भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये सध्या कसोटी मालिका सुरु असून पहिले दोन सामने अनुक्रमे सेंच्यूरियन आणि जोहानसबर्ग या ठिकाणी पार पडले. यानंतरचा तिसरा आणि शेवटचा सामना केपटाऊनमधील न्युलँडसच्या स्टेडीयमवर खेळला जाणार आहे. सध्या मालिकेत दोन्ही संघ १-१ ने बरोबरीत आहेत. या सामन्यातून भारतीय संघ पहिल्यांदाच दक्षिण आफ्रिकेमध्ये मालिका विजय मिळवण्याचा प्रयत्न करणार आहे. आत्तापर्यंतचा भारताचा केपटाऊनमधील विक्रम चांगला राहिला नाही. भारताने या मैदानात एकही कसोटी सामना जिंकलेला नाही, पण भारतीय खेळाडूंनी याच मैदानात कौतुकास्पद कामगिरी केली आहे.
१. सचिन तेंडूलकरचे शेवटचे कसोटी शतक
सचिन तेंडूलकरचे क्रिकेटमध्ये स्वत:ला सर्वकालीन महान फलंदाजांपैकी एक म्हणून वर्णन केले जाते आणि आत्तापर्यंत सुमारे ५१ कसोटी शतके करण्याचा विक्रम केला आहे. सचिनचा हा विक्रम मोडणे सध्यातरी कठीण आहे. २०१०-११ मध्ये भारतीय संघ दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर होता. भारतीय खेळाडूंनी शानदार कामगिरी करत मालिका बरोबरीत सोडवली होती. याच मालिकेदरम्यान सचिनने त्याच्या कारकीर्दीतील कसोटीमधील शेवटचे म्हणजेच ५१ वे शतक लगावले होते.
या दौऱ्यामध्ये सचिनने चांगली कामगिरी करत दोन शतके ठोकली होती. त्याने सेंच्यूरियन आणि केपटाऊन या मैदानांमध्ये शतक लगावलं होतं.असं म्हंटल जात की, ही त्याच्या कारकीर्दीतील सर्वोत्कृष्ट शतके होती, कारण डेल स्टेन आणि मोर्ने मोर्केल यांसारख्या दिग्गज गोलंदाजांचा सामना करत सचिनने शतके केली होती. केपटाऊनमध्ये सचिनने १४६ धावांची खेळी केली होती.
२. सचिन आणि अजहरुद्दीनचा मास्टरक्लास
साल २०११ च्या आगोदर म्हणजेच १९९७ मध्ये सचिनने केपटाउनच्या प्रेक्षकांना आपला शानदार खेळ दाखवला होता. त्यावेळी त्याने १६९ धावांची खेळी खेळली होती. मास्टर ब्लास्टरने माजी कर्णधार मोहम्मद अजहरुद्दीनसोबत २२२ धावा करत भारताची प्रतिष्ठा वाचवली होती. एकेकाळी भारताने ५ विकेट गमावून ५८ धावा केल्या होत्या. पण सचिन-अझरुद्दीनच्या भागीदारीने भारताला सावरले. पण मोहम्मद अजहरुद्दीन ११५ धावा करुन बाद झाला होता. अखेर या सामन्यात भारताला २९२ एवढ्या मोठ्या फरकाने पराभव पत्कारावा लागला. पण असे असले तरी ही कसोटी सचिन-अझरुद्दीन यांच्या भागीदारीसाठी लक्षात ठेवली जाते.
३. हरभजनची कमाल
नुकताच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेल्या हरभजन सिंगने २०११ मध्ये केपटाउन येथे त्याच्या कारकीर्दीतील सर्वोत्कृष्ठ कामगिरी केली होती. तिसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या डावात भज्जीने ७ विकेट घेत १२० धावा दिल्या होत्या, त्यावेळी भारतीय संघ विजयाच्या खूप जवळ पोहचला होता. पण जॅक कॅलिसने भारताला विजयापासून वंचित ठेवले. शार्दुल ठाकूरच्या जोहान्सबर्ग येथील कामगिरीच्या अगोदर हरभजन सिंगने केलेली ही कामगिरी दक्षिण आफ्रिकेमधील सर्वोत्तम गोलंदाजी कामगीरी होती.
महत्त्वाच्या बातम्या –
अव्वल स्थानावरील पकड मजबूत करण्याचे मुंबई सिटी एफसीचे लक्ष्य!
रोहित आणि मुंबई इंडियन्सचे नाते झाले ११ वर्षांचे; फ्रॅंचाईजीने शेअर केली ‘खास’ पोस्ट
Video: स्मिथमध्ये पुन्हा दिसली ‘वॉर्न’ची झलक, इंग्लंडच्या लीचला असं पकडलं फिरकीच्या जाळ्यात