ऑस्ट्रेलियानं मेलबर्नमध्ये सुरू असलेल्या बॉक्सिंग डे कसोटीवर आपली पकड मजबूत केली आहे. पहिल्या दिवसअखेर दोन्ही संघ जवळपास बरोबरीत दिसत होते, परंतु दुसऱ्या दिवशी भारताच्या काही चुकांमुळे ऑस्ट्रेलियाला सामन्यात आघाडी मिळाली. दुसऱ्या दिवशी झालेल्या या चुका या कसोटीतील भारताच्या पराभवाचं कारण बनू शकतात. त्या कोणत्या तीन चुका आहेत यावर आपण या बातमीद्वारे नजर टाकूया.
(3) गोलंदाजी क्रमात बदल – दुसऱ्या दिवशी रोहित शर्मानं पहिलं षटक मोहम्मद सिराजला दिलं आणि ऑस्ट्रेलियानं त्यात नऊ धावा काढून चांगली सुरुवात केली. यानंतर आकाशदीप आणि जसप्रीत बुमराहनं गोलंदाजी केली. आकाशदीप आज निष्प्रभ दिसत होता, परंतु तरीही रोहितनं त्याला सतत गोलंदाजी दिली. यामुळे त्याच्या एका षटकात 15 धावाही गेल्या. सुरुवातीला बुमराह आणि आकाशदीपला लावल्यानंतर रोहितनं गोलंदाजी क्रमात अचानक बदल केला. स्टीव्ह स्मिथ सेट झाल्यावर रोहितनं नितीश रेड्डीला गोलंदाजी दिली.
(2) स्टीव्ह स्मिथला सेट होण्याची संधी दिली – स्टीव्ह स्मिथ हा असा फलंदाज आहे, ज्याला क्रिजवर सेट होण्यासाठी वेळ लागतो. डावाच्या सुरुवातीला तो आत येणाऱ्या चेंडूंमुळे अडचणीत सापडतो. हे सर्व माहीत असून देखील भारतीय गोलंदाजांनी त्याला सेट होण्याची संधी दिली. सुरुवातील स्मिथच्या पॅडवर जास्त गोलंदाजी झाली नाही, ज्यामुळे खेळपट्टीवर त्याच्या नजरा स्थिर झाल्या. एकदा स्मिथ सेट झाला की त्याला रोखण्यासाठी भारताकडे काहीच उपाय नव्हता.
(1) दिवसअखेर फलंदाजांची घाई – फलंदाजी करताना भारतानं रोहित शर्मा आणि केएल राहुलच्या विकेट्स स्वस्तात गमावल्या असल्या तरी विराट कोहली आणि यशस्वी जयस्वाल यांच्या भागीदारीनं ऑस्ट्रेलियाला अडचणीत आणलं होतं. दोघांमध्ये 100 धावांची भागीदारी झाली. ऑस्ट्रेलियाकडे त्यांची विकेट घेण्यासाठी कोणताही प्लॅन नाही असं वाटत होतं. जयस्वाल आरामात मोठे फटके खेळत होते, पण नंतर त्यानं घाई केली आणि तो चोरटी धाव घेण्याच्या नादात रनआऊट झाला. त्यानंतर भारताचा डाव गडगडला आणि टीम इंडियानं शेवटच्या 20-25 मिनिटांत तीन विकेट गमावल्या, ज्यामुळे सामन्याचं सर्व चित्रच बदललं.
हेही वाचा –
मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर सलग दुसऱ्या दिवशी धावांचा पाऊस, तब्बल 20 वर्षांनंतर घडलं असं काहीतरी!
IND vs AUS; “तुम्ही विकेटवर टिकून…” रोहित शर्मावर दिग्गजाने उपस्थित केला प्रश्न
हा आहे सचिनचा दर्जा! मेलबर्न कसोटीदरम्यान ऑस्ट्रेलियात मिळाला विशेष सन्मान