ट्राईक रोटेट करत होता. मात्र 15व्या षटकात जसप्रीत बुमराह आक्रमणावर परतला. रिझवाननं या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला आणि तो बाद झाला. यानंतर पाकिस्तानवर दडपण आलं आणि टीम इंडियानं सामन्यात शानदार पुनरागमन केलं.
(1) इमाद वसीमचे अधिक डॉट बॉल खेळणे
या सामन्यात पाकिस्ताननं आझम खानच्या जागी इमाद वसीमला खेळवलं. पण तोच संघाच्या पराभवाचं मोठं कारण ठरला. इमादनं 23 चेंडूत 15 धावा केल्या. त्यानं फलंदाजी करताना मोठे फटके खेळण्याचा प्रयत्नही केला नाही, ज्यामुळे संघावर दबाव वाढत गेला आणि शेवटी धावा जास्त आणि चेंडू कमी झाले.
महत्त्वाच्या बातम्या –
पाकिस्तानच्या पराभवानंतर ढसाढसा रडला नसीम शाह, मैदानावरचा व्हिडिओ व्हायरल
टीम इंडियाच्या पाकिस्तावरील थरारक विजयाचे 3 हिरो, एका खेळाडूचं नाव कोणाच्याच तोंडी नाही
टीम इंडियाचा कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानला धोबीपछाड! गोलंदाजांची अविश्वसनीय कामगिरी