भारत आणि श्रीलंका यांच्यातील तीन सामन्यांची टी20 मालिका आजपासून सुरू होत आहे. या मालिकेसाठी दोन्ही संघ पूर्णपणे तयार आहेत. टीम इंडिया सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली यजमान संघाला आव्हान देण्यासाठी उतरणार आहे. त्याचबरोबर श्रीलंकेची कमान चारिथ असालंका याच्या हाती आहे.
मात्र, मालिका सुरू होण्यापूर्वीच श्रीलंकेच्या संघाला अनेक मोठे धक्के बसले. वास्तविक, त्यांचे काही खेळाडू दुखापतीमुळे किंवा इतर कारणांमुळे मालिकेतून बाहेर पडले आहेत. यामुळे संघाचा समतोल बिघडला आहे. या बातमीद्वारे आम्ही तुम्हाला अशा 3 खेळाडूंबद्दल सांगणार आहोत, जे भारत विरुद्ध श्रीलंका टी20 मालिकेतून बाहेर पडले आहेत.
(1) दुष्मंथ चमीरा – वेगवान गोलंदाज दुष्मंथा चमीराची गणना श्रीलंकेच्या प्रमुख खेळाडूंमध्ये केली जाते. श्रीलंका बोर्डानं भारताविरुद्धच्या टी20 मालिकेसाठी संघाची घोषणा केली, तेव्हा संघात त्याचाही समावेश होता. पण त्यानंतर चमीरा दुखापतीमुळे मालिकेत भाग घेऊ शकणार नसल्याची माहिती समोर आली. त्याच्या अनुपस्थितीमुळे श्रीलंकेचं गोलंदाजी आक्रमण कमकुवत दिसेल.
(2) नुवान तुषारा – या यादीत दुसरं नाव नुवान तुषाराचं आहे. तो संघाच्या सराव सत्रादरम्यान दुखापतग्रस्त झाला होता. त्याच्या बोटाला फ्रॅक्चर झालं आहे. त्यामुळे तो या मालिकेत भाग घेऊ शकणार नाही. त्याच्या जागी दिलशान मदुशंकाचा श्रीलंकेच्या संघात समावेश करण्यात आला आहे.
(3) बिनुरा फर्नांडो – मालिका सुरू होण्याच्या एक दिवस आधी श्रीलंकेला तिसरा धक्का बसला. संघाचा डावखुरा वेगवान गोलंदाज बिनुरा फर्नांडो ही मालिका खेळू शकणार नाही. फर्नांडो याला छातीत दुखत असल्याच्या तक्रारीवरून रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या 29 वर्षीय खेळाडूची प्रकृती चिंताजनक आहे. त्याच्या जागी संघात रमेश मेंडिसची स्टँडबाय खेळाडू म्हणून निवड करण्यात आली आहे. फर्नांडोनं आपल्या 17 टी20 सामन्यांच्या कारकिर्दीत 16 विकेट घेतल्या आहेत, ज्या दरम्यान त्याचा इकॉनॉमी रेट 8.53 होता. भारताविरुद्धच्या मालिकेत संघाला त्याच्याकडून मोठ्या अपेक्षा होत्या.
हेही वाचा –
राहुल द्रविडचा विशेष संदेश, गाैतम गंभीर भावूक; बीसीसीआयने शेअर केला खास व्हिडिओ
टाॅस निभावणार महत्त्वाची भूमिका; पाहा श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या टी20 सामन्याचे खेळपट्टीचा अहवाल
IND vs SL: नव्या पर्वाला होणार सुरुवात; या कारणांमुळे टी20 मालिका ठरणार खास!