आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्ज हा संघ एक बलाढ्य संघ मानला जातो. या संघाने प्रत्येक हंगामात प्ले-ऑफमध्ये प्रवेश केला आहे. आयपीएलमध्ये तीन वेळा चेन्नई सुपर किंग्जने विजेतेपद जिंकले आहे. यंदाच्या आयपीएल हंगामातही चाहत्यांना चेन्नई सुपर किंग्जच्या संघाकडून मोठ्या अपेक्षा असतील.
यावेळी चेन्नई सुपर किंग्जचा संघ आयपीएलमधील प्रबळ दावेदारांपैकी एक मानला जात आहे. त्याच्याकडे एमएस धोनीसारखा अनुभवी कर्णधार असून युवा आणि अनुभवी खेळाडू देखील आहेत. या १३ व्या हंगामातील पहिलाच सामना चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध गतविजेता मुंबई इंडियन्स संघ असा होईल. गेल्या आयपीएलमध्येही या दोन संघांमध्ये अंतिम सामना खेळवला गेला होता.
चेन्नई सुपर किंग्जच्या गोलंदाजांशिवाय वेळोवेळी फलंदाजांनीही बर्यापैकी आपली छाप पडली आहे. यापैकी काही फलंदाजांनी आपल्या फलंदाजीतून अर्धशतक ठोकून संघाला मदत केली. या लेखात त्यापैकी तीन फलंदाजांचा उल्लेख आहे, ज्यांनी चेन्नई सुपर किंग्जकडून खेळताना संघासाठी सर्वात वेगवान अर्धशतक झळकावली आहेत.
चेन्नई सुपर किंग्ज संघाकडून ठोकलेले ३ जलद अर्धशतक
सॅम बिलिंग्ज (Sam Billings)
सॅम बिलिंग्जने २०१८ आयपीएलमध्ये कोलकाता नाइट रायडर्सविरूद्ध २१ चेंडूत अर्धशतक ठोकले होते, जे या संघाकडून केलेले सर्वात वेगवान तिसरे अर्धशतक आहे. केकेआरविरुद्धच्या सामन्यात लक्ष्याचा पाठलाग करताना त्याने २ चौकार आणि ५ षटकारांच्या मदतीने २३ चेंडूत ५६ धावा केल्या होत्या. चेन्नई सुपर किंग्ज संघाला २०० पेक्षा जास्त धावांचे लक्ष्य साध्य करण्यासाठी बिलिंग्जने महत्त्वपूर्ण योगदान दिले. या वादळी खेळीसाठी सॅम बिलिंग्जला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला. बिलिंग्जची ही खेळी संस्मरणीय ठरली होती.
एमएस धोनी (MS Dhoni)
२०१२ च्या आयपीएलमध्ये एमएस धोनीने मुंबई इंडियन्सविरुद्ध २० चेंडूंत अर्धशतक ठोकले होते. माईक हसी आणि बद्रीनाथ यांनी दोन गडी बाद झाल्यावर भागीदारी रचली होती. यानंतर मैदानावर एमएस धोनीने आक्रमक पवित्रा घेत मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांचा धुव्वा उडविला होता. एमएस धोनीने आपल्या या खेळीत ६ चौकार आणि २ षटकार लगावले आणि त्याने नाबाद ५१ धावांची तुफानी खेळी केली होती.
सुरेश रैना (Suresh Raina)
‘मिस्टर आयपीएल’ सुरेश रैनाने २०१४ मध्ये किंग्ज इलेव्हन पंजाबी विरुद्ध १६ चेंडूत अर्धशतक पूर्ण केले होते. वीरेंद्र सेहवागच्या शतकी खेळीच्या जोरावर किंग्ज इलेव्हन पंजाबने २२६ धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल सुरेश रैनाने जोरदार फलंदाजी केली. त्याने २५ चेंडूत ८७ धावा केल्या आणि तो बाद झाला. या खेळीदरम्यान त्याने १२ चौकार आणि ६ षटकार लगावले होते. सर्व प्रयत्न करूनही त्याच्या संघाला पराभवाला सामोरे जावे लागले.