वनडे क्रिकेटमध्ये असे अनेक खेळाडू होऊन गेले, ज्यांनी वेगवेगळे विक्रम आपल्या नावावर केले. परंतु जर सर्वाधिक वनडे सामने खेळण्याबाबत चर्चा करायची झाली, तर तो विक्रम भारतीय संघाचा दिग्गज फलंदाज सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे. त्याने ४६३ वनडे सामने खेळले आहेत. त्याच्या व्यतिरिक्त श्रीलंकेचे खेळाडू सनथ जयसूर्या, माहेला जयवर्धने आणि कुमार संगकारा यांनी ४०० पेक्षा अधिक वनडे सामने खेळले आहेत.
जर सलग सर्वाधिक वनडे सामने खेळण्याची चर्चा केली, तर आतापर्यंत १५ असे खेळाडू आहेत, ज्यांनी सलग १००पेक्षा अधिक वनडे सामने खेळण्याचा विक्रम आपल्या नावावर केला आहे. त्या १५ खेळाडूंमध्ये सचिन तेंडुलकर, मोहम्मद अझरूद्दीन आणि विराट कोहली या दिग्गज भारतीय खेळाडूंचा समावेश आहे. या तिघांव्यतिरिक्त अजय जडेजा (९६) एकमेव भारतीय क्रिकेटपटू आहे, ज्याने ९०पेक्षा अधिक वनडे सामने सलग खेळले आहेत.
चला तर मग जाणून घेऊया जगातील त्या ३ खेळाडूंबद्दल, ज्यांनी सलग सर्वाधिक वनडे सामने खेळण्याचा विक्रम आपल्या नावावर केला आहे.
सलग सर्वाधिक वनडे सामने खेळणारे ३ खेळाडू- 3 Players Most Consecutive ODI Record
३. हॅंसी क्रोनिए (संघ- दक्षिण आफ्रिका, सलग वनडे सामने- १६२)
दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज माजी कर्णधार हँसी क्रोनिएने (Hansie Cronje) १९९३ पासून २००० दरम्यान एकूण सलग १६२ वनडे सामने खेळले होते. १९९२मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यातून वनडेत पदार्पण करणाऱ्या क्रोनिएने आपल्या वनडे कारकीर्दीत एकूण १८८ सामने खेळले. ज्यामध्ये ४ डिसेंबर १९९३ पासून २७ मार्च २००० पर्यंत त्याने सलग दक्षिण आफ्रिका वनडे संघाचे प्रतिनिधित्व तसेच नेतृत्व केले. क्रोनिएने आपल्या वनडे कारकीर्दीत एकूण २ शतके आणि ३९ अर्धशतकांच्या मदतीने ५५६५ धावा केल्या आहेत. तसेच ११४ विकेट्सही आपल्या नावावर केल्या आहेत.
तरी २०००मध्ये मॅच फिक्सिंगच्या आरोपामध्ये अडकल्यानंतर क्रोनिएची क्रिकेट कारकीर्द संपुष्टात आली. त्यानंतर २००२मध्ये केवळ ३२ वर्षांच्या वयात त्याची एका अपघातात त्याचा मृत्यू झाला होता.
२. अँडी फ्लॉवर (संघ- झिंबाब्वे, सलग वनडे सामने- १७२)
झिंबाब्वे संघाच्या महान फलंदाजांमध्ये सामील असणाऱ्या अँडी फ्लॉवरने (Andy Flower) १९९२मध्ये श्रीलंंकेविरुद्धच्या सामन्यातून वनडेत पदार्पण केले होते. त्याने २३ फेब्रुवारी १९९२ पासून ११ एप्रिल २००१ दरम्यान १७२ वनडे सामने खेळले. तसेच सर्वाधिक सलग वनडे सामने खेळणाऱ्या खेळाडूंच्या बाबतीत तो दुसऱ्या क्रमांकावर आहे. फ्लॉवरने झिंबाब्वेकडून खेळताना २१३ वनडे सामने खेळले आहेत. त्यामध्ये त्याने ४ शतके आणि ५५ अर्धशतकांच्या मदतीने ६७८६ धावा केल्या आहेत.
१. सचिन तेंडुलकर (संघ- भारत, सलग वनडे सामने- १८५)
जगातील दिग्गज फलंदाजांमध्ये समावेश असणारा भारतीय संघाचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या (Sachin Tendulkar) नावावर आतापर्यंत सर्वाधिक सलग वनडे सामने खेळण्याचा विक्रम आहे. सचिनने डिसेंबर १९८९ मध्ये पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यातून वनडेत पदार्पण केेले होते. त्याने २५ एप्रिल १९९० पासून २४ एप्रिल १९९८ पर्यंत भारताकडून १८५ वनडे सामने खेळले आहेत.
त्याच्या नावावर वनडेत सर्वाधिक धावा (१८,४२६) करण्याव्यतिरिक्त सर्वाधिक शतके (४९) आणि सर्वाधिक अर्धशतके (९६) करण्याचा विक्रमदेखील आहे. तसेच, सचिनने आपल्या वनडे कारकीर्दीत गोलंदाजी करताना एकूण १५४ विकेट्सही घेतल्या आहेत.