आयपीएल २०२१ चा दुसरा टप्पा १९ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. उर्वरित ३१ सामने २७ दिवसांमध्ये खेळले जातील आणि स्पर्धेचा अंतिम सामना १५ ऑक्टोबरला खेळला जाणार आहे. भारतात खेळल्या गेलेल्या पहिल्या टप्प्यात फलंदाज आणि गोलंदाज यांच्यात चुरशीची स्पर्धा दिसून आली होती.
शिखर धवनने सर्वाधिक ३८० धावा केल्या होत्या. त्याचबरोबर हर्षल पटेल १७ बळींसह सर्वाधिक विकेट घेणाऱ्यांच्या यादीत पहिल्या क्रमांकावर राहिला होता. पण आता पुढचा टप्प्या यूएईमध्ये खेळला जाणार आहे, तेव्हा परिस्थिती नक्कीच बदलेल आणि खेळाडूसमोर नवीन आव्हाने असतील. आता प्रश्न उद्भवतो की कोणता फलंदाज यूएईमध्ये सर्वाधिक धावा करू शकतो. तर या लेखात आपण त्या तीन फलंदाजांबद्दल जाणून घेणार आहोत, जे युएईमध्ये सर्वाधिक धावा करू शकतात.
१. केएल राहुल
भारतात आयोजित आयपीएल २०२१ च्या सुरुवातीच्या सामन्यांमध्ये पंजाब किंग्जचा कर्णधार केएल राहुल चांगली फलंदाजी करत होता. पहिल्या ७ सामन्यांमध्ये केएलने १३६.२१ च्या स्ट्राइक रेट आणि ६६.२० च्या सरासरीने ३३१ धावा केल्या होत्या. तो या स्पर्धेत धावा करण्याच्या बाबतीत आघाडीवर होता, परंतु नंतर त्याला अपेंडिक्स ऑपरेशन करावे लागले. यामुळे तो आठव्या सामन्याचा भाग होऊ शकला नाही आणि सध्या सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत दुसऱ्या स्थानावर आहे.
युएईमध्ये झालेल्या गेल्या आयपीएल मोसमातील त्याची कामगिरी लक्षात घेतली, तर पंजाब किंग्स प्ले-ऑफसाठी पात्र होऊ शकले नसले, तरी राहुलने ऑरेंज कॅप मिळवली होती. आयपीएल २०२० मध्ये त्याने १४ सामन्यांमध्ये १२९.३४ च्या स्ट्राईक रेटने आणि ५५.८३ च्या सरासरीने ६७० धावा केल्या होत्या. यादरम्यान त्याने १ शतक आणि ५ अर्धशतके केली होती. त्यामुळे यंदा देखील तो सर्वाधिक धावा करणाऱ्या पहिल्या ५ फलंदाजांमध्ये असू शकतो.
२. फाफ डु प्लेसिस
दक्षिण आफ्रिकेचा अनुभवी फलंदाज फाफ डु प्लेसिस चेन्नई सुपर किंग्जकडून आयपीएलमध्ये खेळतो. यूएईमध्ये तो आयपीएल २०२१ मध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरू शकतो. खरं तर, भारतात खेळल्या गेलेल्या सुरुवातीच्या सामन्यांमध्ये फाफ सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर होता, कारण त्याने ६४च्या सरासरीने ३२० धावा केल्या होत्या.
त्याने चेन्नईसाठी धावा काढण्याची एकहाती जबाबदारी स्वीकारली होती. पण यावेळी तो पाठीच्या दुखापतीमुळे पुढील काही सामने खेळणार नाही. यामुळे तो यादीत वरच्या स्थानावर असला तरी आता या स्पर्धेतुन बाहेर जाऊ शकतो.
गेल्या हंगामात फाफची कामगिरी पाहिली तर, यूएईमध्ये खेळल्या गेलेल्या आयपीएल २०२० मध्ये त्याने १३ सामन्यांमध्ये ४०.८१ च्या सरासरीने आणि १४०.७५ च्या स्ट्राईक रेटने ४४९ धावा केल्या होत्या.
३. सूर्यकुमार यादव
आयपीएल २०२१ च्या यूएईमध्ये सर्वाधिक धावा करू शकणाऱ्या फलंदाजांच्या यादीत सूर्यकुमार यादवचे नावही समाविष्ट आहे. सूर्याने भारतात खेळलेल्या सुरुवातीच्या सामन्यांमध्ये १४४.१६ च्या स्ट्राईक रेट आणि २४.७१ च्या सरासरीने १७३ धावा केल्या आहेत. त्यात एका अर्धशतकी खेळीचाही समावेश होता.
याशिवाय, लीग स्थगित झाल्यानंतर सूर्याने श्रीलंका दौऱ्यावरही चमकदार फलंदाजी केली आणि आपला फॉर्म कायम ठेवला. अशा परिस्थितीत सुर्याला आपला स्फोटक फॉर्म कायम ठेवून मुंबई इंडियन्सला सहावी ट्रॉफी जिंकण्यास मदत करायला आवडेल. त्यामुळे तो युएईमध्ये सर्वाधिक धावा करू शकतो. आकडेवारीबद्दल बोलायचे झाले तर सूर्याने आयपीएलमध्ये आतापर्यंत १०८ सामने खेळले आहेत, ज्यात त्याने १३५.२८ च्या स्ट्राईक रेटने आणि २९.६८ च्या सरासरीने २१९७ धावा केल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
पांडेने ठोकला उत्तुंग षटकार, मात्र नंतर टॉर्च लावून शोधावा लागला चेंडू, पाहा मजेदार व्हिडिओ
विराट सोडणार टी२० कर्णधारपद; पाहा आत्तापर्यंत कशी राहिली कामगिरी
भारताची पुढील पिढी घडवणार ‘लेफ्टनंट कर्नल धोनी’, संरक्षण मंत्रालयाने दिली ‘ही’ जबाबदारी