गेल्या चार महिन्यांपासून भारताचा कसोटी संघ इंग्लंड दौऱ्यावर होता. या दौऱ्यात भारतीय संघाला आयसीसी कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना आणि इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिका खेळायची होती. मात्र, इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिका सुरु असतानाच कोरोनाचे संकट उभे राहिले. त्यामुळे ५ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील अखेरचा सामना रद्द करावा लागला. परिणामी, भारतीय खेळाडू हा इंग्लंडचा दौरा संपवून युएईमध्ये आयपीएल २०२१ हंगामाचा दुसरा टप्पा खेळण्यासाठी पोहचले.
इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत भारतीय संघ ४ सामन्यांनंतर २-१ अशा फरकाने आघाडीवर होता. असे असताना अखेरचा सामना न होणे, दोन्ही संघांच्या चाहत्यांसाठी निराशाजनक होते. इंग्लंडच्या दौऱ्याचा शेवट जरी अपेक्षेप्रमाणे झाला नसला, तरी या दौऱ्यादरम्यान अनेक गोष्टी घडल्या, ज्याबद्दल क्रिकेटविश्वात चर्चा झाल्या. अशाच चार वादग्रस्त घटनाबद्दल आढावा घेऊ.
१. पाचवा कसोटी सामना करावा लागला रद्द
कसोटी मालिकेतील चौथा सामना सुरु असताना भारताचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री, गोलंदाजी प्रशिक्षक भारत अरुण आणि क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आर श्रीधर हे कोरोना पॉझिटिव्ह आढळले. तसेच ५ वा सामना होण्याच्या एकदिवस आधी फिजिओ योगेश परमारही कोरोना पॉझिटिव्ह आढळले. त्यामुळे, हा सामना रद्दल करण्याचा निर्णय घेण्यात आला.
सामना रद्द झाल्यामुळे अनेकांनी आयपीएलला यासाठी जबाबदार धरले, तर अनेकांनी रवी शास्त्री आणि विराट कोहलीने पुस्तक प्रकाशनाला हजेरी लावल्याबद्दल टिका केली. त्यामुळे हा एकप्रकारे वादाचा मुद्दा बनून राहिला.
सध्यातरी या कसोटी मालिकेचा निकाल प्रलंबित करण्यात आला आहे. दोन्ही संघांच्या बोर्डाची याबद्दल बैठक झाल्यानंतर अंतिम निर्णय घेण्यात येईल. तसेच असे म्हटले जात आहे की सामना सामना पुढीलवर्षी जेव्हा भारतीय संघ मर्यादीत षटकांच्या मालिका खेळण्यासाठी इंग्लंड दौरा करणार आहे, तेव्हा खेळवला जाऊ शकतो.
२. आर अश्विनला संधी नाही
दिग्गज फिरकीपटू आर अश्विन भारताच्या सध्याच्या कसोटी संघातील सर्वोत्तम गोलंदाजांपैकी एक आहे. त्याने कसोटीत ४०० पेक्षाही अधिक विकेट्स घेतल्या आहेत. असे असतानाही भारतीय संघाने इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या चारही सामन्यात अश्विनला अंतिम ११ जणांच्या संघात खेळवले नाही. त्यामुळे अनेकांनी भारताच्या संघव्यवस्थापनेवर टिका केली.
भारतीय संघाने ४ वेगवान गोलंदाज आणि १ फिरकीपटू या फॉर्म्यूल्यासह चारही कसोटी सामने खेळले. फिरकीपटू म्हणून रविंद्र जडेजाला अश्विनऐवजी संधी मिळाली. मात्र, यामुळे बरीच चर्चा झाली.
३. रहाणेच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह
या संपूर्ण दौऱ्यात भारतीय संघासाठी उपकर्णधार अजिंक्य रहाणेची फलंदाजी चिंतेचा विषय ठरली. रहाणेला केवळ एकदाच ५० धावांचा आकडा पार करता आला. त्याने लॉर्ड्समध्ये ६१ धावांची खेळी केली. याव्यतिरिक्त त्याला एकदाही खास कामगिरी करता आली नाही. असे असतानाच त्याला सातत्याने मिळणारी संधी टीकेचा विषय ठरु लागली. इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत तर त्याच्यापेक्षा रविंद्र जडेजा, शार्दुल ठाकूर यांच्या नावावर अधिक धावा लागल्या. त्याने ४ सामन्यांत १५.५७ च्या सरासरीने केवळ १०९ धावा केल्या.
४. जार्वोची सातत्याने घुसखोरी
कसोटी मालिकेदरम्यान भारताच्या दमदार कामगिरीबरोबरच कोणाची चर्चा झाली असेल तर ती भारतीय क्रिकेटचा चाहता असल्याचे भासवणाऱ्या आणि सातत्याने मैदानात घुसणाऱ्या जार्वोची. ६९ क्रमांकाची आणि त्यावर जार्वो नाव लिहिलेली जर्सी घालून एक व्यक्ती तीनवेळा मैदानात घुसला होता. ओव्हल कसोटीदरम्यान तर त्याला अटकही करण्यात आली होती. पण त्याची सातत्याने होणारी घुसखोरी वादाचा विषय ठरली.
ओव्हल कसोटी दरम्यान तो अचानक मैदानात जोरात धावत आला आणि गोलंदाजी करण्याची कृती करु लागला. त्यावेळी तो नॉन-स्ट्रायकरवर असलेल्या बेअरस्टोला देखील जोरात जाऊन धडकला होता. त्यापूर्वी तो यापूर्वी लॉर्ड्स आणि हेडिंग्ले कसोटीतही मैदानात घुसला होता. लॉर्ड्स कसोटी दरम्यान तो क्षेत्ररक्षण करण्याच्या हेतूने, तर हेडिंग्ले कसोटी दरम्यान बॅट घेऊन मैदानात उतरला होता.
त्याच्या या घुसखोरीमुळे इंग्लंडच्या सुरक्षा यंत्रणेवर प्रश्नचिन्ह उपस्थित राहिले होते. अनेकांनी या प्रकरणाकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज असल्याचे म्हटले होते.
महत्त्वाच्या बातम्या –
श्रीलंकेविरुद्ध ६९ धावांची खेळी केल्यानंतर दीपक चाहरला धोनीने केला होता ‘हा’ मेसेज
तब्बल १८ वर्षाच्या प्रदीर्घ काळानंतर न्यूझीलंड खेळणार पाकिस्तानात
‘पलटन, किती मोदक खाल्ले आत्ता पर्यंत?’, मुंबई इंडियन्सने शेअर केला खेळाडूंचा मजेशीर व्हिडिओ