एकविसाव्या शतकाच्या सुरुवातीला क्रिकेटमध्ये असे म्हटले जायचे की, एक फलंदाज आणि एक फिरकी गोलंदाज मिळून गडी बाद करतात. आकडेवारीवर नजर टाकली तर असे दिसून येते की, कसोटी सामन्यांमध्ये भारताचा अनुभवी फलंदाज राहुल द्रविडने फिरकीपटू अनिल कुंबळेच्या गोलंदाजीवर आपल्या २१० झेलांपैकी ५५ झेल घेतले आहेत. श्रीलंकेच्या माहेला जयवर्धने त्याच्यापुढे जात, मुथय्या मुरलीधरनच्या गोलंदाजीवर तब्बल ७७ झेल पकडले.
द्रविड आणि कुंबळे यांच्या जोडीने निवृत्तीनंतरही आपली क्षमता दाखवली. द्रविड भारतीय युवा संघाचा प्रशिक्षक, तर अनिल कुंबळे हा भारताच्या राष्ट्रीय संघाचा मुख्य प्रशिक्षक बनला. द्रविडच्या मार्गदर्शनाखाली भारताच्या १९ वर्षांखालील क्रिकेट संघाने विश्वचषक जिंकला. त्याचवेळी अनिल कुंबळेच्या प्रशिक्षणाखाली राष्ट्रीय क्रिकेट संघाने चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात प्रवेश केला होता.
या दोन दिग्गज खेळाडूंच्या अनुभवाचा फायदा भारतीय क्रिकेटसाठी अनेकदा होत आला आहे. या दोघांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेले अनेक क्रिकेटपटू सध्या भारताचे प्रतिनिधित्व करतात. आज अशाच, तीन खेळाडूंबाबत आपण जाणून घेणार आहोत, ज्यांना द्रविड आणि कुंबळे यांच्या मार्गदर्शनाचा लाभ झाला.
द्रविड आणि कुंबळे यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेले त्रिकूट
१. हार्दिक पंड्या
चांगल्या अष्टपैलू मध्यमगती गोलंदाजाचा शोध भारतीय संघ अनेक दिवसांपासून घेत होता. अष्टपैलू हार्दिक पंड्यावर येऊन भारताचा हा शोध संपला. पंड्याने इंडियन प्रीमियर लीगमध्ये आपल्या स्फोटक फलंदाजी आणि चांगल्या मध्यमगती गोलंदाजीने नाव कमावले होते.
मुंबई इंडियन्सकडून खेळताना पंड्याने फलंदाजी, क्षेत्ररक्षण आणि गोलंदाजीमुळे सर्वांची मने जिंकली होती. मुंबई इंडियन्सचा तत्कालीन प्रशिक्षक अनिल कुंबळेदेखील पंड्याच्या कामगिरीने प्रभावित झाला होता. हेच कारण होते की, जेव्हा कुंबळे राष्ट्रीय संघाचा मुख्य प्रशिक्षक झाला, तेव्हा पंड्याला वनडे संघात स्थान देण्यास त्याने अजिबात उशीर केला नाही. त्याच्या यशाचे सर्वाधिक श्रेय कुंबळे आणि द्रविड यांना जाते.
हार्दिक पंड्या स्वत: म्हणाला आहे की, ‘जेव्हा त्याने भारत अ संघासह ऑस्ट्रेलिया दौरा केला, तेव्हा तो मानसिकदृष्ट्या खूप मजबूत झाला. या गोष्टीचे संपूर्ण श्रेय संघाचे प्रशिक्षक राहुल द्रविड यांना जाते. द्रविड यांनी मला मानसिकदृष्ट्या बळकट केले म्हणूनच या दौर्यानंतर माझ्या खेळाची पातळी खूप सुधारली आहे.’
२. मनीष पांडे
आयपीएलच्या दुसर्या हंगामात मनीष पांडेने रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरकडून खेळताना चांगली कामगिरी केली होती. त्यावेळी राहुल द्रविड आणि अनिल कुंबळे हे आरसीबीच्या संघाचा भाग होते. या दोन्ही दिग्गज खेळाडूंनी त्याला खूप प्रोत्साहन दिलेले.
द्रविड आणि कुंबळे हे कर्नाटकचे असून मनीष पांडेदेखील कर्नाटकचाच असल्याने तो या दोन्ही दिग्गजांचा वारंवार सल्ला घेत असतो. द्रविडच्या मार्गदर्शनामुळे पांडेच्या खेळात सुधारणा झाल्याचे म्हटले जाते. मनीष पांडे जेव्हा भारत अ संघाचा कर्णधार होता, तेव्हा राहुल द्रविड त्या संघाचा प्रशिक्षक होता.
यानंतर त्याला राष्ट्रीय संघातही स्थान देण्यात आले. भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक अनिल कुंबळे यांनीदेखील नेहमीच पांडेचे समर्थन केले आणि फलंदाजीच्या क्रमातही त्याला बढती देऊन चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी पाठवलेले. २०१६ च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात अखेरच्या वनडे सामन्यात कठीण परिस्थितीत उत्कृष्ट शतक झळकावत त्याने भारतीय संघाला विजय मिळवून दिला होता. आजही मनीष भारताच्या मर्यादित षटकांच्या संघाचा सदस्य आहे.
३. केएल राहुल
सध्या भारताच्या मर्यादित षटकांच्या संघाचा उपकर्णधार असलेला केएल राहुल हादेखील कुंबळे आणि द्रविड यांच्याच तालमीत तयार झाला आहे. कर्नाटककडून खेळणारा राहुल आपल्या यशाचे श्रेय या दोन दिग्गजांना देत असतो. राहुलला एक उत्कृष्ट क्रिकेटपटू बनवण्यात या दोन्ही खेळाडूंचे अमूल्य योगदान आहे.
अनिल कुंबळे भारतीय संघाचे प्रशिक्षक असताना राहुलला सलामीला उतरवण्याची योजना त्यानेच ठरवली होती. कसोटीमध्ये सलामीला फलंदाजी करताना राहुलने ऑस्ट्रेलियात शतक झळकावण्याची कामगिरी केली आहे. सध्या आयपीएलमध्ये कुंबळे प्रशिक्षक असलेल्या किंग्ज इलेव्हन पंजाब संघाचे तो नेतृत्त्व करतो.
आपल्या कारकिर्दीत खराब फॉर्ममधून जात असताना राहुलने द्रविडची मदत घेतली होती. आपल्या सध्याच्या फॉर्मचे संपूर्ण श्रेय राहुल द्रविड यांना जाते, अशी प्रांजळ कबुली केएल राहुलने दिली आहे.
या तिघांव्यतिरिक्त संजू सॅमसन, अजिंक्य रहाणे, शुबमन गिल आणि पृथ्वी शॉ हे खेळाडू देखील या दोन दिग्गजांना आपल्या यशाचे श्रेय देतात.
महत्त्वाच्या बातम्या-
“तुझ्या गुगल्या राखून ठेव”, चहलला लग्नानंतर शुभेच्छा देत केले रोहितने ट्रोल
युवराज सिंग नाही, तर ‘या’ भारतीय दिग्गजाने ठोकल्यात एका षटकात सर्वाधिक धावा
‘अजिंक्य रहाणे गोलंदाजांचा कर्णधार’, संघ सहकाऱ्याने उधळली स्तुतिसुमने