युएईमध्ये आयपीएलच्या १३ व्या हंगामाला सुरुवात झाली. सर्व सामने रोमांचक होताना दिसत आहेत. सर्वच संघ मोठी धावसंख्या उभारण्यात यशस्वी झाले आहेत. काही खेळाडूंनी शतके-अर्धशतकेही केली. गोलंदाजही तितक्याच ताकदीने गोलंदाजी करताना दिसत आहेत. या हंगामात सुरुवातीच्या ११ सामन्यांपैकीच ५ संघांनी २०० चा आकडा गाठला, तर २ सामने सुपर ओव्हर पर्यंत देखील पोचले.
यावर्षी आयपीएलचे सामने दुबई, अबूधाबी आणि शारजाह येथे सामने खेळले जात आहेत. हे तिन्ही आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट स्टेडियम आहेत. आतापर्यंत या मैदानांवर भारतीय आणि परदेशी खेळाडूंनी जबरदस्त क्रिकेट खेळून टीव्हीवर सामने पाहणार्या प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले आहे. या आयपीएल हंगामामध्ये आतापर्यंत २ शतके झाली आहेत, त्यातील एक शारजाहमध्ये मयंक अगरवालने केले. शारजाहचे मैदान पाहिले तर ते आकाराने लहान आहे. त्यामुळे फलंदाजांना मोठे फटके खेळताना बऱ्यापैकी सोपे होते. त्यामुळे कदाचीत येत्या आयपीएल सामन्यात देखील शारजाहमध्ये फलंदाजांनी शतके केलेली पहायला मिळू शकतात. या लेखातही अशा ३ फलंदाजांचा आढावा घेतला आहे, जे यंदाच्या आयपीएलमध्ये शारजाहच्या मैदानावर शतक ठोकू शकतात.
आयपीएलमधील 3 फलंदाज जे शारजाहमध्ये शतक ठोकू शकतात
रोहित शर्मा
मुंबई इंडियन्स संघाचा कर्णधार ‘हिटमॅन’ रोहित शर्माने या हंगामात आतापर्यंत ३ सामने खेळले आहेत. त्याच्या बॅटमधून या हंगामात आतापर्यंत ७ षटकार आणि ५ चौकार लागले आहेत. अबुधाबी सारख्या मोठ्या मैदानात खेळताना त्याने मोठे फटके मारून षटकार ठोकले आहेत. या वरून शारजाह सारख्या छोट्या मैदानात तो चेंडू सहज सीमारेषेबाहेर मारू शकतो. जर असे झाले तर तो यंदा शारजाहमध्ये शतकही करु शकतो. आतापर्यंत आयपीएलमध्ये रोहितने एकाच शतक ठोकले आहे. तर यंदाच्या आयपीएलमध्ये त्याने केकेआरविरुद्ध ८० धावा केल्या आहेत.
अंबाती रायुडू
चेन्नई सुपर किंग्जचा फलंदाज अंबाती रायुडु यंदा चांगल्या लयीत दिसत आहे. त्याने मुंबई इंडियन्सविरुद्ध पहिला सामना खेळताना रायडूने ७१ धावांची महत्वपूर्ण खेळी केली आणि चेन्नई संघाला सामना जिंकून दिला होता. परंतु नंतर तो दुखापतग्रस्त झाल्याने पुढील २ सामने खेळी शकला नाही. यात एक सामना शारजाहमध्येही झाला. पण आता तो दुखापतीतून सावरल्यानंतर कसे पुनरागमन करतो हे पहावे लागेल. पण जर रायुडू चांगल्या लयीत असेल तर तो शारजाहमध्ये नक्कीच पुढील आयपीएल सामन्यांत एखादे शतक करु शकतो.
रिषभ पंत
दिल्ली कॅपिटल्स संघाचा धडाकेबाज फलंदाज रिषभ पंत देखील शारजाह मैदानावर शतक झळकावू शकतो. तो मोठे षटकार मारण्यात तरबेज आहे. आयपीएल २०१८ मध्ये पंतने एक शतक ठोकले आहे. यावेळी तो शारजाहमध्ये खेळून शतकांची संख्या वाढवू शकतो. तो सध्यातरी चांगल्या फॉर्ममध्ये दिसत आहे.