आयपीएलचा तेरावा हंगाम युएईमध्ये १९ सप्टेंबरपासून सुरू होतोय. सर्व संघ कदाचित ऑगस्टच्या अखेरच्या आठवड्यात युएईला रवाना होतील. रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा संघदेखील आयपीएलसाठी सज्ज झाला असून, या हंगामात आपले पहिलेवहिले आयपीएल विजेतेपद मिळवण्यासाठी ते इच्छुक असतील.
आरसीबीच्या संघाने आत्तापर्यंत तीन वेळा आयपीएलची अंतिम फेरी गाठली आहे मात्र, एकदाही ते चषक उंचावू शकले नाहीत. दरवर्षी प्रमाणेच, यावर्षीदेखील बेंगलोरच्या संघात एकाहून एक सरस फलंदाज आहेत. त्यातल्या त्यात, सलामी फलंदाजीचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत.
कर्णधार विराट कोहली, आरोन फिंच, पार्थिव पटेल, देवदत्त पडिक्कल, जोशुआ फिलिप यासारखे अनेक सलामीवीर संघात आहेत. त्यांमधून सर्वोत्तम सलामी जोडी निवडणे हे कर्णधार व संघ व्यवस्थापनासाठी डोकेदुखी ठरू शकते. आज आम्ही तुम्हाला अशाच, तीन सलामी जोड्यांविषयी तुम्हाला सांगू, जे बेंगलोरसाठी सलामी देऊ शकतात.
१) ऍरॉन फिंच आणि पार्थिव पटेल
या यादीत प्रथम क्रमांकावर ऍरॉन फिंच आणि पार्थिव पटेल ही जोडी आहे. आरसीबी संघ कदाचित सर्वाधिक प्राधान्य याच जोडीला देईल. कारण, हे दोन्ही फलंदाज खूप अनुभवी आहेत आणि आपापल्या राष्ट्रीय संघासाठी ते सलामीवीर म्हणून खेळतात.
ऍरॉन फिंचच्या आगमनाने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूची फलंदाजी आधीपेक्षा जास्त सक्षम झाली आहे. ऑस्ट्रेलियाचा मर्यादित षटकांच्या क्रिकेटचा हा कर्णधार जगातील सर्वधिक विस्फोटक सलामीवीरांपैकी एक आहे. तर, दुसरीकडे पार्थिव पटेल जबाबदारीने डावाला आकार देऊ शकतो. यूएईमधील खेळपट्ट्यांनुसार, आरसीबीसाठी ही सलामीची जोडी सर्वात्तम कामगिरी करू शकते.
२) पार्थिव पटेल व देवदत्त पडिक्कल
पार्थिव पटेल व देवदत्त पडिक्कल ही जोडी दुसरा संभावित पर्याय होऊ शकते. गेल्या दोन वर्षात पडिक्कलने देशांतर्गत क्रिकेटमध्ये खोर्याने धावा काढल्या आहेत. २०१९-२०१० च्या रणजी ट्रॉफी, विजय हजारे ट्रॉफी व सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी या स्पर्धांत त्याने कर्नाटकसाठी सर्वाधिक धावा काढल्या होत्या.
पार्थिव पटेलसारख्या अनुभवी खेळाडू सोबत तो सलामीला येऊ शकतो. परदेशी खेळाडूंचे नियोजन करताना फिंच बाहेर बसल्यास, पडिक्कलला संधी मिळू शकते.
३) ऍरॉन फिंच व जोशुआ फिलिप
आरसीबी फिंच व फिलिप या जोडीला देखील संधी देऊ शकते. मात्र, हे दोघे एकत्र खेळले तर अंतिम ११ मध्ये आणखी फक्त दोनच परदेशी खेळाडूंना संधी मिळेल. त्यामुळे, मोइन अली, डेल स्टेन, क्रिस मॉरिस यांसारख्या दिग्गजांनापैकी फक्त एकच जण खेळू शकतो. चौथा खेळाडू म्हणून एबी डिव्हिलियर्स संघात कायम असतो.
फिलिप हा ऑस्ट्रेलियामधील नावाजलेला टी२० सलामीवीर आहे. २०१९ बिग बॅशमध्ये त्याने ४८७ धावा कुटल्या होत्या. त्यामुळे, महत्त्वाच्या सामन्यात या जोडीचा देखील विचार केला जाऊ शकतो.