पाकिस्तानची आर्थिक स्थिती किती डबघाईला आली आहे, हे कोणापासूनही लपलेलं नाही. यामुळे येथील खेळाडूंना पुरेशा सोई-सुविधा मिळत नाहीत. यापासून कंटाळलेले 3 पाकिस्तानी खेळाडू विदेशात खेळायला गेले असताना तेथेच फरार झाले! हो हे खरं आहे. पाकिस्तान हॉकी फेडरेशनच्या माहितीशिवाय युरोपियन देशात पळून जाण्याचा प्रयत्न केल्याबद्दल तीन पाकिस्तानी हॉकीपटू आणि एका फिजिओथेरपिस्टवर आजीवन बंदी घालण्यात आली आहे. माहितीनुसार, या खेळाडूंना भत्ते मिळण्यास विलंब होत होता.
पाकिस्तान हॉकी संघटनेचे सरचिटणीस राणा मुजाहिद यांनी गुरुवारी (29 ऑगस्ट) पुष्टी केली की, मुर्तझा याकूब, इहतेशाम अस्लम आणि अब्दुर रहमान हे 3 हॉकीपटू आणि फिजिओथेरपिस्ट वकास गेल्या महिन्यात नेशन्स कपसाठी नेदरलँड आणि पोलंडला गेले होते, मात्र ते तेथून परतले नाहीत. या खेळाडूंनी नेदरलँडमध्ये राजकीय आश्रय मागितला आहे.
मुजाहिद यांनी कबूल केलं की, पाकिस्तान हॉकी संघटनेची आर्थिक परिस्थिती खूपच खडतर होती. खेळाडूंना त्यांचे प्रवास भत्ते आणि दैनंदिन उदरनिर्वाहाचा खर्चही मिळत नव्हता. मुजाहिद म्हणाले, “जेव्हा संघ मायदेशी परतला आणि आम्ही आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीच्या प्रशिक्षण शिबिराची घोषणा केली, तेव्हा या तिघांनीही आम्हाला सांगितलं की देशांतर्गत समस्यांमुळे ते शिबिरात सहभागी होऊ शकणार नाहीत.”
मुजाहिद म्हणाले, “आम्हाला कळलं की ते त्यांच्या शेंजेन व्हिसावर नेदरलँडला गेले आणि तिथे त्यांनी राजकीय आश्रय मागितला. हे पाकिस्तान हॉकीसाठी निराशाजनक प्रकरण आहे. यामुळे पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठी युरोपियन देशांकडे व्हिसासाठी अर्ज करणं कठीण होईल.”
राणा मुजाहिद यांनी स्पष्ट केलं की, पीएचएफनं या खेळाडूंवर आजीवन बंदी घातली आहे. या खेळाडूंना परत आणण्यासाठी पाकिस्तान दूतावासाद्वारे प्रयत्न करण्यात येणार आहेत.
हेही वाचा –
जो रुटनं आणखी एक शतक ठोकून मोडला रोहित शर्माचा मोठा रेकॉर्ड! कोहली अजूनही कोसो दूर
टी20 विश्वचषकादरम्यान रोहित आणि हार्दिकमधील वाद कसा संपला? खास व्यक्तीचा उलगडा
बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी सुरेश रैनाने टीम इंडियाला केले सतर्क, म्हणाला…