भारतीय संघाने इंग्लंड संघाला कसोटी मालिकेत ३-१ ने पराभवाची धूळ चारली आहे. त्यानंतर भारत आणि इंग्लंज हे दोन्ही संघ ५ टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या मालिकेसाठी भिडणार आहेत. या मालिकेतील पहिला सामना आज (१२ मार्च) खेळला जाणार आहे. दोन्हीही संघांमध्ये मोठमोठे फटकेबाजी करणारे फलंदाज आहेत. सोबतच आपल्या भेदक माऱ्याने फलंदाजांना अडवणारे गोलंदाजही आहेत. त्यामुळे ही मालिका अतिशय चुरशीची होणार हे निश्चित आहे.
दरम्यान या मालिकेत ३ असे भारतीय खेळाडू आहेत, ज्यांच्या कामगिरीवर सगळ्यांचेच लक्ष लागून असणार आहे. त्याच खेळाडूंचा येथे आढावा घेण्यात आला आहे.
१) रोहित शर्मा : भारतीय संघाचा आक्रमक सलामीचा फलंदाज रोहित शर्मा याने नुकत्याच पार पडलेल्या कसोटी मालिकेत भारतीय संघाला चांगली सुरुवात करून देण्यात महत्वाचे योगदान दिले होते. ऑस्ट्रेलियाविरुध्द झालेल्या टी -२० मालिकेत त्याला दुखापतीमुळे संघात स्थान मिळाले नव्हते. रोहित शर्मा टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक (१२७) षटकार मारणारा दुसरा फलंदाज आहे. धावांच्या बाबतीतही तो टॉप-५ मध्ये आहे.
जर रोहित शर्मा या मालिकेत धावा करण्यात अपयशी ठरला, तर भारतीय संघाला विजय मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागू शकतो. त्यामुळे या मालिकेत संघाला त्याच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा असेल.
२) रिषभ पंत : ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड संघाविरुद्ध कसोटी मालिकेत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या रिषभ पंतला इंग्लंडविरुद्ध होणाऱ्या टी-२० मालिकेसाठी संधी देण्यात आली आहे. यापूर्वीही त्याला एक दिवसीय आणि टी -२० संघात स्थान देण्यात आले होते. परंतु त्याला साजेशी कामगिरी करण्यात अपयश आले होते. पंतने आतापर्यंत एकूण २८ टी-२० सामने खेळले आहेत. यात त्याने २०.५ च्या सरासरीने एकूण ४१० धावा केल्या आहेत. यात त्याने २ अर्धशतक झळकावले आहेत.
या मालिकेसाठी यष्टीरक्षक फलंदाज केएल राहुललाही संधी देण्यात आली आहे. अशात रिषभ पंत आपल्याला अंतिम ११ खेळाडूंमध्ये संधी मिळाल्यास आपले उत्कृष्ट देण्याचा प्रयत्न करेल.
३) युजवेंद्र चहल : भारतीय संघाचा फिरकी गोलंदाज युजवेंद्र चहल हा भारतीय संघासाठी प्रमुख भूमिका बजावू शकतो. परंतु ऑस्ट्रेलिया विरुद्ध झालेल्या टी-२० मालिकेत चहलला साजेशी कामगिरी करण्यात अपयश आले होते. त्याने ३ सामने खेळत अवघे ४ गडी बाद केले होते. टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या दृष्टीने चहल महत्वाचा गोलंदाज आहे. चहलने आतापर्यंत एकूण ४५ टी-२० सामने खेळले आहेत. यात त्याने ८.२९ च्या इकॉनोमीने ५९ गडी बाद केले आहेत. त्यामुळे भारतीय कर्णधार विराट कोहलीला चहलकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा असणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
T20 Series: हे आहेत ३ गोलंदाज, जे दुखापतग्रस्त टी नटराजनची घेऊ शकतात जागा