क्रिकेट खेळणाऱ्या कोणत्याही खेळाडूचे आपल्या संघाकडून शतक करण्याचे स्वप्न असते. पण शतक करणे हे तेवढे सोपे नाही. त्यातही टी२० क्रिकेटमध्ये तर शतक करणे अधिक कठिण असते. कारण या क्रिकेट प्रकारात वेळ आणि षटके कमी असतात. पण त्यातही अनेक असे फलंदाज आहेत, जे टी२०मध्ये शतकी खेळी करण्यात यशस्वी ठरले आहेत. पण असे काही खेळाडू आहेत, जे ‘नर्वस नाईन्टीज’ची (९० ते ९९ धावांच्या दरम्यान) शिकार झाले. कोणत्याही फलंदाजांसाठी ही सर्वात दुर्दैवी घटना असते.
आयपीएल या टी२० क्रिकेट स्पर्धेतही विराट कोहली, रोहित शर्मा, केएल राहुल, मयंक अगरवाल अशा अनेक खेळाडूंनी शतकी खेळी केली आहे. तसेच काही खेळाडू ‘नर्वस नाईन्टीज’ चे शिकार देखील ठरले आहेत. यात, ग्लेन मॅक्सवेल, शिखर धवन, रिषभ पंत, सौरव गांगुली हे खेळाडू नव्वदीत बाद झाले होते. मात्र असे ३ क्रिकेटपटू आहेत जे दुर्दैवीरित्या ९९ धावांवर बाद झाले. त्यांचे शतक केवळ १ धावेने हुकले. यात ३ फलंदाजांचा या लेखात आढावा घेऊ.
आयपीएलमध्ये ९९ धावांवर बाद झालेले फलंदाज
विराट कोहली
आरसीबीचा कर्णधार विराट कोहली सुद्धा नर्वस नाइन्टीजचा बळी ठरला आहे. २०१३ च्या आयपीएलमध्ये दिल्ली डेअरडेव्हिल्सविरूद्ध खेळताना विराट कोहलीने ९९ धावा केल्या आणि तो बाद झाला. यासाठी कोहलीने ५८ चेंडूंचा सामना केला होता. त्याला फलंदाजी करताना आरसीबीच्या डावाच्या शेवटच्या चेंडूवर शतकासाठी २ धावांची गरज होती. त्यावेळी तो पहिली धाव धावल्यानंतर दुसरी धाव घेताना धावबाद झाला होता. त्यावेळी तो आयपीएलमध्ये ९९ धावांवर बाद होणारा पहिला क्रिकेटपटू होता.
त्याच्या या ९९ धावांमुळे आरसीबीच्या संघाने १८३ धावा केल्या होत्या आणि आरसीबी संघ हा सामना ४ धावांनी जिंकला होता.
पृथ्वी शॉ
पृथ्वी शॉने २०१९ च्या आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्सविरूद्ध ९९ धावांवर बाद झाला होता. त्यावेळी शॉने ५५ चेंडूंचा सामना करत १२ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने ९९ धावा फटकावल्या होत्या. त्यावेळी दिल्ली केकेआरने दिलेले १८५ धावांचे आव्हान सहज पार करेल असे वाटले होते. पण १९ व्या षटकात लॉकी फर्ग्युसनच्या गोलंदाजीवर शॉ ९९ धावांवर असताना बाद झाला. त्यामुळे नंतर हा सामना सुपर ओव्हरमध्ये गेला. अखेर सुपर ओव्हरमध्ये दिल्लीने हा सामना जिंकला.
ईशान किशन
आयपीएल २०२० मधील दुबईच्या मैदानावर मुंबई इंडियन्सच्या इशान किशनने केलेली खेळी सर्वांच्याच चांगली लक्षात राहील. ईशान किशनने आरसीबीकडून मिळालेल्या २०१ धावसंख्येचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्सला विजयाच्या अगदी जवळ आणले होते. परंतु, शेवटच्या षटकात तो इसरू उडानाच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला आणि सामन्यात बरोबरीत झाली. त्यानंतर आरसीबीने सुपर ओव्हरमध्ये या सामन्यात विजय मिळवला. त्या सामन्यात मुंबई इंडियन्सच्या इशान किशनने ५८ चेंडूत ९ षटकार आणि २ चौकारांच्या मदतीने ९९ धावांचा तुफानी डाव खेळला होता.
(महत्त्वाचे – ९९ धावांवर नाबाद राहिलेल्या क्रिकेटपटूंचा यात समावेश नाही. आयपीएलमध्ये सुरेश रैना आणि ख्रिस गेल हे असे २ फलंदाज आहेत जे ९९ धावांवर नाबाद राहिले.)