fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

भारताच्या ‘या’ खेळाडूंना वनडे कारकिर्दीत एकही चेंडू खेळण्याची संधी नाही मिळाली

यातील काही खेळाडूंना त्यांनी प्रतिनिधित्व केलेल्या सामन्यात फलंदाजी करता आली नाही. तर, काहीजण त्यानंतर पुन्हा वनडे सामन्यात दिसलेच नाहीत.

कसोटी सामन्यांनंतर क्रिकेटमध्ये एकदिवसीय सामन्यांना सुरुवात करण्यात आली. या नव्या प्रकाराने क्रिकेटचे सगळे स्वरुपच बदलून टाकले. ज्यात फलंदाजांप्रमाणेच गोलंदाजांनी देखील आपल्या बॅटचा जलवा दाखवायला सुरुवात केली.

“एकदिवसीय सामन्यांचे नियोजन होण्याअगोदर क्रिकेट जगतात फक्त गोलंदाजांचाच बोलबाला होता. अनेक दिग्गज गोलंदाज आपल्या बोटांच्या जादूवर संपुर्ण क्रिकेट सामन्यावर वर्चस्व गाजवत असत. मात्र, एकदिवसीय सामन्यांना सुरुवात झाली आणि क्रिकेटचे रुपडे पालटले. ज्यात फलंदाजांनी आपल्या बॅटने प्रेक्षकांच्या मनावर आणि क्रिकेटच्या मैदानावर अधिराज्य गाजवायला सुरुवात केली.”

तरिही या प्रकाराला खरी लोकप्रियता तेव्हाच लाभली, जेव्हा प्रमुख फलंदाजांप्रमाणेच अष्टपैलु खेळाडू आणि गोलंदाजांनी देखील चेंडू टोलवायला सुरुवात केली. फलंदाजांनी धावा करणे, हे सर्वांनाच अपेक्षित असते. मात्र, गोलंदाजांना धावा करताना पाहणे प्रेक्षकांना सुखावणारे असते.

एकदिवसीय सामन्यात संघातील प्रत्येक खेळाडू एकदा तरी प्रत्यक्ष मैदानावर बॅट फिरवण्यासाठी अतुर असतो. मात्र, तळातील फलंदाजांना ही संधी मिळतेच असे नाही.

“खरेतर भारताने क्रिकेट जगताला आजपर्यंत असे काही महान खेळाडू दिले आहेत. जे उत्तम गोलंदाज तर आहेतच, मात्र त्यांनी त्यांच्या फलंदाजीने सर्वांना चकीत केले. परंतु, भारताच्या क्रिकेट इतिहासात असेही काही खेळाडू आहेत. ज्यांनी एकदिवसीय सामन्यात देशाचे प्रतिनिधित्व केले असूनही त्यांना कधीही फलंदाजी करण्याची संधी मिळाली नाही.”

या लेखात आपण भारतीय संघातील असे तीन खेळाडू पाहणार आहोत. ज्यांनी आजपर्यंत एकाही वनडे सामन्यात फलंदाजी केली नाही.

क्रमांक – 3

  • आरपी सिंह (सिनिअर)

रुद्रप्रताप सिंह या खेळाडूने 90 च्या दशकात भारतीय संघासाठी दोन एकदिवसीय सामने खेळले होते. आरपी सिंह (सिनिअर) यांचा जन्म लखनऊ येथे झाला होता. आरपी सिंह हे डाव्या हाताने फलंदाजी तर उजव्या हाताने गोलंदाजी करत असत.

रुद्रप्रताप सिंह यांच्या खात्यावर एक बळी टिपल्याची नोंद आहे. परंतु या खेळाडूला वनडेत फलंदाजी करण्याची संधी काही मिळाली नाही.

आरपी सिंह यांनी 1986 मध्ये ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध खेळताना संघात पदार्पण केले होते. त्यानंतर फक्त दोन सामने खेळलेल्या आरपी सिंह यांना संघात स्थान मिळाले नाही.

क्रमांक – 2

  • मनप्रीत गोनी

भारताच्या या खेळाडूकडे फलंदाजी करण्यासाठी आवश्यक ते कौशल्य पुरेपुर होते. 2008 मध्ये कराची येथे हाँगकाँग संघाविरुद्ध मनप्रीत गोनी याने एकदिवसीय संघात पदार्पण केले होते. गोनी याने भारतीय संघासाठी दोन एकदिवसीय सामने खेळले आहेत.

गोनी याने आजपर्यंतच्या कारकिर्दीत दोन विकेट खात्यात जमा केल्या आहेत. आयपीएल मध्ये जबरदस्त कामगिरी केल्यानंतर गोनीला भारतीय संघात स्थान देण्यात आले होते. परंतु, भारतीय संघाकडून वनडे सामन्यात फलंदाजी करण्याची संधी काही गोनी याला मिळाली नाही.

क्रमांक – 1

  • जयदेव उनाडकट

आयपीएलमध्ये केलेल्या जबरदस्त कामगिरीनंतर जयदेव उनाडकट याला भारतीय संघात स्थान देण्यात आले होते. जयदेवने 2013 मध्ये भारतीय संघात पदार्पण केले होते.

उनाडकट याने हरारे येथे झिम्बाम्ब्वे संघाविरुद्ध आपला पहिला एकदिवसीय सामना खेळला होता. तसेच त्यानंतर उनाडकटने आजपर्यंत 7 वनडे सामने खेळले आहेत. ज्यात त्याने 8 बळी टिपले आहेत.

सर्वाधिक वनडे सामने खेळून एकही चेंडू न खेळण्याचा विक्रम हा सध्या उनाडकतच्या नावावर आहे. तो सोडून जगात कोणत्याही खेळाडूने असा विचित्र विक्रम केला नाही.

आयपीएलमध्ये प्रसंगी फलंदाज म्हणूनही चांगली कामगिरी केलेल्या या खेळाडूला राष्ट्रीय संघाकडून मात्र, एकदिवसीय सामन्यात एकदाही फलंदाजी करता आलेली नाही. बाकी जयदेवचे वय पाहता तो आपल्या नावावरचा हा विक्रम नक्कीच बदलू शकतो.

अन्य फलंदाज- 

भारताकडून वनडेत आजपर्यंत जे २३१ खेळाडू खेळले आहेत त्यातील ११ खेळाडूंनी कधीही एकही चेंडू खेळला नाही. त्यात मनप्रीत गोणी, आरपी सिंग (सिनीयर) व जयदेव उनाडकतबरोबर मोहम्मद सिराज (१), परवेज रसुल (१), राशिद पटेल (१), रणधीर सिंग (२), टी शेखर (४), कर्ण शर्मा (२), बरिंदर स्राण (६) व वाॅशिंग्टन सुंदर (१) यांनाही एकही चेंडू खेळण्याची संधी मिळाली नाही.

You might also like