महान क्रिकेटर कपिल देव क्रिकेटमधून निवृत्त झाल्यापासून भारताला कधीच जागतिक स्तरावर दखल घेतली जाईल असा अष्टपैलू खेळाडू मिळाला नाही. मागील काही दशकांत रवी शास्त्री, इरफान पठाण आणि रविचंद्रन अश्विन यासारख्या खेळाडूंना सर्वोत्कृष्ट नाही पण बऱ्यापैकी कामगिरी करताना आपण पाहिले आहे.
सध्या, रवींद्र जडेजा आणि हार्दिक पांड्या या अष्टपैलू खेळाडूंनी आक्रमक फलंदाजी, किफायतशीर गोलंदाजीसह अप्रतिम क्षेत्ररक्षणाच्या कौशल्यामुळे अष्टपैलू खेळाडू म्हणून चांगले नाव कमावले आहे. तथापि, वर्षानुवर्षे टीम इंडियामध्ये चांगल्या अष्टपैलू खेळाडूची असलेली उणीव सध्यातरी ते भरून काढत असलेले दिसत आहेत.
एकदिवसीय क्रिकेट सुरू झाल्यापासून भारताच्या फक्त तीन खेळाडूंनी ५,००० धावा आणि १०० बळी अशी कामगिरी केली आहे. हे तीनही खेळाडू प्रामुख्याने आपल्या फलंदाजीसाठी ओळखले जातात.
आजच्या लेखात आपण अशी अनोखी कामगिरी करणाऱ्या त्या तीन खेळाडूंविषयी जाणून घेऊया.
युवराज सिंग (Yuvraj Singh)
भारताचा माजी खेळाडू युवराज सिंग हा या यादीमध्ये समाविष्ट आहे. ३०४ वनडे सामन्यांमध्ये ३६.५५ च्या सरासरीने व ८७.६७ च्या स्ट्राईक रेटने त्याने ८,७०१ धावा फटकावल्या आहेत. भारताचा सर्वोत्कृष्ट क्रमांक ४ चा खेळाडू म्हणून देखील तो ओळखला जाते.
युवराज आक्रमक फलंदाजी सोबतच डाव्या हाताने फिरकी गोलंदाजी करण्यात माहीर होता. ५.१ च्या मामुली सरासरीने त्याने १११ बळी मिळवले आहेत. त्याचे गोलंदाजीतील सर्वोत्तम प्रदर्शन २०११ विश्वचषक स्पर्धेमध्ये आले होते. पूर्ण स्पर्धेत त्याने १५ बळी आपल्या नावे केले होते. एकाच सामन्यात पाच बळी आणि अर्धशतक अशी कामगिरी करणारा तो पहिला भारतीय खेळाडू होता.
युवराजच्या निवृत्तीनंतर, टीम इंडियाला चौथ्या क्रमांकाचा कायमस्वरूपी फलंदाज अजून भेटलेला नाही. सोबतच, त्याच्यामुळे मिळणारा सहाव्या गोलंदाजाचा पर्यायदेखील बंद झाला आहे.
सौरव गांगुली ( Sourav Ganguly )
भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली देखील अशी कामगिरी करणारा खेळाडू आहे. गांगुलीने ३११ एकदिवसीय सामन्यात भारताचे प्रतिनिधित्व करताना ४१.०२ च्या सरासरीने ११,३६३ धावा जमविल्या आहेत. आपल्या कल्पक नेतृत्वाशिवाय फलंदाज आणि गोलंदाजी करत गांगुलीने बरोबर १०० विकेट्स आपल्या नावे केल्या.
उपयोगी मध्यमगती गोलंदाज म्हणून गांगुली प्रसिद्ध होता. वनडे क्रिकेटमध्ये एका डावात पाच बळी घेण्याची कामगिरी देखील गांगुलीने दोन वेळा केली आहे. त्यापैकी एक झिंबाब्वे तर एक कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तान विरुद्ध १९९७ च्या सहारा कपमध्ये केली होती. त्यावेळी १६ धावा देऊन ५ गडी गारद केले.
गांगुलीने आपल्या अष्टपैलू कामगिरीने अनेकांना आश्चर्यचकित केले होते. अनेक महत्त्वपूर्ण सामन्यात संघाला विजय मिळवून. तरीही, भारतीय क्रिकेटमध्ये तो एक जास्त चर्चा न झालेला अष्टपैलू म्हणून राहिला.
सचिन तेंडुलकर ( Sachin Tendulkar)
फलंदाजी मधील जवळपास सर्व विक्रम ज्याच्या नावे आहेत तो सचिन तेंडुलकर वनडेमध्ये पाच हजार धावा आणि शंभर बळी मिळवणाऱ्या खेळाडूंच्या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे. सचिनचे गोलंदाजीतील योगदान कोणीही विसरू शकत नाही अनेक अविस्मरणीय विजय त्याने गोलंदाजीच्या जोरावर मिळवून दिले आहेत.
विक्रमी ४६३ एकदिवसीय सामने खेळताना सचिनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक १८,४२६ धावांचा पहाड उभा केला आहे. यादरम्यान त्याची सरासरी ४४.८३ तर स्ट्राईक रेट ८३.२३ इतका राहिला. सचिनच्या नावे एकदिवसीय क्रिकेटमध्ये ४९ शतके जमा आहेत.
उजव्या हाताने ऑफ स्पिन गोलंदाजी करताना, सचिनची गोलंदाजीची आकडेवारी ही, ५.१ च्या सरासरीने १५४ बळी इथपर्यंत जाते. त्यामध्ये दोन वेळा पाच बळींचा समावेश देखील आहे.