पर्थमध्ये 295 धावांनी मोठा विजय मिळवून ऑस्ट्रेलिया दौऱ्याची शानदार सुरुवात केल्यानंतरही भारतीय संघानं बॉर्डर-गावस्कर मालिका 3-1 ने गमावली आहे. 2015 नंतर प्रथमच ऑस्ट्रेलियाला ही ट्रॉफी जिंकण्याची संधी मिळाली आहे. रोहित शर्मानं पाच पैकी तीन आणि जसप्रीत बुमराहने दोन कसोटीत भारताचं नेतृत्व केलं. या दौऱ्यात भारतानं बुमराहच्या नेतृत्वाखाली एकमेव कसोटी जिंकली होती. या मालिकेनंतर भारताच्या कसोटी संघात नक्कीच काही बदल होतील. ते बदल काय असावेत, यावर एक नजर टाकूया.
(3) कसोटीसाठी वेगळा प्रशिक्षक असावा – गौतम गंभीर भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक झाल्यापासून कसोटी क्रिकेटमधील संघाची कामगिरी खालावली आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या मायदेशातील कसोटी मालिकेत अनेक चुकीचे निर्णय घेण्यात आल्याचं दिसलं. ऑस्ट्रेलिया दौऱ्यातही अनेक वेळा प्लेईंग इलेव्हनमधील निवड अचूक होत नव्हती. गंभीरनं त्याचं सर्व प्रशिक्षण फक्त टी20 लीगमध्येच केलं होतं. अशा स्थितीत तो कसोटी क्रिकेटमध्ये चांगलाच अडचणीत येताना दिसत आहे.
(2) चेतेश्वर पुजारासारखा फलंदाज शोधावा लागेल – सिडनी कसोटी संपल्यानंतर गंभीरनं म्हटलं आहे की, जे खेळाडू उपलब्ध आहेत आणि कसोटी क्रिकेट खेळू इच्छितात त्यांनी रणजी ट्रॉफीमध्ये भाग घ्यावा. देशांतर्गत क्रिकेटमध्ये अनेक फलंदाज सातत्यानं चांगली कामगिरी करत असल्यानं आता भारतीय संघाच्या फलंदाजीत बदल व्हायला हवा. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर भारताच्या पराभवाचं सर्वात मोठं कारण संघाची फ्लॉप फलंदाजी होती. भारताला चेतेश्वर पुजारासारख्या कसोटी विशेषज्ञ फलंदाजांचा शोध घेऊन त्याला संघात आणावं लागेल.
(1) रोहित शर्माला डच्चू द्यावा – गेल्या आठ कसोटी सामन्यांवर नजर टाकली तर, रोहित शर्मानं त्यातील सहा सामन्यांमध्ये भारताचं नेतृत्व केलं. या सहाही सामन्यांमध्ये त्याची कामगिरी अत्यंत खराब राहिली. प्लेइंग इलेव्हनची निवड करण्यापासून ते फिल्डिंग लावण्यापर्यंत, रोहितकडून सातत्यानं चुका होत आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये खेळपट्टी समजून घेणं ही देखील खूप महत्त्वाची गोष्ट आहे. रोहित यातही अपयशी ठरलाय. त्यामुळे आता कारकिर्दीच्या शेवटच्या टप्प्यावर असलेल्या रोहितला हटवून दीर्घकाळ नेतृत्व करू शकणाऱ्या खेळाडूकडे कसोटी संघाचं कर्णधारपद द्यावं.
हेही वाचा –
रोहित-विराटच्या भविष्यावर गौतम गंभीरची मोठी प्रतिक्रिया, पराभवानंतर बोलताना म्हणाला…
वन मॅन आर्मी! या खेळाडूने जिंकला बॉर्डर-गावस्कर मालिकेचा ‘प्लेअर ऑफ द सिरीज’ पुरस्कार
सिडनी कसोटीत टीम इंडियाचा पराभव का झाला? 5 मोठी कारणं जाणून घ्या