प्रत्येक क्रिकेटपटूचं एकच स्वप्न असते की, मोठं होऊन आपल्या देशासाठी खेळायचे. पण आंतरराष्ट्रीय स्तरावर पदार्पण करणं ही काही सोपी गोष्ट नसते आणि ते पण भारतासारख्या प्रतिभाशाली देशात. जेथे सचिन तेंडुलकरला उत्कृष्ट खेळामुळे क्रिकेटचा देव अशी उपाधी मिळाली. पण २००७ साली एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत खराब कामगिरीमुळे त्याला समर्थांकडून रोषाला देखील सामोरे जावे लागले होते. यावरूनच भारतात क्रिकेटचे किती वेड आहे हे दिसून येते.
मागच्या काही वर्षात बऱ्याच खेळाडूंना भारतीय संघात पदार्पण करण्याची संधी मिळाली, पण पदार्पण करणाऱ्या प्रत्येक खेळाडूची कारकीर्द यशस्वी व्हावीच असं नाही. किती तरी वेळा खेळाडूंना पदार्पणाची संधी मिळून पण त्यांच्या खराब प्रदर्शनामुळे त्यांना संघातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आणि नंतर त्यांच्यासाठी संघाची दारे कायमची बंद झाली. आज आपण अशा तीन खेळाडूंबद्दल जाणून घेणार आहोत, ज्यांचे भारतीय संघात पुनरागमन अशक्य आहे.
३. परवेज रसूल
परवेज रसूल हा जम्मू काश्मीर या आंतरराष्ट्रीय स्तरावर क्रिकेट खेळणारा पहिला खेळाडू आहे. स्थानिक क्रिकेटमध्ये सलग चांगलं प्रदर्शन करून त्याची २०१३ मध्ये झिम्बाब्वे विरुद्धच्या सामन्यात भारतीय संघात निवड झाली. पण त्याला पदार्पणाची संधी मिळाली नाही. काही काळानंतर त्याने बांगलादेश दौऱ्यात एकदिवसीय सामन्यात पदार्पण केले. त्याने आपल्या पदार्पणाच्या सामन्यात २ विकेट घेतल्या. पण त्यानंतर त्याला संघात स्थान मिळाले नाही.
पुन्हा त्याची २०१७ मध्ये इंग्लंड विरुद्ध टी२० मालिकेत निवड झाली आणि भारतीय पुनरागमनाची संधी देखील मिळाली. या सामन्यात त्याने एक विकेट घेतली व पाच धावा केल्या. रसूलला यानंतर एकदाही संघात स्थान मिळाले नाही. त्यानंतर आयपीएलमध्ये कोणत्याही संघाने त्याला खरेदी केले नाही. तसेच नवीन खेळाडूंच्या चांगल्या कामगिरीमुळेही रसूलचे पुन्हा संघात येणे अवघडच आहे.
२. राहुल शर्मा
उंच असलेला लेग स्पिनर राहुल शर्मा ह्याने त्याच्या आयपीएल २०११ च्या चमकदार कामगिरीमुळे सर्वानाच प्रभावित केले. त्याच्या या कामगिरीमुळे त्याला लवकरच भारतीय संघात स्थान मिळाले. पण इंग्लंड दौऱ्यात त्याची निवड होऊनही त्याला पदार्पणाची संधी मिळाली नाही. त्यानंतर त्याला २०११ मध्ये वेस्ट इंडिज विरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात संधी मिळाली. त्यानंतर २०१२ पर्यंत त्याने ४ एकदिवसीय सामने खेळून ६ विकेट घेतल्या आहेत.
याव्यतिरिक्त त्याने २०१२ मध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध टी२० मालिकेत पदार्पणही केले. त्याने त्याच्या कारकीर्दीत फक्त दोन टी२० सामने खेळले आहेत. राहुल बऱ्याच काळापासून आयपीएलमध्ये सुध्दा दिसला नाही आणि स्थानिक क्रिकेटमध्ये सुध्दा त्याचं प्रदर्शन काही खास नाही. त्यातही भारतीय संघात आधीपासूनच युझवेंद्र चहल आणि राहुल चहर लेग स्पिनर म्हणून उपलब्ध आहेत. त्यामुळे राहुल शर्माचं पुनरागमन अशक्य आहे.
१. वरुण आरोन
वरुण आरोन भारताकडून कसोटी आणि एकदिवसीय अशा दोन्ही प्रकारात खेळला आहे. पण या वेगवान गोलंदाजाला चमकदार कामगिरी करता आली नाही आणि त्यामुळेच त्याला संघातून बाहेर काढण्यात आले. या गोलंदाजाकडे जलद गती गोलंदाजी करण्याची क्षमता तर होती. पण त्याचे गोलंदाजीवरचे नियत्रंण कमी होते आणि याच कारणामुळे तो खूप महागडा ठरत होता.
वरुणने भारतासाठी कसोटी खेळताना ९ सामन्यात १८ विकेट घेतल्या आहेत. तर ९ एकदिवसीय सामन्यात ११ विकेट मिळवल्या आहेत. या खेळाडूने भारतासाठी आपला शेवटचा सामना २०१५ साली खेळला आणि तेव्हापासून त्याच भारतीय संघात पुनरागमन होऊ शकलेले नाही. आत्ता भारताला कितीतरी अनेक चांगले जलद गती गोलंदाज मिळालेले आहेत आणि त्यांच्या चांगल्या प्रदर्शनामुळे वरुण आरोनचं भारतीय संघात पुनरागमन होऊ शकलेले नाही.
महत्त्वाच्या बातम्या-
सीएसकेच्या चाहत्यांना ‘थाला’ने दिला शब्द, सांगितले ‘या’ ठिकाणी खेळणार शेवटचा आयपीएल सामना
केएल राहुलने दिली नाही संधी; आता चार चेंडूत चार बळी घेत केली मलिंगाची बरोबरी
जशास तसे! असे ३ प्रसंग, जेव्हा भारतीय खेळाडूंनी विरोधी संघाच्या स्लेजिंगला दिलंय खणखणीत प्रत्युत्तर